इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ४

१०व्या शतकाच्या पूर्वार्धापासून महाबोधी महाविहाराला श्रीलंका, चीन आणि तिबेट वरून अनेक बौद्ध भिक्खू भेट देण्यासाठी येऊ लागले. इ.स ९६४ मध्ये ३०० पेक्षा जास्त भिक्खू चीन मधून महाबोधी महाविहारास भेट देण्यासाठी आले होते. चीन सम्राट ताई त्सुन्ग (इ.स. ९७६-९९७) ने बोधीवृक्षा खाली स्तूप बांधण्यासाठी दान दिले होते.

महाबोधी महाविहाराच्या उत्तरेकडील सज्जाकडे जाणाऱ्या जिण्याकडच्या वरच्या बाजूस भ.बुद्धांची एक भव्य मूर्ती कोरण्यात आली आहे. तिच्या दोन्ही बाजूला अवलोकितेश्वर आणि मैत्रेयच्या मूर्ती आहेत. तेथील शिलालेख वरून कळते कि हि मूर्ती भिक्खू वीरेंद्र ने १०व्या शतकात दान दिली होती.

इ.स. १०३५ ते १०७९ दरम्यान, ब्रह्मदेशाच्या राजाने महाबोधी महाविहाराच्या दुरुस्तीसाठी प्रचंड दान दिले होते. चिनी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख येथील एका दगडावर सापडला ज्यावर भ.बुद्धांच्या सात मूर्ती कोरल्या आहेत. सध्या हा दगड इंडियन म्युझियम, कोलकत्ता येथे पाहायला मिळतो.


राजे किंझिट्ठा यांचा एक शिलालेख

इ.स. १०११ मध्ये दीपंकर श्रीजना (ज्यांना प्रामुख्याने अतिसा या नावाने ओळखले जाते) यांची दीक्षा येथेच झाली. येथील मतविहारात २ वर्षे राहून त्यांनी बौद्ध आचार्य सिलरक्षिता यांच्याकडून विनय शिकून घेतला.

११ व्या शतकाच्या पूर्वार्धात महाबोधी महाविहाराला पुन्हा डागडुजीची गरज भासली. त्यावेळेस ब्रह्मदेशाचे राजे किंझिट्ठा (इ.स १०८४-१११३) यांनी जहाज भरून सोने, चांदी, मौल्यवान जडजवाहीर बुद्धगयेत पाठवून दिले. ११व्या शतकातील एका शिलालेखाद्वारा ही माहिती मिळते..


महाबोधी महाविहाराच्या पूर्वे कंदील सज्जात भ. बुद्धांची मूर्ती जी भिक्खू वीरेंद्र यांनी दान दिली होती.

इ.स. १२३० मध्ये, शिवलिकचा राजा अशोकवल्ला याने त्याचे गुरु पंडित मुशाला आणि चट्टोपादि यांच्या सांगण्या वरून येथे एक विहार बांधले. त्याच दरम्यान कामराज चा राजा पुरुषोत्तमसिंह याने आपल्या नातवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक विहार बुद्धगयेत बांधले. बांधकामाच्या देखरेखीसाठी राजाने भिक्खू धर्मरक्षित यांची नेमणूक केली होती. सर कनिंघम यांना सापडलेल्या एका शिलालेखात ही माहिती मिळते.

एक सर्वसाधारण समजूत अशी आहे कि इ.स. ११९९ मध्ये बुद्धगयेचे महाबोधी महाविहार व आजूबाजूची विहारे आणि संघरामे हे मुस्लिम आक्रमणामुळे नष्ट झाले, मात्र असा कुठेही ठोस पुरावा सापडत नाही. उलट इ.स. १२३४ मध्ये तिबेटी भिक्खू धर्मस्वामीन बुद्धगयेच्या भेटीवर आले असता त्यांना येथील महाबोधी विहार (संघाराम)मध्ये ३०० सिंहली भिक्खू अध्ययन करताना दिसले. त्याकाळातील मुस्लिम आक्रमणामुळे महाबोधी महाविहाराला थोड्या प्रमाणात तोडफोड आणि चोरी यांना तोंड द्यावे लागले मात्र यामुळे भिक्खुंच्या अभ्यासात कुठे बाधा निर्माण झाली नाही.


सिंहली भाषेतील बुद्धगया येथील सर्वात शेवटचा शिलालेख

इ.स.१२६२ मधील एकशिलालेखानुसार श्रीलंकेचा राजा जयसेन आणि त्याचे वडील बुद्धसेना यांनी महाबोधी महाविहाराच्या दुरुस्तीसाठी दान दिल्याचे कळते, तर इ.स. १२९८ मध्ये ब्रह्मदेशाचा राजा धर्मसेन आणि १४७१ मध्ये राजा धम्मचेतिया यांनी महाबोधी महाविहाराच्या दुरुस्तीसाठी दान दिले.

शिलालेखानुसार १६व्या शतकात येथील महाबोधी महाविहाराला बुद्धगुप्त या भिक्खूने भेट दिली. भेट देणारे ते शेवटचे भारतीय भिक्खू होते. त्याच दरम्यान सिंहली भिक्खू धर्मादिवाकर यांनी देखील महाबोधी महाविहाराला भेट दिली.

अतुल भोसेकर (लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)