इतिहास

क्रांतिकारी भीमशाहीर वामनदादांच्या गाण्याशिवाय बाबासाहेबांची जयंती पूर्ण होत नाही

एका विलक्षण, क्रांतिकारी, संघर्षमय अशा वातावरणात वामनदादांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या प्रांरभीच्या लढाया त्यांनी समजून घेतल्या. नंतरच्या सर्व लढाया त्यांनी जवळून पाहिल्या. महामानव बाबासाहेबांची सावली अनेकवेळा आपल्या अंगावर घेतली. या सर्वांतून जन्माला आला एक बंडखोर, क्रांतिकारी भीमशाहीर!

एक लोककवी, एक गीतकार आणि यातूनच जन्माला आला बाबासाहेबांच्या विचारांना दाही दिशांमध्ये घेऊन जाणारा एक पहाडी आवाज तत्कालीन वातावरणच आंबेडकरमय, भीममय झाले होते. याच वातावरणाचा एक सच्चा घटक म्हणजे वामनदादा. बोलण्यात भीम, वागण्यात भीम, जगण्यात भीम, गाण्यात भीम, आयुष्याच्या प्रत्येक श्वासात भीम, लढण्यात भीम, प्रत्येक प्रश्नाच्या इलाजात भीम असे एक भारावलेपण घेऊन वामनदादा जगले.

आपला जन्मच भीमविचारांच्या प्रचारासाठी आणि समाजाला जागे करण्यासाठी आहे, या न्यायाने ते जगले. शब्द भीमाचे, आवाज भीमाचा, जगण्याची प्रेरणा भीमाची, स्वाभिमानी जगाची निर्मितीही भीमाची अशाप्रकारे वामनदादांच्या जीवनाचा कण न कण अवघा भीममय होऊन गेला होता. परिणामी त्यांचा प्रत्येक शब्द भीमगाणे, भीमवाणी, भीमघोषणा, भीमलिपी, भीमसंस्कृती, भीमविचार आणि भीमप्रहार बनून बाहेर पडला.

वामनदादांच्या कविता आणि गाणे यातून भीमाचे विराट दर्शन घडू लागले. हे दर्शन पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि काळजावर गोंदविण्यासाठी हजारोंचा जमाव गावोगाव जमत असे. चालत, बैलगाड्या करून, कांदाभाकर घेऊन लोक कार्यक्रमाला येत. वामनदादा गायचे आणि हजारो लोकं भीमविचारांची ऊर्जा काळीज भरून घेऊन जायचे.

तीन पिढ्यांनी वामनदादांचे गाणे ऐकले. लाखो माय-भगिनींनी डोक्यावरचे ओझे, जाते हलके करण्यासाठी वामनदादांची गाणी आपल्या ओठावर खेळवली, रुजवली आणि फुलवली. सासरची वाट सोपी केली. पाणवठ्यावर, सणावारात, सुख-दुःखाला सोबती म्हणून वामनदादांचे गाणे धावून जाऊ लागले. एका पिढीने दुसऱ्या पिढीला, दुसरीने तिसऱ्या पिढीला मोठ्या आनंदाने हे गाणे दिले. जयंती बुद्धांची असो, बाबांची असो वामनदादांच्या गाण्याशिवाय ती पूर्णच होणार नाही. सहज सोप्या आणि उत्स्फूर्त शब्दांत वामनदादा आपल्या काळजातला भीम सर्वत्र पोहोचवत होते.

संकलक : इंजि.सुरज तळवटकर

One Reply to “क्रांतिकारी भीमशाहीर वामनदादांच्या गाण्याशिवाय बाबासाहेबांची जयंती पूर्ण होत नाही

Comments are closed.