इतिहास

व्ही.फॉसबोल; जातकट्ठकथा प्रसिद्धीला आणण्याच्या कामी आयुष्याची बावीस वर्षे खर्चिली

पालिवाङ्मयांत जातकट्ठकथा या नांवाचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. ह्यांत एकंदर ५४७ कथा आल्या आहेत. त्यांपैकी काही कथांचा समावेश दुसऱ्या विस्तृत कथांत होत असल्यामुळे बाकी सरासरी ५३४ कथा शिल्लक रहातात. सिंहलद्वीपांत, ब्रह्मदेशांत आणि सयामांत जातकट्ठ कथा फारच लोकप्रिय आहेत. परंतु भारतात-त्यांच्या जन्मभूमीत-त्यांचा परिचय फार थोड्यांना आहे.

बुद्धसमकालीन समाजस्थितीवर लिहितांना बंगाली आणि इतर हिंदी तरुण पंडित अलिकडे त्यांचा फार उपयोग करूं लागले आहेत. परंतु त्यांनी जातकट्ठकथा समग्र वाचल्या असतील असे समजणे चुकीचे आहे. युरोपियन पंडितांनी लिहिलेल्या लेखांच्या आणि तयार केलेल्या अनुक्रमणिकांच्या भांडवलावरच बहुधा आमच्या पंडितांचा व्यापार चालला आहे.

जातकट्ठकथा प्रसिद्धीला आणण्याच्या कामी ज्यांनी परिश्रम केले त्यांत व्ही. फॉसबोल (V.Fausboll) ह्या जर्मन पंडिताला अग्रस्थान दिले पाहिजे. जर्मनी कोठे आणि सिंहलद्वीप कोठे! पण ‘किं दूरं व्यवसायिनाम्’ ह्या न्यायाने या गृहस्थाने तेथून सिंहली ताडपत्री पुस्तकें गोळा करून त्यांच्या आधारावर, दुसऱ्या कोणाचें साहाय्यनसतां, रोमन अक्षरांनी जातकट्ठकथा छापण्यास १८७७ साली आरंभ केला; व १८९६ साली हे काम संपविले.

पूर्व तयारीसाठी एक दोन वर्षे लागली असें गृहीत धरले तर ह्या कामी डॉ.फॉसबोल यांनी आपल्या आयुष्याची एकवीस बावीस वर्षे खर्चिली असे म्हटले पाहिजे, मध्यंतरी त्यांना पुष्कळ अडचणी आल्या. परंतु त्यांना न डगमगतां बोधिसत्त्वासारख्या अढळ उत्साहाने हे काम त्यांनी पार पाडले. आजला ह्या त्यांच्या जातकट्ठकथेच्या संस्करणाचा युरोपियन व एतद्देशीय विद्वानांना फारच उपयोग होत आहे.

डॉ.फॉसबोलच्या संस्करणाच्याच आधारें ह्या गोष्टी लिहिल्या आहेत. मूळ गोष्टींचे यथार्थ भाषांतर न करतां सार मात्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. जातकट्ठकथेतील मनोरंजक आणि बोधप्रद कथा मुलांमुलींच्या वाचनात येऊन प्राचीन समाजस्थितींचे त्यांना सहजासहजी ज्ञान व्हावें, आणि बोधिसत्त्वाच्या सद्गुणांच्या अनुकरणाने आत्मोन्नति करता यावी, या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *