इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ७

१८९१ ते १८९३ या काळात अनागरिक धम्मपाल यांनी जवळपास सात वेळा महाबोधी महाविहाराला भेट दिली. याच काळात ते बौद्ध धम्मावरील व्याख्यानासाठी आणि महाबोधी महाविहाराच्या प्रसारासाठी त्यांची जगभ्रमंती देखील चालू होती. त्यांनी अनेक वेळा महंत गिरी यांना विनवणी केली कि महाबोधी परिसर त्यांनी सोडून जावा. ही बौद्धांची जागा असून तेथे शैव पंथाचे काहीच नाही व त्यांनी या जागेवर अतिक्रमण केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी महंताला जागा सोडून जाण्यासाठी हवी ती किंमत देखील देऊ केली. मात्र महंताने त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना सक्त ताकीद दिली कि त्यांनी फक्त महाविहारातील बुद्धमूर्तीची पूजा करावी व इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी एखाद्या ट्रस्ट मार्फत प्रयत्न करावे लागतील हे ओळखून अनागरिक धम्मपलांनी कर्नल ऑलकॉट यांच्या बरोबर श्रीलंके मध्ये ३१ मे १८९१ ‘द महाबोधी सोसायटी’ स्थापन केली. त्याचा मुख्य उद्देश होता बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देणे.

जेव्हा बंगालचे लेफ्ट.गव्हर्नर जनरल सर ऍशली इडन बुध्दगयाच्या भेटीला आले तेव्हा महंताने त्यांना भेटून महाबोधी महाविहार हे हिंदू मंदिर असल्याचा दावा केला. इडन यांच्या भेटीच्या वेळेस महंताने मुद्दामहून बोधिवृक्ष जवळ त्याच्या आश्रमातील ३०-४० लोकांना पिंडदान करण्यास सांगितले. मात्र ऍशली इडन यांना या महाविहाराची पूर्वीपासूनच कल्पना होती व त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. या साऱ्या घडामोडींवर सर चार्ल्स इलियट यांनी महाबोधी सोसायटीच्या जानेवारी १८९५ च्या अंकात सविस्तर लिहिले आहे.

जेव्हा काही बौद्ध भिक्खू आणि श्रामणेरांनी बोधीवृक्षाखाली संध्याकाळची प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली (जी त्यांची नेहमीची प्रथा होती) तेव्हा महंतांच्या लोकांनी त्यांना हुसकावून लावले. जेव्हा हे सगळे बर्मा गेस्ट हाऊस मध्ये परतले, तेव्हा महंतांच्या लोकांनी काही वेळांनी तेथे जाऊन त्यांना लाठ्या काठ्यांनी मारले. अनेक जण रक्तबंबाळ झाले. एका भिक्खुची तर अत्यंत नाजूक परिस्थिती झाली होती व त्याला गया येथील सरकारी दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. पोलिसांच्या नोंदणी नुसार बर्मा गेस्ट हाऊसच्या लाद्या रक्ताने माखल्या होत्या.

अनागरिक धम्मपलांनी याविषयी जगातील अनेक वर्तमानपत्रात याविषयी लिहिले व संपूर्ण जगाचे लक्ष याकडे नोंदविले. महाबोधी सोसायटी मार्फत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र एक दोघांवर कारवाईशिवाय काही विशेष झाले नाही.

तरीदेखील धम्मपलांनी महाबोधी महाविहारात जात राहिले व सकाळ संध्याकाळ तेथे वंदना घेऊ लागले. २५ फेब्रुवारी १८९५ ला धम्मपालांवर महंतांची लोके धावून गेली. धम्मपलांना मारहाण करण्यात आली व त्यांना बुद्धगयेतून निघून जाण्यास सांगण्यात आले. चार वर्षे वाट पाहूनही व सामंजस्याने बोलणी करून देखील महंत ऐकत नव्हता, उलट बौद्ध भिक्खुंच्या अंगावर धावून जात होता, हे पाहून धम्मपलांनी गया येथील जिल्हाधिकारी डी. जे. मॅकफेरसन यांच्याकडे कायद्यानुसार केस दाखल केली व त्याचू सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांनी ८ एप्रिल १८९५ साली सुरुवात केली. त्यावेळी अनागरिक धम्मपाल होते फक्त २९ वर्षांचे.

अनागरिक धम्मपालांनी शपथेवर सांगितले कि एके दिवशी त्यांना दिसले कि महाबोधी महाविहारातील बुद्धमूर्तीला एका भगव्या कपड्यात गुंडाळले होते व कपाळाला लाल रंगाने माखले होते. डोक्यावर फुले ठेवण्यात आली होती. एवढेच नव्हे तर महंताने तेथे एका पुजारीची नेमणूक केली होती आणि तो सकाळ संध्याकाळ बुद्धमूर्ती समोर आरती करत असे. हे सगळे बौद्धधम्माच्या विचाराच्या विरोधात होते. त्यांना त्याचे अतिव दुःख झाले होते. आणि म्हणूनच या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचे ठरवून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर पेटिशन दाखल केले होते.

अतुल भोसेकर (लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *