आंबेडकर Live

बाबासाहेब आणि गाडगे महाराज यांच्यातील ऋणानुबंधा विषयी हे दोन किस्से वाचा!

घटना पहिली..
मुंबईच्या एका पटांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण चालू होते. (बहुधा नरे पार्कातली सभा असावी.) लोक शांतपणे भाषण ऐकत होते. एवढ्यात खडखड करणाऱ्या गाडीचा आवाज आला. आवाज ऐकून बाबासाहेबानी भाषण थांबवले. लोकाना कळेना भाषण का थांबवले ते. बाबासाहेबांनी अचूक हेरलं होतं ते की कोण आलंय… ते होते, गाडगेबाबा…

गाडगेबाबांच्या हातात हार होता. ते मंचाजवळ आले आणि बाबासाहेबांना खाली येण्याची विनंती केली. बाबासाहेब गाडगेबाबाना म्हणाले,
“तुम्ही वर या.”

गाडगेबाबा म्हणाले,
“साहेब तुम्ही खाली या.”

बराच वेळ हे असंच चालू राहीलं. उपस्थितांना कळेना नेमकं चाललंय तरी काय? सरतेशेवटी बाबासाहेबच स्वतः खाली आले. गाडगेबाबांनी बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला. दोन्ही महामानवांची गळाभेट झाली. गाडगेबाबा म्हणाले,
“बाबासाहेब, मंचावर येण्याइतका मी मोठा नाही.”

हे शब्द मंच्यावर बसलेल्या लोकानी ऐकले. गाडगेबाबा परतले. बाबासाहेब भाषणासाठी पुन्हा मंचावर येवु लागले आणि मंच्यावर बसलेले लोक हळूहळू खाली उतरू लागले. शेवटी बाबासाहेब एकटेच मंचावरुन भाषण देऊ लागले.

घटना दुसरी…
बाबासाहेब हे संत गाडगेबाबांचा प्रचंड आदर करीत असत. गाडगेबाबा बाबासाहेबांना मानसपुत्र मानत. त्यांच्यातील नातेसंबंध प्रचंड कारुण्याने ओतप्रोत होते. १४ जुलै १९५१ साली गाडगेबाबांची प्रकृती अस्वस्थ असल्याची बातमी बाबासाहेबांना मिळाली. त्यावेळेस बाबासाहेब भारताचे कायदेमंत्री म्हणून कार्यरत होते. सदर बातमी कळताच बाबासाहेब आपलं सर्व कामकाज बाजूला ठेवून गाडगेबाबांच्या भेटीला रवाना झाले. जाताना त्यांनी २ घोंगड्या विकत घेतल्या. कोणाकडून कधीच काही न घेणाऱ्या गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडून त्या २ घोंगड्या स्वीकारल्या. या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेनंतर दोघांनाही आपापल्या मनात एकमेकांप्रती असलेलं प्रेम अश्रुंवाटे मोकळं केलं होतं..

देव दगडात नसून तो माणसांत आहे असा वैज्ञानिक विचार समाजमनात रुजवत अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे समूळ नायनाट करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या या थोर महामानवास विनम्र अभिवादन…