इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ९

अनागरिक धम्मपालांच्या निर्वाणानंतर, त्यांनी स्थापन केलेल्या महाबोधी सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी, भारतातील व इतर बौद्ध राष्ट्रातील बौद्धांच्या मदतीने महाबोधी महाविहाराचा प्रश्न सतत उपस्थित करीत राहिले. त्यांनी भारतातील अनेक हिंदू मित्र जोडले होते ज्यांना महाबोधी महाविहाराच्या प्रश्नावर सकारत्मक निकाल हवा होता. १९३५ साली हिंदू महासभेने कानपुर मध्ये अधिवेशन भरविले होते. बर्माचे विद्वान भिक्खू उ ओट्टाम हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनाला भारत, श्रीलंका व बर्मा वरून अनेक बौद्ध उपस्थित राहिले होते. बौद्धांना महाविहारात पूजे बरोबरच समितीमध्ये देखील अधिकार हवा या मागणीला या अधिवेशनात पाठिंबा मिळाला मात्र हा ठराव संमत करताना उपस्थित अनेक हिंदू स्वामींनी त्याला विरोध दर्शवित व्यासपीठाकडे धाव घेतली. राजेंद्र प्रसाद यांना मदत करण्यासाठी आणखी एक समिती तयार येथे करण्यात आली होती.

६ मार्च १९३७ मध्ये राजेंद्र प्रसाद यांनी अखिल भारतीय काँग्रेस समोर महाबोधी महाविहार संबंधीचे बिल मांडले व येणाऱ्या काळात नवीन मंत्र्यांनी ते लगेच अमलात आणावा असा आग्रह धरला. जगातील बौद्ध राष्ट्रातील प्रमुखांनी अत्यंत मुत्सद्दीपणे महाविहारचे प्रश्न आंतराष्ट्रीय मंचावर मांडून भारतावर दडपण आणत होते.

स्वातंत्रोत्तर लगेचच महाबोधी सोसायटीने पाटणा मध्ये बौद्ध व हिंदूची एकत्रित बैठक बोलावली. महंताला महाविहाराचा हक्क द्यायचा नव्हता. खरं तर हिंदू महासभेच्या शब्दाबाहेर महंत नव्हता किंवा तो सगळ्यांविरुद्ध जाऊच शकला नसता मात्र तरीही त्याने विरोध कायम ठेवला. या बैठकीत सगळा विचार करून महाबोधी महाविहारावर बौद्ध हिंदू यांची एक समिती बनवून त्यांचा संयुक्त हक्क राहील असे ठरले गेले. याच दरम्यान आंतराष्ट्रीय आशिया संमेलनात देखील बौद्ध राष्ट्रातील चीन, तिबेट, बर्मा आणि श्रीलंका येथील प्रतिनिधी यांनी पंतप्रधान नेहरूंना यात लक्ष घालून लवकरात लवकर महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे असा आग्रह धरला. नेहरूंना देखील हा प्रश्न मिटवून शेजारील राष्ट्रात भारताबद्दल आदर वाढवायचा होता.

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर १९४८ साली बोधगया मंदिर अधिनियम याचा मसुदा जनतेच्या सूचनांकरिता प्रसारित करण्यात आला. या अधिनियमानुसार समितीमध्ये ४ बौद्ध व ४ हिंदू असतील व समितीचा अध्यक्ष म्हणून गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील असे नमूद करण्यात आले.

हा अधिनियम वाचून बौद्धांची घोर निराशा झाली कारण या समितीमध्ये सर्वात जास्त मेंबर्स हे हिंदू असणार होते. मुख्य म्हणजे हे महाबोधी महाविहार बौद्धांचे असताना देखील हिंदू त्या समितीवर असणार याचा मनस्ताप बौद्धांना झाला. तरी देखील बौद्धांना या समितीत समाविष्ट करता येणार होते म्हणून हा अधिनियम १९ जून १९४९ मध्ये पारित करण्यात आला. याला पुढे “बोधगया मंदिर अधिनियम १९४९” असे संबोधण्यात आले.

२८ मे १९५३ साली, वैशाख पौर्णिमेला महंताने आपले सारे हक्क समितीकडे एका जाहीर कार्यक्रमात सुपूर्द केले.

बौध्दगयाच्या परिसरातील उत्खनन आणि संवर्धन करण्यासाठी १९६६ मध्ये एक बृहत योजना सादर करण्यात आली ज्यात बुद्धगयेतील ३०० एकर जमीन ताब्यात घेऊन उत्खनन करण्यात येणार होते. त्यासाठी लागणाऱ्या सतरा लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र ही योजना नंतर बासनात गुंडाळण्यात आली. त्याचे कारण मात्र कळले नाही.

हा अधिनियम जरी पारित झाला तरीही बौद्धांमध्ये या अधिनियम आणि समितीबद्दल प्रचंड नाराजी होती. एक बौद्ध स्थान (जे पुरातत्त्वीय संशोधनातून सिद्ध झाले होते) व त्यावरची समिती हे बौद्धांच्याच हाती हवी होती.

१९९१ साली बिहारचे मुख्यमंत्री म्हणून लालूप्रसाद यादव यांची निवड झाली. महाबोधी महाविहाराबद्दल त्यांना आदर होता व बौद्धांचे मत योग्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. १९९२ मध्ये त्यांनी “बोधगया मंदिर अधिनियम १९४९” या ऐवजी नवीन “बोधगया महाविहार अधिनियम” आणू पाहत होते ज्यामुळे संपूर्ण बुद्धगया महाबोधी महाविहार परिसर व त्यावरची समितीवर फक्त बौद्धच असतील असे नमूद केले होते. हा अधिनियम पारित करून घ्यायचा असा त्यांचा मानस होता. मात्र त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने हिंदू कट्टरवाद्यांच्या साथीने याला प्रखर विरोध दर्शविला व हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला.

भारतीय जनता पार्टीच्या कट्टरवादी आणि मुर्खपणामुळे बिहारचे राजकारण ढवळून निघाले आणि शांततेचे प्रतीक व बुद्धत्त्व प्राप्तीचे स्थान असलेले बौद्धगयेतील महाबोधी महाविहार परिसर एका घाणेरड्या राजकारणाच्या वेढ्यात अडकला.

अतुल भोसेकर
(लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)
९५४५२७७४१०

3 Replies to “महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ९

  1. महाबोधी महाविहार संपूर्ण इतिहास भाग 9 केव्हा सादर होणार आहे…… मला संपूर्ण माहीती जाणून घ्यायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *