बातम्या

सम्राट अशोकाचे एकमेव मौल्यवान शिल्प नष्ट होण्याच्या मार्गावर?

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने (एएसआय) कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील महत्त्वाचे बौद्ध स्थळ असलेल्या सन्नती मध्ये उत्खननात भारतातील सर्वात मौल्यवान शिल्प-पोर्ट्रेट सापडले होते. ते सापडलेलं मौल्यवान शिल्प भारतातील महान सम्राट अशोकाचे होय. सन्नती मध्ये केलेल्या उत्खननात सापडलेलं मौर्य सम्राटाचे हे शिल्प एकमेव उपलब्ध शिल्प आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे शिल्प सुरक्षित राहिले नाही. असे वृत्त नुकतेच ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात आले होते.

सन्नती मध्ये उत्खनन स्थळाजवळ संरक्षक भिंती नसलेल्या एका छोट्या खुल्या शेडमध्ये सम्राट अशोकाचे हे शिल्प ठेवण्यात आले आहे. उत्खननामध्ये सापडलेले अनेक मौल्यवान वस्तू विखुरलेल्या अवस्थेत आहेत. यातील फक्त काही वस्तूच पुरातत्व संग्रहालयात नेण्यात आले आहेत. हा सर्व प्रकार प्रशासनाच्या उदासीनतेमुळे असून भारतातील प्रत्येक प्राचीन बौद्ध वस्तू हा देशाचा वारसा आहे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसतेय.

उत्खननासाठी २४ एकर जमीन अधिग्रहण करण्याखेरीज कर्नाटक राज्य शासनाने ऐतिहासिक जागेचे संवर्धन करण्यासाठी फारसे काही केलेले नाही. या परिसरात मुठभर संशोधन अभ्यासक, इतिहासकार आणि उत्साही लोकांच्या भेटी सोडल्या तर एएसआय साइट वर्षभर निर्जन दिसत असते. या साईटच्या प्रवेशद्वारावर पाच सशस्त्र सुरक्षारक्षक असतात.

सन्नती गावाचा इतिहास :

कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तपूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठी सन्नती हे एक लहान गाव आहे. १९८६ मध्ये चंद्रलम्बा मंदिर परिसरातील काली मंदिराची छत कोसळल्यानंतर सन्नती गावाला ओळख मिळाली.

मंदिराच्या पायाभरणीत प्राकृत भाषेमध्ये आणि ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेल्या ऐतिहासिकदृष्ट्या मौल्यवान असलेले सम्राट अशोकाचे शिलालेख आढळून आले. त्यामुळे सम्राट अशोककालीन इतिहासाचा उलगडा झाला आणि भारतभरातील इतिहासकारांना सन्नती गाव आकर्षित झाले.

त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने (एएसआय) सन्नती व जवळच्या कानगनाहल्ली येथे उत्खनन करण्यास सुरवात केली. त्या परिसरात भव्य महा स्तूपाचा शोध लागला आणि त्यात सापडलेल्या शिलालेखानुसार अधोलोका महा-चैत्य (महान स्तूप) असल्याचे संदर्भ मिळाले. विशेष म्हणजे आपल्या सिंहासनावर राण्यांसोबत बसलेल्या सम्राट अशोकाचे शिल्प-पोर्ट्रेट देखील सापडले.

उत्खननात जवळजवळ ६० शिल्पबद्ध घुमट आणि स्लॅब, सातवाहन काळातील मूर्तिकला-चित्र, तसेच सम्राट अशोकाने भारताच्या वेगवेगळ्या भागात पाठविलेल्या बौद्ध धम्मप्रचारकरांचे विशिष्ट वैशिष्ट्ये आढळली आहेत. चिकणमाती पेंडंट्स, काळ्या पॉलिश मातीची भांडी, सातवाहन आणि पूर्व-सातवाहन नाणी, तांबे, हस्तिदंत आणि लोखंडी वस्तूंनी बनविलेले दागिने, पक्के मार्ग, घरे, चुनखडीची फरशी, गोळ्या, शिल्पे आणि टेराकोटाच्या वस्तू. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की सन्नती रणमंडल (युद्धक्षेत्र) हा २१० एकरात पसरलेला किल्लेदार भाग होता, त्यापैकी आतापर्यंत फक्त एक – दोन एकर जमिनीवर उत्खनन करण्यात आले आहे.

सन्नती येथे सम्राट अशोकाची समाधी?

भंते तिसाव्रो हे ७० वर्षांचे बौद्ध भिक्खू असून बौद्ध अवशेष वाचवा अभियानचे प्रमुख आहेत. सध्या सन्नती येथील ऐतिहासिक जागा विकसित करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारवर दबाव आणण्याचे काम करत आहेत.

भन्ते टिसाव्रो यांच्या मतानुसार सन्नती येथे सम्राट अशोकाने आपल्या जीवनाच्या अंतिम काळात प्रवास केला असावा. “अशोकाने दक्षिण भागात तीनदा प्रवास केल्याचे दर्शविणारे संदर्भ आहेत. दक्षिणेकडील तिसऱ्या प्रवासानंतर ते उत्तरेकडे परत गेल्याचे कोणतेही संदर्भ नाही.” विशेष म्हणजे महान सम्राट अशोकाने बनवलेला महा स्तूप आणि त्यांची एकमेव जिवंत प्रतिमा सन्नती येथे आहे.

एएसआयने उत्खनन केलेले सन्नती हे भारतातील सर्वात मोठे बौद्ध स्थळ आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असूनही, तो भारताच्या पर्यटन नकाशावर नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *