इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ८

अनागरिक धम्मपालांनी टाकलेली कोर्ट केस ८ एप्रिल १८९५ रोजी सुनावणीला आली. ही केस बरीच चालली व अनेक लोकांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. काही प्रमुख साक्षीदार आणि त्यांची साक्ष अशी:

बिपीन बिहारी बॅनर्जी, महाबोधी महाविहाराचे मुख्य संरक्षक – या महाविहारात कोणी हिंदू पूजा करत नाही. मीही शक्यतो महाविहारात जात नाही कारण मी हिंदू आहे आणि माझा धर्म मला तसे करण्यास मनाई करतो. मी बुद्धांची मूर्ती खाली ठेवलेली पहिली आहे. नुकतेच सुट्टीवरून आल्यानंतर मी बुद्धांच्या मूर्तीला भगवे कापड गुंडाळलेले पहिले तसेच मूर्तीच्या कपाळावर लाल रंग लावण्यात आला होता व तेथे एक ब्राह्मण पुजारी पूजा करताना दिसला. यापूर्वी कधीही कोणीही ब्राह्मण येथे पूजा करायला येत नसे.

महातली सुमंगला, सिंहली बौद्ध भिक्खू – धम्मपालांबरोबर त्यादिवशी महाविहारात होतो जेव्हा महंतांच्या लोकांनी बुद्धमूर्ती काढून घेतली. त्यावेळेस आम्ही कुठलाही प्रतिकार केला नाही मात्र ही जपानवरून आलेली मूर्ती असून तिचा सन्मान करणे योग्य आहे असे म्हटले. त्यावेळेस काही लोकं धम्मपालवर धावून गेली.

डॉ. हरी दास चॅटर्जी, गया मधील डॉक्टर – १८७३ मध्ये मी पहिल्यांदा महाबोधी महाविहार पहिले. नंतर त्याची डागडुजी झाल्यानंतर देखील पहिले. मी तेथे केवळ बौद्ध लोकं व भिक्खू येताना पहिले आहेत. ते तेथे मेणबत्ती व धूप जाळतात. तेथे कोणी हिंदू कधीच जात नाही.

बाबू दुर्गा शंकर भट्टाचार्य, जमीनदार – मी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार अनेकवेळा पहिले आहे. तेथे बुद्धमूर्ती जवळ अनेक बौद्ध कपडे, पैसे दान देताना पहिले आहे. सध्याच्या महंताने बर्माच्या राजाने महाबोधी महाविहाराला दान दिलेले अनेक सोन्या चांदीच्या वस्तू स्वतःजवळ ठेवल्या आहेत हे मला महंतांच्या एका शिष्यानेच सांगितले व जेथे ठेवल्या ती खोली देखील दाखवली आहे.

पंडित गंगाधर शास्त्री, मुख्याध्यापक ज़िल्हा शाळा, गया – महाबोधी महाविहार हे बौद्धांचे स्थान आहे, हिंदूंचे नव्हे. मी हे महाविहार फक्त बाहेरून पहिले आहे कारण माझे धर्मशास्त्र मला तेथे जायला परवानगी देत नाही. तेथे गेलो तर मला प्रायश्चित घ्यावे लागेल.

आपल्या १०२ पानांच्या निकालपत्रात डी.जे. मॅकफेरसन यांनी जयपाल गिरी, महेंद्र गिरी, बिमल देव गिरी आणि आणखीन दोघे जणांना IPC च्या कलम २९५, २९६ आणि २९७ अन्वये दोषी धरत प्रत्येकाला १ महिना साधी कारावास व रुपये १०० दंड दिला. हा खटला खूप गाजला. न्यायालयातील साक्षी दरम्यान झालेल्या प्रश्न उत्तरावरून एक अधोरेखित झाले कि बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचेच असून तेथे हिंदू महंताने अनधिकृत कबजा मिळवला आहे.

महंताने गया कोर्टाच्या विरुद्ध कलकत्ता उच्च न्यायालयात अपील केले जेथे ही शिक्षा रद्द करण्यात आली. अनागरिक धम्मपालांना मोठा मनस्ताप झाला.

जेव्हा लॉर्ड कर्झन व्हाईसरॉय झाले तेव्हा त्यांना बर्मी लोकांच्या शिष्टमंडळाने बोधिवृक्ष आणि महाबोधी महाविहार महंताच्या ताब्यातून सोडवून बौद्धांकडे सोपवण्याची विनंती केली. या प्रकरणात कर्झन यांनी लक्ष घालून, १९०३ मध्ये बुद्धगया येथे आले. यावेळेस महंत त्यांना भेटण्यास आला. कर्झन यांनी त्याला विचारले कि तो हिंदू असूनही बुद्धविहारावर कब्जा का केला आहे, काय तो बुद्धांची पूजा करतो आहे? महंत म्हणाला कि बुद्धांना तो विष्णूचा अवतार मानतो. यावर कर्झन म्हणाले तू तर शैव पंथीय आहेस, वैष्णव नाहीस, यावर महंत निरुत्तर झाला. कर्झन यांची खात्री पटली कि म्हटलं केवळ महाबोधी महाविहारावर ताबा मिळवायचा आहे. मात्र यात जास्त घाई करूनही चालणार नव्हते हे कर्झन ओळखून होता.

अनागरिक धम्मपाल यांनी पुरोगामी हिंदूंची मने वळविण्यास सुरु केले. 1922 साली गया येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात महाबोधी सोसायटी तर्फे महाविहाराच्या संपूर्ण माहितीची पुस्तिका वाटली व महाविहाराच्या ताब्यासंबंधी मागणी केली. बर्मी शिष्टमंडळाने देखील आग्रहाची मागणी केली (बर्मा देश त्यावेळेस भारताचा भाग होता). अधिवेशनात ठराव मंजूर झाला आणि एक समिती स्थापन करण्यात आली. तिचे प्रमुख राजेंद्र प्रसाद यांना नेमण्यात आले. आणखी एक सदस्य होते ज्यांचे नाव स्वामी रामोदार दास होते. त्यांनी नंतर बौद्ध धम्म स्वीकारला व राहुल सांकृत्यायन म्हणून पुढे प्रसिद्ध झाले.

१९२५ साली समितीने अखिल भारतीय काँग्रेस आणि हिंदू महासभा यांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडवावा असे ठरले. त्यानुसार हिंदू महासभेच्या ४००० सदस्यांपुढे धम्मपाल यांनी आपली भूमिका मांडली. या परिषदेत एक ठराव पारित करण्यात आला तो म्हणजे महाबोधी महाविहारात पूजेचा संपूर्ण हक्क बौद्धांना देण्यात यावा व महाविहार समितीमध्ये त्यांचा सहभाग असावा. बर्मी सदस्य उ टोक क्यि यांनी एक बिल मांडून भारत, श्रीलंका आणि बर्मा येथील बौद्धांना या समितीत स्थान असावे असे सुचविले. महंताने या सर्वाला नकार दर्शविला व महाबोधी महाविहाराचा ताबा देण्यास नकार दिला.

अनेक दशकांची धावपळ, वार्धक्य, खालावलेली तब्येत आणि महाबोधी महाविहार प्रकरणी निघत नसलेला तोडगा यामुळे अनागरिक धम्मपाल खचले होते. त्यांनी या लढ्यातून माघार घेत, सर्व सूत्र आपले सचिव व मित्र देवप्रिय वालीसिंह यांच्याकडे सुपूर्द केली. १९३३ साली धम्मपाल यांचे निर्वाण झाले. ४२ वर्षे जो एकहाती लढा त्यांनी दिला व जगाचे लक्ष याकडे वेधले तो अनोखा लढा होय. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण अधिकार बौद्धांकडे असावे ही त्यांची मागणी अपूर्णच राहिली.

अतुल भोसेकर (लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)

One Reply to “महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ८

Comments are closed.