इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ३

इ.स ६०० च्या दरम्यान राजा शशांकने बोधिवृक्ष व महाविहारातील बुद्ध प्रतिमा तोडण्याचा आदेश दिला. त्याने बंगाल प्रांतातील अनेक बुद्धविहार आणि स्तूप तोडून टाकले होते. अतिशय शिताफीने कामरूपचा राजा भास्करवर्मन ने बुद्ध प्रतिमा आणि बोधिवृक्ष त्याच्या विश्वासू मंत्र्यांमार्फत वाचविले व साधारणतः इ.स. ६२० मध्ये बोधीवृक्षाभोवती २४ फूट उंचीची भिंत बांधली.

इ.स. ६३७ मध्ये हुयान त्सांग ने महाबोधी महाविहाराला भेट दिली. त्याच्या लेखात आलेला प्रवेशद्वार व भव्य मंडप हा त्याकाळी ब्रह्मदेशाचा राजा साडो याने बांधला होता. हुयान त्सांगच्या भेटीच्या आधी येथील फाल्गु (नेरंजना) नदीला पूर आला होता व त्याचे पाणी व वाळू संपूर्ण महाविहार परिसरात पसरली होती. महाविहारात अक्षरशः अडीच फूट उंच वाळू साचली होती व त्यात वज्रासन देखील दाबले गेले होते. हुयान त्सांग ने वर्णन केल्याप्रमाणे महाबोधी महाविहार १७० फूट उंच होते व संपूर्ण बांधकाम प्लास्टर केलेल्या लाल रंगाच्या निळसर छटा असलेल्या विटांनी बनविले होते. महाविहाराच्या भिंतींवर अनेक ठिकाणी कोनाडे केले होते व त्यात सोन्याचा मुलामा असलेली बुद्धमूर्ती ठेवल्या होत्या. महाविहाराच्या पूर्वेला की तीन मजली मंडप होता व त्याच्या आतील भिंतीवर सोन्याचांदीने सजवलेली कलाकुसर होती. महाविहाराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अवलोकितेश्वर आणि मैत्रयाच्या १० फूट उंच मूर्ती होत्या. बोधीवृक्षाच्या भोवती उंच भिंत होती.


हुयान त्सांग

बुद्धांच्या बुद्धगये येथील ७ आठवड्यांच्या वास्तव्यात त्यांनी प्रत्येक ठिकाणी ध्यानमग्नतेत व्यतीत केलेल्या साठी ठिकाणी सम्राट अशोकाने सुंदर कोरीव स्मृतिस्थळ बांधल्या होत्या. या व्यतिरिक्त अशोकाने अनेक ठिकाणी स्तूप बांधली ज्यात सुजाताने बुद्धांना ज्याठिकाणी खीर दिली, कश्यप बंधूंनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली व मातीपोसक जातकाचे ठिकाण सामील होते.

हे सर्व स्तूप १८व्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. नंतर महंतांच्या अलिखित सूचनेनुसार (हे सविस्तर नंतर येणार आहे), तेथील गावकऱ्यांनी हे स्तूप पोखरून तेथील विटा काढून आपली घरे बांधण्यास सुरुवात केली. कनिंघम ला नंतर उत्खनन करताना लाखेच्या अनेक मूर्ती सापडल्या.

महाबोधी महाविहाराचे संवर्धनाचे काम अनेक राजांनी आणि असंख्य अनामिक दानदात्यांनी केले. त्याकाळी महाविहार भोवती जे नक्षीदार कुंपण अशोकाने बांधले होते त्यावर अनेकांनी शिलालेख कोरून ठेवले. एका शिलालेखात एका दानदात्याने २५० दिनार (गुप्तकालीन सोन्याचे नाणे) दान दिले. त्याचबरोबर महाविहार रोज दीप पूजनाच्या तुपासाठी ३०० गाय महाविहाराला दान दिल्याचे दिसते.

७व्या शतकाच्या सुमारास इ त्सिंग ने महाबोधी महाविहास भेट दिल्याचे कळते. त्याने वर्णन केल्याप्रमाणे अनेक व्यापारी आणि राजांनी महाबोधी महाविहाराच्या स्वरंक्षण आणि संवर्धनासाठी अनेक गावे दान दिला होती.

अतुल भोसेकर (लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)