इतिहास

अद्वितीय शिष्य आनंद; बौद्ध इतिहासात आनंदाचे योगदान जाणून घ्या!

या जगात असंख्य गुरू होऊन गेले पण भगवान बुद्धांसारखे गुरु या जगात झालेले नाहीत. तसेच अनेक गुरूंचे अनेक शिष्य होऊन गेले परंतु आनंद सारखा बुद्धांचा शिष्य या जगामध्ये झालेला नाही. बौद्ध इतिहासात आनंदाचे योगदान अद्वितीय आहे. तो होता म्हणून पहिली धर्मसंगिती यशस्वी झाली आणि बुद्धवचने सुरक्षित झाली. तो होता म्हणून स्रियांना संघात प्रवेश मिळाला. तो होता म्हणून भगवान बुद्ध यांचा सहाय्यक झाला आणि उतारवयात त्यांची काळजी घेतली.

आनंद हा बुद्धांचा चुलत भाऊ. जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले आणि ते पहिल्यांदा कपिलवस्तुला आले, तेव्हा आनंदने त्यांना पाहिले. त्यांचा उपदेश ऐकला आणि तो त्यांचा निस्सीम शिष्य झाला. भगवान बुद्ध जेंव्हा ५५ वर्षाचे झाले तेव्हा त्यांना एका सहाय्यकाची गरज भासू लागली. आणि त्यावेळेला शिष्य आनंदाने भगवान बुद्ध यांचा सहाय्यक होण्याचे मान्य केले. आणि आनंद भगवान बुद्धांच्या अखेरच्या क्षणापर्यंत सोबत राहिला. त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द, प्रत्येक वाक्य न वाक्य आपल्या स्मरणात ठेवले आणि म्हणून आज आपल्याला बुद्धगाथा शुद्ध स्वरूपात वाचायला मिळत आहेत. त्याकाळी स्त्रियांवर सामाजिक बंधने असताना त्यांना संघात सामील करून घेणेसाठी आनंदने बुद्धांचे मन वळविले. तसेच बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सैरभैर न होता संघाची धुरा काहीकाळ सांभाळली.

आनंद यांना १२० वर्षांचे आयुष्यमान लाभले. पहिल्या धर्मसंगिती अगोदर अर्हत झाल्यावर स्मरणशक्तीच्या जोरावर ८४००० गाथांना अनुमोदन दिले. बुद्धांचा चालता बोलता इतिहास जगापुढे आणला. आयुष्याच्या अखेरीस मगध राज्यातून वैशालीकडे जाताना गंगा नदीच्या ठिकाणी त्यांचे परिनिर्वाण झाले. नदीच्या दोन्ही बाजूस त्यांचे स्तूप होते, पण गेल्या दोन हजार वर्षांत अनेकवेळा नदीने पात्र बदलून त्यांचे स्तूपही आपल्यात सामावून घेतले. चिनी प्रवासी भिक्खू फाइयांन आणि हुएंत्संग यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात वर्णिलेल्या आनंदच्या स्तुपस्थळांवरून अलीकडेच काही पुरातत्ववेत्त्यांनी शोध घेतला तेव्हा वैशालीजवळील चेचर गावातील नदीकिनारी भरपूर पुरातन अवशेष आढळले. व इथेच आनंद यांचे स्तूप असावेत असे मानण्यात आले.

चेचर गावाजवळील नदी

आज या गावात खाजगी चेचर संग्रहालय असून असंख्य प्राप्त पुरातन वस्तू तेथे दर्शनार्थ ठेवल्या आहेत. नदीकिनारी नूतनीकरण केलेल्या देवळाच्या गाभाऱ्यात भगवान बुद्ध यांची मूर्ती असून खरे सुखकर्ते आणि दुःखहर्ते म्हणून भक्तिभावाने पुजले जात आहेत. आज आनंद यांचा स्तूप भारतात अस्तित्वात नसला तरी म्यानमार देश आनंद यांना विसरला नाही. या देशात बगान इथे आनंद पॅगोडा हे सर्वात मोठे विहार आहे. व दररोज येथे असंख्य भाविक, पर्यटक भेट देतात. त्रिपिटकाचा शिल्पकार, उत्कृष्ठ संघचालक, उत्तम वक्ता, असलेल्या जगतगुरू बुद्धांच्या या शिष्यास माझे नम्र वंदन.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

4 Replies to “अद्वितीय शिष्य आनंद; बौद्ध इतिहासात आनंदाचे योगदान जाणून घ्या!

 1. विपसना साधनेच्या माध्यमातून बुद्ध इतिहास जगभर पसरावा
  लोक कल्याण व्हावे…

 2. भंते आनंदांची बायाग्राफी मीही भाषांंतरीत केली आहे. फारच अनुकरणीय त्यांचे जीवन आहे.
  धर्मराज कांबळे
  खारघर

  1. धर्मराज कांबळे सर , कृपया आपला मोबाईल नंबर कळवावा. किंवा खालील e मेल वर आपण केलेली पुस्तिका पाठवावी हि विनंती.
   sanjaysat@yahoo.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *