इतिहास

तामिळनाडूतील तिरुवरुर जिल्हा – एक बौद्ध संस्कृतीचे प्राचीन स्थळ

तामिळनाडू राज्यांमधील नागपट्टिनम, पेराम्बलुर आणि अरियालुर या जिल्ह्यांमधील सापडलेल्या बुद्धमूर्तींची माहिती आपण मागील तीन पोस्टमध्ये घेतली. त्याच प्रमाणे तामिळनाडू जिल्ह्यामध्ये तिरुवरुर नावाचा एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात सुद्धा बौद्ध संस्कृतीचे अनेक अवशेष व शिल्पे आढळून आली आहेत. ९ व्या आणि ११ व्या शतकातील ग्रॅनाईट पाषाणातील अनेक बुद्धमूर्ती येथे आढळून आल्या आहेत. १३ व्या शतकातील तारा देवतेची मूर्ती ही किराणुर गाव, नन्नीलाम तालुका येथे आढळली आहे. धातूच्या बुद्धमूर्ती, पाषाणाच्या छोट्या मूर्ती आणि बोधिसत्वाच्या मूर्ती सेल्लुर गाव, कोडावसल तालुका, तिरुवरुर जिल्ह्यात मिळाल्या आहेत.

तामिळनाडूतील तिरुवरूर जिल्ह्यापासून १९ कि.मी. दूरवर तीरूनेल्लीकवल नावाचे रेल्वे स्टेशन आहे. तेथून जवळच असलेल्या एका तलावाजवळील पिंपळवृक्षाखाली एक काळ्या पाषाणातील बुद्धमुर्ती आहे. तिची उंची ४ फूट ६ इंच आहे. ही मूर्ती ९ व्या – १० व्या शतकातील असून तेथील तलावातील गाळात उपडी पडली होती. व तो सपाट दगड समजून पिढ्यानपिढ्या लोक त्यावर कपडे धुत होते. परंतु काही कारणाने त्या शिळेला बाहेर काढल्यावर ती मूर्ती असल्याचे ध्यानात आले. तेव्हा तिची स्थापना तेथील पिंपळवृक्षाखाली केली गेली.

हे पण वाचा : अरियालुर – प्राचीन बौद्ध संस्कृतीचे तामिळनाडूतील केंद्र

या बुद्धमूर्तीची उश्नीशा तुटलेली आहे. फारच थोड्या जणांना ही बुद्धमुर्ती आहे हे ज्ञात आहे. पण तिचे काय करायचे आणि काय महत्व आहे याची जाणीव नाही. २०१८ मध्ये “गजा” वादळ येऊन इथे धडकले होते. तेव्हां अनेक मोठाले वृक्ष उन्मळून पडले. परंतु सुदैवाने या मूर्तीला व तेथील वृक्षाला काही झाले नाही. येथे जवळ राहणारे रहिवासी यांना ही बुद्धमूर्ती आहे हे माहित आहे. म्हणून निदान ते तेथील सणांच्या दिवशी बुद्धमूर्तीला वंदन करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवितात.

हे पण वाचा : तामिळनाडूतील पेरंबलूर – बौद्ध संस्कृतीचे केंद्र

तामिळनाडूत साक्षरतेचे प्रमाण जास्त असलेतरी धार्मिक दांभिकतेचे पागोटे अनेकांनी डोक्याला गुंडाळले आहे. त्यामुळे जेथे जेथे बुद्धमूर्ती सापडल्या आहेत, त्या गावात बुद्धाविषयी जागृतता बिलकूल दिसून येत नाही. खरेतर हजारो वर्षांपूर्वी तोच परिसर बौद्ध संस्कृतीने दुमदुमला असेल. असंख्य विहारे तेथे असतील. भिक्खुंचे सुत्त पठण होत असेल. त्रिपिटकांचा अभ्यास चालत असेल. असे असताना दक्षिण भारतातील धम्मास कशामुळे एवढी ग्लानी आली आणि क्षती पोहोचली याचा विचार करताना खेद वाटतो.

दुर्लक्षित पडलेली बुद्धशिल्पे पाहून मनास यातना होतात. मानव जातीच्या कल्याणाचा सत्य आणि विज्ञानवादी धर्मोपदेश इतका विस्मरणात कसा काय गेला ? म्हणूनच हे सर्व पाहून भविष्यात तिथल्या मातीत बुद्ध पुन्हा रुजावा आणि त्याचा डेरेदार वटवृक्ष व्हावा अशी मी मनोमन प्रार्थना करतो.

हे पण वाचा : तामिळनाडूतील नागपट्टिनम – एक बौद्ध संस्कृतीचे केंद्र

सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर जावे.
https://www.wayofbodhi.org/buddhism-in-thiruvarur-tamil-na…/

-संजय सावंत,नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)