ब्लॉग

या महत्त्वाच्या जबाबदारी बौद्धाचार्यांच्या शिरावर

“बौद्धाचार्य” ही संकल्पना केवळ बौद्ध पद्धतीने लग्न लावणे, वा अंत्यसंस्कार करणे ,इतपतच मर्यादित नसून, धम्माचा प्रचार आणि प्रसार तळागाळातील जनसामान्यांपर्यंत करुन, प. पू. बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकार करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारीही या तमाम बौद्धाचार्यांच्या शिरावर आहे. “बौद्धाचार्य ” म्हणजेच “बौद्धांचा आचार्य – शिक्षक” अशी व्यापक व समर्पक व्याख्या “बौद्धाचार्य” या शब्दाची आहे.

आचार्य अश्वघोष, आचार्य गुणमती, आचार्य स्थिरमती, आचार्य धवलकीर्ती, आचार्य विमलकीर्ती,आचार्य शीलभद्र , आचार्य असंग,आचार्य वसुबंधु, आचार्य दिन्नाग, आचार्य आर्यनाग यांसारख्या महान “बौद्धाचार्यां” ची गौरवशाली परंपरा “बौद्धाचार्य” या संकल्पनेच्या पाठीमागे आहे. त्यामुळे प्रत्येक ” बौद्धाचार्या” ने ही तितकेच विद्वान , शीलवान, गुणवान, प्रज्ञावान असावे,असेच मला अगदी प्रामाणिकपणे वाटते.

बुद्ध, धम्म, संघ या बरोबरच पाली भाषा, धम्मलिपी, धम्मग्रंथ त्रिपिटक, मिलिंदोपन्हो, महावंस, दीपवंस, दिव्यावदान, अशोकावदान, कुणालावदान, जातक कथा, मुनिसूत्र, राहुलवाद, थेरगाथा, थेरीगाथा,यांसारखे धम्म वाड्.मय ,बुद्धचरित्र, अशोक चरित्र, सम्राट अशोक, सम्राट मिलिंद, सम्राट कनिष्क, सम्राट हर्षवर्धन, सातवाहन, इक्ष्वाकू, व पाल राजवंश यांचा इतिहास व त्यांचे बुद्ध, धम्म व संघासाठीचे योगदान, भारतातील तसेच जगातील बुद्ध धम्म व त्याचा गौरवशाली इतिहास, इत्सिंग, ह्यू-एन् -त्सँग, फाहियान यांसारख्या चिनी प्रवाशांची चरित्रे व त्यांची माहिती, सम्राट अशोकाने संपूर्ण जंबुद्वीपात निर्माण केलेले ८४,००० बौद्ध स्तूप,बौद्ध लेणी, ब्राह्मी व खरोष्ट्री लिपीबद्दलची माहिती, व त्यांमधील शिलालेख, गुहालेख, स्तंभालेख, प्रस्तरलेख, बौद्ध लेणी, बौद्ध चित्र व शिल्पकला,बौद्ध प्रतिमाशास्त्र, बौद्ध स्थापत्यशास्र, बौद्ध पुरातत्वशास्त्र, बौद्ध इतिहास संशोधन यांचे सखोल ज्ञान ” बौद्धाचार्यां ” नी प्रत्येक धम्मबांधवापर्यंत नेऊन पोहचवायला हवे,असे मला वाटते.

कारण, यामुळे बौद्ध संस्कृतीबद्दल जिज्ञासा निर्माण होऊन, आपलेही बौद्ध तरुण अभ्यासक, संशोधक होतील, आणि तेच खरे समर्पित बौद्ध बनून , तथागतांचा आदी कल्याणं, मज्झे कल्याणं, परियोसान कल्याणं असलेला सद्धम्म घराघरात पोहचवून, बाबासाहेबांचे भारत बौद्धमय बनविण्याचे स्वप्न साकार करु शकतील. आचार्य अश्वघोष, दिन्नाग, वसुबंधु, जेम्स प्रिन्सेप, अलेक्झांडर कनिंगहँम, महापंडित राहुल सांकृत्यायन, अनागारिक धम्मपाल यांसारखे दिग्गज व जागतिक किर्तीचे बौद्ध विद्वान आपल्यामध्येही निर्माण व्हावेत व तशी जागृती धम्मबांधवामध्ये करून देणे, हीच खरी भारतातील तमाम “बौद्धाचार्यां” ची सर्वात मोठी जबाबदारी आहे…..”

लेखक -अशोक नगरे 
मोडी लिपी तज्ज्ञ, धम्मलिपी ब्राह्मी, बौद्ध लेणी, बौद्ध शिल्पकला – चित्रकला, बौद्ध स्थापत्य, बौद्ध पुरातत्व व बौद्ध इतिहास अभ्यासक,
पारनेर, अहमदनगर.