मज्झीम निकायातील अरिय परियेसन सुत्तात तसेच विनयपिटक यात उरुवेला येथे सिद्धार्थाच्या सहा वर्षे अतिशय कठोर ध्यान अभ्यासाचे वर्णन केले आहे. (उरुवेलाचे वर्णन करताना उदान या ग्रंथात भ. बुद्ध यांनी या स्थळाला “पटिसल्लान सारूप्पम” म्हणजेच ध्यानासाठी अतिशय अनुकूल जागा असा केला आहे.) सिद्धार्थ गोतमाचा प्रत्येक दिवस एक नवीन अनुभूती व प्रत्यक्ष ज्ञानाच्या समीप घेऊन जाणारा होता. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पहाटे सिद्धार्थ गोतम अतिशय प्रसन्न मनाने उठून नेरंजना नदीत जाऊन स्नान केले.
(आज या नदीला फाल्गु म्हणून ओळखले जाते. मात्र ते चुकीचे आहे. फाल्गु ही नेरंजरा / नेरंजना आणि मोहना नदीच्या संगमातून तयार झाली आहे. पालि साहित्यात नेरंजना नदीचे नाव ‘निलाजला’ म्हणजेच निर्मल जल असा होतो. या नदीचा उगम हजारीबाग पठारातील चतरा या गावात होतो. पुढे हंटरगंज मार्गे ती बुद्धगये पासून अंदाजे २०० मीटर लांबून गयाच्या दिशेने वाहते. मोहना या नदीचा उगम देखील हजारीबाग पठारावरील कोरंबे पहार येथे होतो. पुढे इतकोरी मार्गे येऊन ग्रँड ट्रंक रोड ओलांडत ती बुद्धगयेच्या पुढे येऊन नेरंजरा नदीला मिळते व यांच्या संगमातूम फाल्गु नदी तयार होते.)
नेरंजरा नदीत स्नान केल्यानंतर सुजाताने आणलेली खीर सिद्धार्थाने खाल्ली आणि अतिशय प्रसन्न चित्ताने बोधिवृक्षच्या छायेत बसून त्यांनी ध्यान अभ्यासाला सुरुवात केली. आतापर्यंतच्या संपूर्ण अभ्यासाची उजळणी करत, एक एक पायरी संपूर्ण सत्या पर्यंत पोहचत होते. वैशाख पौर्णिमेच्या रात्रीच्या शेवटच्या प्रहरात ध्यान मार्गाचा अवलंब करीत, संपूर्ण सत्याचे अनुलोम – प्रतिलोम प्रकारे अभ्यास करत, सिद्धार्थ गोतमाला पूर्ण सत्य ज्ञान झाले व ते “बुद्ध” झाले.

ज्या ज्ञानासाठी त्यांनी सर्वसंग परित्याग केला होता ते ज्ञान गवसले. संपूर्ण मानवजातीला दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग त्यांना गवसला. एक अपार समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. समाधान आणि आनंद त्यांच्या रोमारोमात पसरला होता. याच सौख्याचा पुन्हा प्रत्यय घेण्यासाठी व बोधीवृक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी एक आठवडा त्याच्या खाली बसून ध्यान केले. नंतर बोधीवृक्षाच्या पूर्वेकडे जाऊन त्यांनी पुन्हा एकदा या वृक्षाकडे अनिमेष नेत्रांनी पाहत ध्यान केले. त्या ठिकाणी विटांचे बांधकाम असलेले “अनिमेष लोचन” नावाचे चैत्य बांधले गेले.

तिसऱ्या आठवड्यात त्यांनी चंक्रमण करत ध्यान केले. आज तेथे महाबोधी महाविहाराच्या पूर्वेला ६० फूट लांब आणि ३ फूट उंच चंक्रमण पथ तयार केला आहे. तेथेच “रत्नचंक्रम” नावाचा चैत्य बांधण्यात आला आहे. चवथा आठवडा त्यांनी आज ज्या ठिकाणी “रत्नघर” आहे तेथे बसून ध्यानात व्यतीत केला. त्यानंतर बोधीवृक्षाच्या पूर्वेला असलेल्या अजपाल वृक्षाच्या छायेत बसून ध्यान केले. त्यानंतर सहावा आठवडा त्यांनी मुचलिंद नावाच्या वृक्षाच्या खाली बसून ध्यान केले. त्याच्याच बाजूला मुचलिंद नावाचा तलाव देखील आहे. सातवा आठवडा भ.बुद्धांनी बोधीवृक्षाच्या दक्षिणेला असलेल्या राजायतन वृक्षाखाली ध्यान करून व्यतीत केला. संपूर्ण सात आठवड्यात बुद्धांनी कोणतेही अन्नग्रहण केले नव्हते. केवळ विमुक्तीच्या समाधानात त्यांनी संपूर्ण ध्यानमार्गाचे सुख अनुभवत होते.

सात आठवड्या नंतर बुद्धांनी पुन्हा नेरंजना नदीत जाऊन स्नान केले. त्यावेळे उत्कल प्रदेशातून (आत्ताचे ओडिशा) तपस्सू आणि भल्लिक / मल्लिक या व्यापारी तेथून जात असताना त्यांनी बुद्धांना मठ्ठा आणि लाडू (मंथ मधुपिंडिक) दिले जे त्यांनी राजायतन वृक्षाखाली बसून स्वीकार केले. त्यानंतर बुद्ध अजपाल वृक्षाखाली बसून धम्मप्रचार संबंधित विचार करत उदान केले “रट्ठा रट्ठम विचरिस्सम सावके विनयं पुथु” म्हणजेच मी अनेक शिष्यांना हा मार्ग सांगून एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात (धम्मप्रसार करत) राहील. नंतर त्यांनी वाराणसीच्या इसीपतन मिगदाय वनाकडे चालत निघाले.
अतुल भोसेकर
संदर्भ:
सुत्त निपात मधील प्रधान सुत्त
जातक
The Life of Buddha
बुद्धकालीन भारतीय भूगोल
सारत्थप्पकासिनी
Ancient Geography of India
महापरिनिर्वाण यात्री – ले. मुरलीधर भोसेकर