इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ५

बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराला भेट देणे जगातील बौद्ध राष्ट्रातील सर्वच लोकांना जमणारे नव्हते. साधनांची कमतरता, प्रतिकूल प्रवास आणि त्याच बरोबर भारतातील मुस्लिम राज्य व त्यामुळे उद्भवलेली युद्धयजन्य परिस्थिती या मुळे बुद्धगया येथील लोकांचा ओढा कमी झाला. यावर मात करण्यासाठी अनेक बौद्ध देशातील राजांनी बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराची मोजमाप घेऊन आपल्या राज्यात महाबोधी महाविहाराची प्रतिकृती करण्यास सुरुवात केली.

ब्रह्मदेशाचे राजे किंझिट्ठा यांनी काही खास कारागार बुद्धगयेला पाठून महाबोधी महाविहाराचे आराखडे तयार केले व पगान या ठिकाणी महाबोधिची प्रतिकृती तयार केली.


शेवगुगयी विहार, बागान, म्यानमार

इ.स. १४५२ मध्ये तिबेट मध्ये महाविहाराच्या आकाराचे स्तूप बनविण्यात आले व त्यात लामांच्या अस्थी ठेवण्यात आल्या.


वॉट जेट यॉट, थायलंड

इ.स. १४७२ मध्ये पेगू चा राजा धम्मचेतियाने कारागीर पाठवून महाबोधिच्या संपूर्ण रचनेचा आराखडा तयार केला व अतिशय सुंदर आणि भव्य असे महाविहार (स्थानिक भाषेत शेवगुगयी) बांधले.

इ.स. १४४८ मध्ये थायलंडचे राजे तिलोकराजा याने महाबोधी महाविहाराच्या धर्तीवर महाबोधरामा, वाट-जेट-यॉट नावाचे महाविहार बांधले. त्यांनी खास श्रीलंके वरून बोधीवृक्षाच्या झाडाचे रोपटे आणून बांधलेल्या महाविहाराच्या बाजूला लावले. एवढेच नव्हे तर बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण परिसराची (भ. बुद्धांचे सात महत्त्वाच्या ठिकाणांसहित) मूळ आकाराची प्रतिकृती बनवली. पुढे १६व्या ते १८व्या शतकाच्या दरम्यान चियांग राई या भागात महाबोधी महाविहाराच्या आकाराचे विहार बनविण्यात आले.


महाबौद्ध विहार, पाटण

१६व्या शतकात नेपाळ वरून एका उपासकाने बुद्धगयेला येऊन महाबोधी महाविहाराचा नकाशा बनविला आणि नेपाळ मधील पाटण येथे महाविहार साकार केले. १९३४ च्या भूकंपामध्ये ते उध्वस्त झाल्यानंतर तेथे पुन्हा ते उभारण्यात आले.

१७४८ मध्ये चीन मध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहाराच्या आकाराचा विहार – उ ता झू पेकिंग शहराच्या लगत बनविण्यात आला.


उ ता झू, पेकिंग, चीन

या दरम्यान बदलेल्या परिस्थिती मुळे, बुद्धगयेकडे परदेशी भिक्खू आणि उपासकांचा ओघ कमी झाला. महाबोधी विहार (संघाराम) तर ओस पडले होते व महाबोधी महाविहारात अगदीच थोडे भिक्खू शिल्लक राहिले. कालांतराने तेही निघून गेले.

१७व्या शतकाच्या पूर्वार्धात शैव पंथाचा गोसावी घमंड गिरी हा बुद्धगया येथे येऊन राहिला. हळू हळू त्याचा शिष्यवर्ग वाढायला लागला. स्वतःला महंत म्हणून घेणाऱ्या या घमंड गिरीने महाबोधी महाविहाराच्या जवळ व महाबोधी संघरामाच्या परिसरात आपला आश्रम स्थापन केला. महाबोधी महाविहारातील काही बुद्धमूर्ती त्याने आणून आपल्या आश्रमात ठेवल्या आणि देव-देवतांच्या मूर्ती म्हणून पूजा अर्चना सुरु केली.

महाबोधी महाविहाराच्या परिसरातील मूर्तींची दैवतीकरणाला सुरुवात झाली!!!

अतुल भोसेकर  (लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)