इतिहास

वैश्य टेकडी स्तूप हा सम्राट अशोक, पत्नी विदिशादेवी, पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांच्याशी संबंधित

भगवान बुद्धांच्या काळातच धम्माचा प्रसार सर्व भारतभर झाला होता. मध्यप्रदेश यास अपवाद नव्हता. भगवान बुद्धांच्या काळानंतर अनेक स्तूप मध्यभारतात उभारले गेले. सम्राट अशोक जेंव्हा वयाच्या १९ व्या वर्षी उज्जयनी प्रांताचे (अवंती) प्रमुख झाले तेंव्हा त्यांची ओळख तेथील एका व्यापाऱ्याची मुलगी ‘देवी’ वय वर्षे १५ हिच्याशी झाली. तिच्याबरोबर विवाह संपन्न झाल्यावर पुत्र महेंद्र यांचा जन्म उज्जैनमध्ये झाला. दोन वर्षानंतर मुलगी संघमित्रा हिचा जन्म झाल्यावर ‘देवी’ या २४४ कि. मी. दूर असलेल्या सांची जवळील विदिशा नगरीत स्थायिक झाल्या. सम्राट अशोक यांच्या पहिल्या पत्नी असून देखील त्यांच्या राज्यभिषेक प्रसंगी त्या पाटलीपुत्र येथे गेल्या नाहीत किंवा महाराणी म्हणून स्वतःला कधी मिरविले नाही. तसेच मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी देखील सम्राटांचे वारसदार म्हणून गादीवर कधी हक्क सांगितला नाही.

मध्यप्रदेशात सतधारा येथे अनेक स्तुप आहेत. स्तुपांसाठी तरी मध्यप्रदेश पहायलाच हवा.

‘देवी’ या बौद्ध तत्वांचे तंतोतंत पालन करणाऱ्या होत्या व मुलांवरती देखील त्याचेच संस्कार केले होते. वैश्य असल्यामुळे कदाचित त्यावेळच्या रीतिरिवाजानुसार मुलांना राजकीयदृष्ट्या त्यांनी सक्षम केले नाही. मात्र त्यांच्या या संस्कारामुळेच पुत्र महेंद्र यांनी बुध्दीझमला पूर्णपणे वाहून घेतले आणि सिंहल द्विपात धम्माचा प्रसार केला. सम्राट अशोक यांनी अत्यंत नाराजीने कन्येस श्रीलंकेस जाण्यास परवानगी दिली तेंव्हा संघमित्रा बोधिवृक्षाची फांदी घेऊन प्रथम विदिशा नगरीत आली. मायलेक यांची शेवटची गळाभेट सांची जवळ झाली. विदिशादेवी मातेने डोळे भरून लेकीकडे पाहिले. पुत्र महेंद्र तर दूर देशी गेला होताच आणि आता लाडकी लेक ही दुरावली जाणार होती. पण विदिशादेवी धम्मात परिपक्व झाल्या होत्या. त्यांनी खुशीने आणि कणखर राहून तिला शेवटचा निरोप दिला. त्यानंतर आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांची आणि मुलांची भेट झाली नाही. उज्जैन येथे वैश्य टेकडीखाली असलेला स्तूप आजही विदिशादेवी, पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांची आठवण करून देतो.

उज्जैनचा वैश्य टेकडी स्तूप हा सम्राट अशोक, त्यांच्या पत्नी विदिशादेवी, पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांच्याशी संबंधित आहे याची जरूर आठवण ठेवावी. धम्माचा जगभर प्रसार करण्यात यांचा वाटा मोलाचा आहे.

सम्राट अशोक यांच्या हयातीतच वयाच्या ५८व्या वर्षी देवी यांचे निधन झाले. तेव्हा सम्राट अशोकाने त्यांच्या स्मरणार्थ उज्जैन मधील कानिपुर गावाजवळील वैश्य टेकडी स्तूपाची डागडुजी केली असे समजले जाते. १९३६ साली ग्वाल्हेर संस्थानाच्या पुरातत्व खात्याने वैश्य टेकडीचे उत्खनन सुरू केले. परंतु पुरोहितांच्या दडपशाहीला बळी पडून काम बंद केले ते आजतागायत तसेच आहे. सन १९५१ मध्ये उज्जैन जवळील वैश्य टेकडी स्तूप हा सम्राट अशोक आणि देवी यांचेशी निगडित असल्याचे पुरातत्व विभागाने जाहीर केले आणि त्यास संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. परंतु आजूबाजूच्या जागेत शेती होत असल्याने अद्याप तेथील जमिनीचा वाद मिटला गेला नाही, याचे वाईट वाटते. सांची आणि सारू-मारू बौद्ध महोत्सव भरविणाऱ्या मध्यप्रदेश सरकारने अनेक बौद्ध स्थळांची डागडुजी केली आहे. त्याचप्रमाणे वैश्य टेकडीचे उत्खनन करून देवी यांनी उभारलेल्या स्तुपाला न्याय द्यावा, त्यास उजेडात आणावे असे वाटते

वैश्य टेकडी स्तुपाचे उत्खनन होऊन सांची स्तूपासारखे सुशोभीकरण झाले पाहिजे.

आज सांची जवळील विदिशा नगरीत बीजा मंडल विदिशा, खंबा बाबा (स्तंभ) अशा काही पुरातन वास्तू आणि अनेक देवींची (मालादेवी, मंगलादेवी, दुर्गादेवी) मंदिरे दिसून येतात. पण विदिशादेवी यांचे एकही स्मारक / स्तूप दिसून येत नाही. बौद्ध साहित्यात अनेक व्यक्तिरेखा अशा आहेत की त्यांचा इतिहास वाचला की मन गलबलून जाते. यशोधरा मातेप्रमाणे सम्राट अशोक यांच्या पत्नी विदिशादेवी यांच्याबद्दल देखील फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र त्यांनी मुलांना बुद्धांची शिकवण देऊन धम्मामध्ये असे परिपक्व केले की सर्व जगभर आज त्यांच्या दोन्ही मुलांची नावे दुमदुमत आहेत. म्हणूनच महाथेर महेंद्र, त्यांची लहान बहीण महाथेरी संघमित्रा आणि माता विदिशादेवी यांना मी मनोभावे प्रणाम करतो. अशा व्यक्ती जन्माला आल्या म्हणूनच धम्म या पृथ्वीवर सर्वत्र अस्तित्व राखून आहे. समस्त मानवजातीचे कल्याण करीत आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)