बुद्ध तत्वज्ञान

जगात प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असते

आपल्या जीवनाचा हेतू (प्रयोजन) काय हा प्रश्न बहुतेक सर्वांनाच पडत असतो, पण या प्रश्नाचे समाधान आपापल्या बुद्धी आणि समजुतीनुसार आपण करून घेतो, परंतु आपले समाधान झालेले नसते. कारण आपली इच्छा किंवा महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे हा आपला उद्देश नसून जीवनात सुखी होणे हा उद्देश असल्यास मानवाला सुखी होणे शक्य आहे. असे असले तरी आपली महत्त्वाकांक्षा किंवा इच्छा यांनाच पूर्णत्वास नेण्याला जेव्हा आपण सुख समजतो तेव्हाच आपला जीवनविषयक दृष्टिकोण चुकलेला असतो.

जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण चुकला की आयुष्याला अनावश्यक वळण लागायला काहीच वेळ लागत नाही. आयुष्याला लागलेले अनावश्यक वळण मानवी जीवनाला दु:खाच्या खाईत लोटण्यासाठी पुरेसे आहे. दुःख माणसाला अप्रिय असून त्याला हवालदिल करणारे आणि कलहपूर्ण वातावरणास चालना देणारे आहे. दु:ख आणि कहल नष्ट करणे हाच आपल्या जीवनाचा हेतू असल्यास, हे ध्येय पूर्ण करणे आपले एकमेव कर्तव्य असायला पाहिजे. आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी भगवन्ताचाच मार्ग श्रेष्ठ असून अनिवार्य आहे.

सर्व सत्त्वांच्या स्वभावाला व्यक्त करणारे वचन भगवन्ताने खालीलप्रमाणे सांगितलेले आहे-

अत्तूत्पमाय सब्बेसं सत्तानं सुख कामतं। पस्सित्वा कमतो मेत्तं सब्ब सत्तेसु भावये।।

अर्थ : आपल्यासारखेच सर्व सत्त्वजीव सुखाची इच्छा आणि आवड करणारे आहेत हे पाहून आपण सर्वच सत्त्वांशी मैत्रीपूर्ण वागणूक ठेवावी. आपण सर्वच लोक सुखाची आवड जपणारे असलो तरी जर आपण कामोपभोगाच्या भौतिक इंद्रियसुखालाच सुख समजू लागलो तर आपल्याला दु:ख आणि कलहापासून कोणीच वाचवू शकणार नाही. मानवी मनात दु:ख आणि बेचैनी किंवा पश्चात्ताप वास करीत असल्यास तो इतरांशी मैत्रीपूर्ण वागणूक कसा काय ठेवू शकणार?‘ आडातच नसेल तर पोहऱ्यात कसे येणार?’

मनातच प्रेम आणि मित्रत्व विकसित झालेले नसल्यास एखादी व्यक्ती वागण्याबोलण्यातून चांगुलपणाने कशी काय राहू शकणार? या जगात प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असते. आपल्याही दुःखाच्या मागे काहीतरी कारण असलेच पाहिजे. आपण या जगात राहत असताना व्यक्तिगत जीवनासोबतच सामाजिक, राजकीय, आर्थिक इ. संबंधांनासुद्धा महत्त्व देत असतो. म्हणून आपले व्यक्तिगत व सामाजिक जीवन सुखी बनविण्यासाठी योग्य ती वागणूक विकसित होणे आवश्यक असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *