‘थ्री इडियट’ चित्रपटास या वर्षी २५ डिसेंबर रोजी दहा वर्षे होतील. चीन-जपान मध्ये सुद्धा लोकप्रिय झालेला व पुरस्कार पटकवणारा तसेच तामिळमध्ये आणि मेक्सिकन देशात रिमेक झालेल्या या चित्रपटात लडाखचे सुंदर चित्रण आहे. अमिर खानची भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये दाखविलेली रॅचोंची शाळा ही प्रत्यक्षात लडाख मधील आहे. या शाळेचा परिसर हा बौद्ध संघाराम विहारासारखा असून मुख्य प्रवेशद्वारावर ‘ड्रक पद्मा कार्पो स्कूल’ असे लिहिले आहे.
‘थ्री इडियट’ सिनेमा २००९ मध्ये प्रसिद्ध झाल्यावर या शाळेची लोकप्रियता कमालीची वाढली. देशभरातून सुट्टीच्या मोसमात असंख्य पर्यटक ही शाळा बघण्यास येऊ लागले आणि अजूनही येतात. लडाखमधील थंडगार वाळवंटी प्रदेशात व लेह पासून १५ किलोमीटर अंतरावर असलेली ही शाळा बौद्ध परंपरा आणि तत्वज्ञान यांचा अभिमान बाळगते. तेथील प्रिन्सिपल स्टँझिन कुनझ्यागं यांनी सुद्धा सांगितले की शाळा रँचोची शाळा म्हणून न ओळखता ‘ड्रक पद्मा कार्पो स्कूल’ या नावाने ओळखली जावी.
‘थ्री ईडीयट’ चित्रपटाची क्रेझ अजूनही असल्याने ही सुंदर शाळा बघण्यास जेव्हा पर्यटक येतात तेव्हा चतूरची भिंत बघतात. शाळेतील बौद्ध पेंटिंग, मुलांनी केलेल्या हस्तकलेच्या वस्तू पाहतात. परिसर न्याहळतात. या शाळेची अनेकदा डागडुजी करण्यात आली आहे. व अमिर खानने ही मध्यंतरी भेट देऊन मदत केली आहे. इथल्या मुख्यध्यापकांनी सांगितले की येणाऱ्या पर्यटकांनी ध्यानात ठेवावे की इथे ज्ञानार्जनाचे महत्वपूर्ण कार्य चालते. तसेच या शाळेत लहान मुलीमुलेसुद्धा शिकतात याचे भान ठेवावे. व शांतता बाळगून निसर्गरम्य परिसरातील ही शाळा पहावी.
– संजय सावंत