बुद्ध तत्वज्ञान

यामुळे गौतमाने तपश्चर्या त्यागली…

गौतमाची तपश्चर्या आणि आत्मपीडा उग्र स्वरूपाची होती. ही खडतर, कठोर तपश्चर्या त्याने दिर्घकाळ म्हणजे सहा वर्षापर्यंत केली. सहा वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्याचा देह एवढा क्षीण झाला त्याला देहाची हालचाल करणेही कठीण झाले. तरीही त्याला प्रकाशाचे दर्शन झालेच नाही. जगात दुःख आहे या समस्येने त्याचे चित्त व्यापले होते. या समस्येचे समाधान त्याला कोठेही दृषटीपथात आढळत नव्हते.

त्याने आत्मसंशोधन केले, ” हा काही मार्ग नव्हे, तृष्णारहीत होण्याचा , ज्ञानप्राप्तीचा किंवा मुक्तीचा”. “काही सुखप्राप्तीसाठी कष्ट करतात. बिचारे प्राणीमात्र खोट्या आशेपायी आपले ध्येय हरवून बसतात. सुखाच्या पाठी लागलेल्या या क्षुद्र जीवांच्या वाट्यावर शेवटी दुःखच येते.”

“मी प्रयत्नांना दोष देणार नाही. परंतु हे प्रयत्न आधाराशिवाय आकाशात उडण्याचे प्रयत्न होते. मला असा प्रश्न पडतो की, देहाचे उत्पीडन देहाचे क्लेश यालाच धर्म म्हणावे काय? मनाची प्रेरणा , मनाची अज्ञाच देहाला कर्म करण्यास किंवा न करण्यास प्रवृत्त करते. म्हणूनच चित्त साधना हीच सर्वात योग्य आहे. विचारही देह हा कुत्र्यासारखा आहे.

जय फक्त देहाचाच विचार करायचा असेल तर शुद्ध अन्न गृहण करूनही देहाची पवित्राता राखता येईल. परंतु जो कर्ता आहे त्याच्या पावित्र्याचे काय? मग या सर्वांचे प्रयोजनच काय? ज्याचे चित्त शांत नाही , तो चित्ताच्या एकाग्रतेतून साध्य करावयाच्या ध्येयाप्रती कसा पोहचू शकतो? शारीरिक गरजांची नित्यपूर्ती करूनच चित्त शांती आणि चित्त संयम योग्य प्रकारे साधता येईल.

त्याकाळी उरूवेला येथे सेनानी नावाचा गृहस्थ निवास करीत होता. सुजाता त्याची कन्या.
सुजाताने पिंपळाच्या वृक्षाला नवस केला होता. तिला पुत्र झाला तर ती दरवर्षी त्या पिंपळाच्या वृक्षाची पूजा बांधणार होती. तिची मनोकामना पूर्ण झाली. तिने आपली दासी पन्ना हिला पूजेसाठी जागा स्वच्छ करण्याच्या हेतूने वृक्षाकडे पाठविले. पन्नेला गौतम वृक्षाखाली बसलेला दिसला. तिला वाटले की वृक्षदेवच प्रत्यक्ष अवतरला आहे.

सुजाताने स्वतः येऊन गौतमाला सुवर्ण पात्रातून अन्न अर्पण केले. गौतम अन्न पात्र घेऊन नदीकाठी गेला. त्याने सुप्पतिठ्ठ घाटावर स्नान केले. आणि अन्न गृहण केले. अशाप्रकारे त्याची तपश्चर्या समाप्त झाली. गौतमाने तपश्चर्येचा, आत्मक्लेशाचा मार्ग त्यागला हे पाहून त्याच्यासंगे गे पाच परिव्राजक होते ते रूष्ट झाले आणि निराश होऊन गौतमाला सोडून निघून गेले.