इतिहास

त्रिपुरा म्हणजे एकेकाळचा प्राचीन बौद्ध संस्कृतीचा प्रांत; थेरवादी व महायान संस्कृतीचे मोठे केंद्र होते

भारतातील सात भगिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यात त्रिपुरा हे एक छोटेसे राज्य आहे. येथे सद्यस्थितीत हिंदूंचे प्राबल्य जास्त असून मोग,चकमा आणि बरुआ या बौद्ध जमातींची एकूण मिळून लोकसंख्या दोन लाखाच्या वर आहे. या राज्यात १२ व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म बहरलेला होता. परंतु परकीयांचे आक्रमण, पुरोहितांचा कावेबाजपणा यामुळे धम्म लोप पावला. इथल्या राजालाच पुरोहितांनी अंकित केल्यामुळे राजाने हिंदू धर्मास राजाश्रय दिला. यामुळे बौद्ध संस्कृतीचे नामोनिशान राहिले नाही.

मात्र १७ व्या शतकापासून तो पुन्हा उजागर होऊ लागला. त्याच बरोबर गेल्या काही वर्षात पुरातत्व खात्याने अनेक ठिकाणी केलेल्या उत्खननामुळे त्रिपुराची मूळ बौध्द संस्कृती उजेडात येत चालली. यामुळे अनेक इतिहासकार, संशोधक देखील अचंबित झाले असून बंगाली ठसा असलेले त्रिपुरा एकेकाळी थेरवादी व महायान संस्कृतीचे मोठे केंद्र होते हे दिसून येत आहे.

वास्तविक त्रिपुरा या शब्दाचा उगमच मुळात त्रिरत्ना वरून झाला असून दुसऱ्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत इथल्या प्रत्येक राजाने बुद्धिझमचे पालन केले होते. सतराव्या शतकात म्यानमारवरून मोग जमाती येथील डोंगराळ भागात येवून पुन्हा स्थाईक झाल्या. त्याच बरोबर चकमा आणि बरुआ हा बौद्ध समाज देखील मैनामति, सोमपुरा या बंगाल प्रांतातून येवून येथे स्थायिक झाला. बुद्ध वंदनेचे स्वर आसमंतात निनादू लागले. बंग भाषा येथे रुजल्याने ८० % लोक बंगाली बोलतात. सन १८८१ मध्ये इथली राणी भानुमती यांचे निधन झाल्याने राजा दुःखात होरपळत होता. त्यावेळी त्याच्या वाचनात रवींद्रनाथ टागोर यांची ‘भग्न हृदय ‘ ही कविता आली. ती राजाला इतकी भावली की त्याने रवींद्रनाथ टागोर यांचे सर्व साहित्य छपाई करून तेथे प्रसिद्ध केले. तसेच त्यांना तेथे बोलावून त्यांचा सन्मान केला. रवींद्रनाथ टागोर यांचे आध्यात्मिक गुरु भगवान बुद्ध होते. त्याचा पगडा त्रिपुरी साहित्यात देखील पडलेला दिसून येतो. त्रिपुराच्या जडणघडणीत रवींद्रनाथ टागोर आणि तिथले राजघराणे यांचा शेवटपर्यंत ऋणानुबंध राहिला होता.

त्रिपुराच्या प्रत्येक बौद्ध राजाने इथली परंपरा बळकट केली. म्हणूनच थेरवादी बौद्ध पंथाचे प्राबल्य त्रिपुराच्या अनेक प्राचीन अवशेषांमधून दिसून येते. आगरतळा येथील वेनुबन विहार, उत्तर त्रिपुरातील उदयन बुद्ध विहार, दक्षिण त्रिपुरा मधील मनू बकुल बुद्ध विहार ही स्थळे प्रसिद्ध आहेत. एप्रिल महिन्यात येथे यात्रा भरते त्यावेळी थायी, जपान, बांगलादेश, म्यानमार अशा अनेक देशातून पर्यटक येथे येतात. येथे साक्षरतेचे प्रमाण ९४.६५% असून केरळ राज्याला देखील त्यांनी मागे टाकले आहे. या शिक्षणामुळेच त्रिपुरातील सामाजिक स्थर उंचावत आहे. चकमा, उचाई, बरुआ आणि मोग या बौद्ध जमातींनी त्रिपुराचे रूप पालटले आहे. बक्सानगर स्तूप, पिलक, जोलाईबरी, सुंदरीतीला स्तूप अशा प्राचीन बौद्ध स्थळांना अनेक बौद्ध पर्यटक भेट देतात. काही हिंदू देवालयात पाच ध्यानी बुद्ध, चुंद, बुध्द प्रतिमा, अवलोकितेश्र्वर आणि तारा यांची प्राचीन चित्रे देखील दिसून येतात. अशोकाअष्टमी उत्सव मार्च – एप्रिलमध्ये रथयात्रा काढून मोठ्या प्रमाणात सर्व त्रिपुरा राज्यात साजरा होतो.

अशा या निसर्गरम्य त्रिपुरा राज्यात कधी गेलाच तर तेथील चकमा, मोग यांच्या बुध्द विहारांना आवश्य भेट द्या. त्यांचे आदरतिथ्य पाहून तुम्ही भारावून जाल. तरी त्रिपुरा म्हणजे एकेकाळचा प्राचीन बौद्ध संस्कृतीचा प्रांत आहे, हे लक्षात ठेवावे.

-संजय सावंत, नवी मुंबई, लेखक ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक