आंबेडकर Live

देशभरातील वंचितांना आरक्षण देणाऱ्या बाबासाहेबांना फी भरून शाळेत प्रवेश घेतला होता

डॉ.बाबासाहेबांनी शिक्षणाची कास धरली नसती तर चळवळीची क्रांती घडलीच नसती. त्यांच्या क्रांतीच्या अनेक घटनांनी एक नवा इतिहास घडवला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी भारतीय समाजात अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या समाजात प्रचंड जागृती निर्माण झाली. आज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन यानिमित्त…

ज्ञानरूपी आकाशात आपल्या विलक्षण प्रतिभेने तेजस्वी वलय निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शालेय जीवनात पहिले पाऊल टाकले ते साताऱ्याच्या शाळेत. तो दिवस म्हणजे ७ नोव्हेंबर १९००. ज्ञानरूपी आकाशात भरारी मारण्याचं बळ त्यांना दिलं ते सातारच्या मातीनं. म्हणूनच या मातीला मातीतून घडलेल्या या प्रज्ञावंताला अभिवादन करण्यासाठी ७ नोव्हेंबर रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन’ आणि मोठ्या साजरा होत आहे.

डॉ. बाबासाहेबांचे उत्साहात बालपण सातारा येथे गेले. ७ नोव्हेंबर रोजी भीमरावाने साताऱ्यातील छत्रपती १९०० प्रतापसिंह हायस्कूलमध्ये (त्यावेळचे सातारा हायस्कूल) इयत्ता पहिली इंग्रजी या वर्गात प्रवेश घेतला. हजेरीपटावर ‘भिवा’ असे त्यांचे नाव होते. चार वर्षे त्यांनी या शाळेत ज्ञानसाधना केली. याच शाळेत त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला. त्यावेळी भीमराव आंबेडकर हे आपल्या परिवारासह सदर बझार येथील सिटी सर्व्हे नंबर एक मधील ब्रिटिशकालीन बंगल्यात राहत होते. तेथून ते राजवाडा येथील सातारा हायस्कूल हा प्रवास पायी करायचे. त्याच्या पदस्पर्श लाभलेल्या या मार्गालाही विशेष महत्त्व आहे.

सातारा येथील सरकारी हायस्कूल, आज ही शाळा प्रतापसिंह हायस्कूल म्हणून ओळखली जाते.

भीमरावाच्या बालपणातील वास्तव्याने पुनित झालेली ही शाळा समस्त भारतीय समाजाला मानवता, समानता आणि प्रगतीची शिकवण देत आहे. तत्कालीन ‘गव्हर्नमेंट हायस्कूल’ आज प्रतापसिंग राजे हायस्कूल नावाने ओळखले जाते. या सुवर्ण दिवसाची ‘भीमस्मृती’ या शाळेने जपली आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये बाबासाहेबांचे नाव आणि १९१४ या क्रमांकासमोर स्वाक्षरी आहे. इंग्रजीत असलेली त्यांची स्वाक्षरी एखाद्या उच्चविद्याविभूषितालाही लाजवेल अशी सुंदर आहे.

शाळेच्या रजिस्टरमध्ये भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे.

‘ऐतिहासिक दस्तावेज’ म्हणून शाळा प्रशासनाने ती जिवापाड सांभाळून ठेवली आहे. शाळेला भेट देणारी प्रत्येक व्यक्ती ‘बाबांचा हा खूपच अनमोल ठेवा…’ अशी भावना व्यक्त केल्याशिवाय राहत नाही. डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणाची कास धरली नसती तर चळवळीची क्रांती घडलीच नसती. त्यांच्या क्रांतीच्या अनेक घटनांनी एक नवा इतिहास घडवला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी भारतीय समाजात अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या समाजात प्रचंड जागृती निर्माण झाली.

डॉ.आंबेडकरांनी शिक्षणाने एवढा नावलौकिक मिळविला की, अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने निवडलेल्या निमित्त जगभरातील बुद्धिमान शंभर विद्यार्थ्यांच्या सूचीत पहिल्या क्रमांकावर त्यांच्याच नावाची मोहोर उमटली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन’ म्हणून ‘प्रवर्तन’चे अध्यक्ष अरुण जावळे गेल्या पंधरा वर्षांपासून साजरा करीत आहेत.

७ नोव्हेंबर हा दिवस राज्य सरकारने ‘डॉ.आंबेडकर शाळा प्रवेश दिन’ म्हणून घोषित करावा यासाठी ते अनेक वर्षांपासून तन-मन-धनाने कार्य करीत होते. तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी चर्चा केल्यानंतर बडोले हे साताऱ्यात आले असता त्यांनी या शाळेला भेट दिली होती. अरुण जावळे यांचे निवेदन हातात घेऊन बडोले म्हणाले, ‘डॉ. आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यभर साजरा केला जाईल तसेच याची देशात कशी अंमलबजावणी करता येईल यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू’ त्यांच्या या घोषणेने परिवर्तनवादी चळवळीत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले.

डॉ.आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिले आहे. ज्यांनी इतरांच्या परिस्थितीचा विचार केला त्या बाबासाहेबांनी मात्र फी भरूनच शाळेत प्रवेश घेतला होता हे येथे उल्लेखनीय.

मिलिंद मानकर, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *