बिहारच्या मोतिहारीतून आलेला रविशकुमार नावाचा युवक नोकरीच्या निमित्ताने एनडीटीव्हीत जॉईन झाला तेव्हा त्याचं काम होतं चॅनेलच्या ऑफिसात येणारी पत्रे तपासणं. योग्य त्या पत्रांना उत्तरे देणे, टिका केलेल्या पत्रांना आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं हे त्याचं काम होतं. कॉर्पोरेट पत्रकारितेचा गंध नसलेल्या या युवकाला त्या कार्यालयातल्या आपल्या बॉसेसचं तापट वागणं, आरडाओरडा करत काम करणं, प्रचंड इंग्राजळलेलं वातावरण नवीन होतं. तरी सलग काम करत राहीला.
पण बातमीदारी करण्याची खरी संधी मिळाली ती 2005 साली राजदीप सरदेसाई यांनी आयबीएन गृप सुरू केल्यानंतर. एनडीटीव्हीतून एक मोठा गट सरदेसाईंसोबत बाहेर पडला. आणि आजवर जो चंक शांत होता, ज्याला संधी नव्हती त्याने एनडीटीव्हीची सुत्रे हाती घेतली. तो काळ एनडीटीव्हीसाठी फार बरा नव्हता. प्रणब रॉय आणि विजय माल्या यांच्या गुडटाईम नावाचं वेंचर प्रचंड नुकसानीत गेलं होतं. विनोद दुआंनी रिटायरमेंट घेतलं होतं. आता त्यांचे शो होत नव्हते. पंकज पचौरी डॉ. सिंग यांच्या कार्यालयात नियुक्त झाले होते. अशा अवस्थेत रविश कुमार ने एनडीटीव्हीची सुत्रे हाती घेतली.
तो कदाचित पहिला संपादक आहे पोस्ट 92 चा. ज्याने लोकांमध्ये जाण्यास सुरूवात केली. 2006 साली त्याने सलग 52 आठवडे दलित की डायरी नावाचा एक शो टेलिकास्ट केला. त्यात भारतात घडलेल्या प्रमुख 52 जातीय अत्याचाराच्या केसेसचा एक मागोवा घेतला होता. हम लोग ते प्राईम टाईम या त्याच्या दोन महत्त्वाच्या गाजलेल्या शोच्या दरम्यान रविश की रिपोर्ट नावाचा जो शो होता तोच त्याला घराघरात घेऊन गेला. साध्यातल्या साध्या भाषेत प्रश्न विचारणे, लोकांशी सहज संवाद करणे, थेट पण विनम्र भाषेत मत मांडणे, लोकांना बोलतं करणे, त्यांना बोलू देणे, पत्रकारितेच्या नियमांविरोधात जाईल असे कोणतेही कृत्य न करण्याच्या त्याच्या शैलीमुळे तो प्रत्येकाच्या आवडीचा आहे.
रविश कुमारचं रविश कुमार पांडे असणं, त्याच्या डिबेट शो मध्ये फक्त सुधारणावादी ब्राह्मणच असणं, रोहीत वेमुलाच्या मृत्यूनंतर कन्हैय्या कुमारला त्याने उचलून धरणं वगैरे चूकीचं आहे हा त्याच्यावर होणारा आरोप हा कायम चालू राहील. मला त्यात फार काही गैर वाटत नसलं तरी काळजी करण्यासारखे ही वाटत नाही.
मुळात दिल्ली सर्कल मधल्या या माध्यमांशी, तिथल्या पत्रकारांशी, तिथल्या संपादकांशी आपण किती व्यवहार करतो हा मूळ प्रश्न आहे. संवाद प्रत्येकाशी असायला हवा. हा संवादच तुम्हाला त्या जागा भरून काढायला मदत करू शकतो. सरसकट नाकारण्याचे दिवस गेले. सामंजस्याने समायोजन करण्याचा हा काळ आहे.
हे एवढ्यासाठीच सांगणं आहे ते यासाठीच की, एनडीटीव्ही पूर्वी मुंबईत जेवढी जागा वापरत होतं आता त्याच्या पाव टक्केच जागा वापरत आहे. कॅमेरे परवडत नाहीत म्हणून मोजो म्हणजेच मोबाईल जर्नालिजम सुरू केलं. स्टूडीओत एक कॅमेरामन एक अँकर एक लाईटमन एवढ्या लवाजम्यावर एका शिफ्टमधले स्लॉट भरून निघतायेत. जाहीरातींचा ओघ थांबला आहे. पतंजली सोडून इतर ब्रँड जाहीरात द्यायला तयार नाहीत. सत्ताधारी पक्षाचा एक मोठा नेता मुलाखत द्यायला तयार होत नाहीत.
पत्रकार मारून टाकण्याच्या या कालखंडात रविशकुमार ने किमान आवाज चालू ठेवला. शिक्षणक्षेत्रातला, नदीप्रशासनातला, राज्यप्रशासनातला भोंगळ कारभार समोर आणला. व्यापमवर सलग 49 दिवस आवाज वाढवत ठेवला. हे ही नसे थोडके.
काल रविशला पुरस्कार मिळाला. रेमॅन मॅगेसेसे. आशियतला नोबेल मानला जातो. रविश कुमार यांचं खुप खुप अभिनंदन. त्यांना सर्वात आधी 2009 ला भेटलो होतो. त्यांनंतर 2019 पर्यंत अनेकदा भेटी झाल्या. तो माणूस दहा वर्षापूर्वी जसा होता तसाच आजही आहे. पत्र चाळणारा साधासा कारकून ते बातमीदार आणि आता संपादक असा चिकाटीने, जिद्दीने भरलेला प्रवास आहे रविशकुमारचा. त्याला जोड होती धैर्याची. आजवर ज्यांनी ज्यांनी तुमच्या बायकोवर बलात्कार करू, तुमच्या आया बहिणींची नग्न धिंड काढू अशी एकही धमकी ऐकलेली नाही किमान त्यांनी तरी रविशच्या पुरस्कारावरून ट्रोलिंग करू नये हीच नम्र विनंती. ते धैर्य मिळवणं नक्कीच सोप्पं नाही. एकदा धमकी ऐकून पहा. शाब्दिक बुडबुडे चड्या पिवळ्या करतील हे नक्की.
– वैभव छाया, मुंबई
एका सच्चा पत्रकाराला किती समस्याना सामोरे जावे लागते आणि त्या जीवघेणे समस्या मधून ही सत्य सांगण्याचे सतत चालू ठेवणे या राविश्च्या धैर्या चे अभिनंदन.