इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ६

संघर्षाला सुरुवात…

महंत आता खूप ताकतवर आणि श्रीमंत होऊ लागला होता. महाबोधी महाविहार हे स्वतःच्या मालकीचे आहे अशा थाटात वागू लागला. देखभाल विना महाबोधी महाविहाराची रया जाऊ लागली. महाविहारातील अनेक बुद्ध आणि बोधिसत्वांच्या प्रतिमेचे पूजन हिंदू देवदेवता म्हणून व्हायला लागले. १७९० मध्ये अनेक ब्रिटिश चित्रकार, प्रवासी, सर्व्हे करणारे, आर्किटेक, पुरातत्त्व शास्त्रज्ञ बुद्धगयेला भेटी देऊ लागले. यामध्ये जगप्रसिद्ध चित्रकार विलियम आणि थॉमस डॅनियल हे होते ज्यांनी महाबोधी महाविहाराचे त्यावेळेसची चित्रे काढून ठेवली आहेत.

१८११ मध्ये ब्रिटिश सरकारने फ्रान्सिस बुकानान यांना बिहार प्रांत आणि बुद्धगयेच्या सर्व्हे साठी बोलावले. फ्रान्सिस साहेबांनी त्यावेळेसच्या बुद्धगयेचे तपशीलवार वर्णन केले मात्र हुयान त्सांग ने इ.स.६३२ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे नव्हते. महाबोधी महाविहारातील सोने, चांदी, हिरे, सुंदर कोरीव मूर्ती व वेलबुट्टी, आतील कोरीव लाकूडकाम यापैकी काहीही दिसले नाही. बुकानान यांना महाविहाराचे कोसळले मजले, महंताने व इतर लोकांनी अनेक स्तूपांना खोदून त्यांच्या विटांनी आश्रम आणि घरे बांधल्याचे दिसले. महंताने महाविहाराच्या भोवतालचे कोरीव स्तंभ काढून शेजारीच पांचपांडव नावाचे मंदिर बांधले होते. वज्रासनाशेजारी ठेवलेला दगड ज्यावर बुद्धांचे पदचिन्ह साकारले होते, तो दगड महंतांच्या मंदिरात विष्णुपद म्हणून ठेवल्याचे दिसले.

ब्रिटिश सैन्यातील जेम्स चिचली व जेम्स क्रोकेट यांनी महाविहारचे छायाचित्र काढून ठेवले होते.


जेम्स चिचली आणि जेम्स क्रोकेट यांनी १८४५ मध्ये काढलेले महाविहाराचे चित्र

१८४७ मध्ये कॅप्टन मारखम किटो यांनी सर्वात पहिल्यांदा येथे उत्खनन केले. सम्राट अशोकाने बसवलेल्या काही कुम्पणपट्टी व अनेक शिल्प सापडले. त्यातील अनेक भारतातील विविध संग्रहालयात पाठवून देण्यात आले.

१८६१ मध्ये सर अलेक्झांडर कनिंघम यांच्या सूचनेनुसार मेजर मीड यांनी उत्खनन केले. मुख्य महाविहारात संपूर्ण डबर साचले होते व पावसाळ्यात सगळीकडे पाणी साचले होते.

१८७६ साली सर रिचर्ड टेम्पेल यांनी अनेक बुद्धमूर्ती बुद्धगयेच्या परिसरात विखुरलेल्या दिसल्या. १८८६ मध्ये सर एडविन अर्नोल्ड (द लाईट ऑफ एशिया चे लेखक) यांना बुद्धगयेची स्थिती पाहून धक्काच बसला आणि श्रीलंकेत गेल्यानंतर त्यांनी तेथील बौद्धांना हे महाविहार पुनश्य नूतनीकरण करावे असे सुचविले.


१८९१ मध्ये अनागरिक धम्मपाल वज्रासन जवळ सुत्त पठण करताना

१८९१ मध्ये श्रीलंकेतील एक तरुण बौद्ध नागरिक धम्मपाल व त्याचा मित्र, जपानी बौद्ध भिक्खू कोझेन गुणरत्न हे गया वरून बुद्धगयेला येत असताना त्यांना वाटेत अनेक तोडलेल्या बुद्ध प्रतिमा दिसल्या. बुद्धगयेतील स्थिती तर आणखीन दयनीय झाली होती. धम्मपालांना महाबोधी महाविहारच्या अनेक कोरीव प्रतिमा या गावातील भिंतींवर अथवा विहिरीवर प्लास्टर केलेल्या दिसल्या. काही बुद्धमूर्ती विहिरीतील पाणी काढण्यासाठीच्या दोरीला वजन म्हणून वापरताना दिसल्या. महाविहाराचे अनेक नक्षीदार, कोरीव दगड हे महंतांच्या व त्याच्या शिष्यांच्या घराच्या अंगणात वापरल्या होत्या. महंतांच्या बारादरी मध्ये ३ फूट उंचीची बुद्धमूर्ती जमिनीत अर्धवट गाडलेल्या अवस्थेत होती. धम्मपाल तेथून वज्रासनाला वंदन करून महाविहाराला पुनर्जीवित करण्याचे ठरविले.


कोझेन गुणरत्न यांनी दान दिलेली ७०० वर्षे जुनी असलेली बुद्ध मूर्ती

त्यानंतर अनेकवेळा धम्मपाल महाविहारात जाऊ लागले. त्यांच्या जपानी मित्राने पाठवलेली एक ७०० वर्षे जुनी असलेली बुद्धमूर्ती तेथे ठेवत असताना, महंतांच्या शिष्यांनी त्यांना विरोध केला. एकाने ती बुद्धमूर्ती काढून खाली फेकली. या मंडळींनी धम्मपालांना हुसकावून लावले. नंतर धम्मपालांना ती बुद्धमूर्ती महंतांच्या पांचपांडव मंदिरात भीतीला लावून ठेवलेली दिसली.

त्याच दिवशी नागरिक धम्मपलांनी महंताविरोधात पहिली तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. एका संघर्षाला सुरुवात झाली होती.

अतुल भोसेकर (लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)