इतिहास

वंगीस – प्राचीन भारताचा बौद्ध कवी

आयुष्यात सत्यधर्म सांगणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आयुष्य असेच भरकटत चाललेले असते. वंगीस ब्राम्हणाच्या बाबतीत असेच झाले होते. मृत पावलेल्या माणसाच्या कपाळावर टिचकी मारून त्याचा पुर्नजन्म कोठे झाला असेल हे तो सांगत फिरत असे. त्यामुळे राजगृहाच्या पंचक्रोशीत त्याचे नाव झाले होते. त्यावेळच्या ब्राम्हणांनी त्याचा उदोउदो केल्यामुळे वंगीस यांचे महत्व वाढले होते. एके दिवशी बुद्धांची धम्मदेशना ऐकण्यास अनेक लोक जात असताना वंगीस देखील मोठ्या प्रौढीने त्यांच्या बरोबर गेला. त्याच्या आगमनाची खबर ब्राम्हणांनी दिल्याने बुद्धांनी चार कवट्या मागविल्या व त्या मृत व्यक्तींचा पुनर्जन्म कुठे झाला हे वंगीसला सांगण्यास सांगितले. वंगीस याने तीन कवट्याबाबत सांगितले. पण चौथ्या कवटीबाबत त्याला सांगता येईना. तो मौन झाला. त्याने आपली हार मानली. बुद्ध म्हणाले “या चौथ्या कवटीबाबत मी सांगतो. अहर्तपदास पोहोचलेल्या एका भिक्खुंची ती आहे. त्यांचा आता पुनर्जन्म नाही. अरे वंगीस, ही तुझी विद्या काय कामाची ? दुःखमुक्त होणे, निर्वाणपद प्राप्त करणे हे मनुष्याचे ध्येय असले पाहिजे.” तेंव्हा वंगीस यास सत्य उमगले आणि तो त्यांना शरण गेला. बुद्धांनी त्यास निग्रोधकल्प स्थविर यांच्याकडे सोपविले.

अशा या वंगीसचे हृदय मात्र कविमनाचे होते व तो तात्काळ काव्य रचना करण्यात पटाईत होता. श्रमण झाल्यावर ध्यानमार्गाचा अभ्यास करताना मन बैचेन होत असे. विकार उफाळून येत असत. त्यांचे दमन करताना सुचलेल्या काव्यपंक्ती आजही वंगीस सुत्तात वाचता येतात. एकदा भिख्खूंच्या दर्शनार्थ काही तरुण स्रियां विहारात आल्या तेव्हा वंगीसाचे मन चलबिचल झाले. त्यावेळी आपल्या मनास बजावताना तो म्हणतो “ज्याअर्थी आता मी घरदार सोडून श्रमण झालो आहे त्याअर्थी हे कामविकार दूर ठेवणे माझ्या हिताचे आहे. मोठमोठे योद्धे, पराक्रमी पुरुष, उत्कृष्ट धनुर्धारी माझ्या सभोवताली आहेत. त्यांच्यापेक्षा जरी जास्त संख्येने लावण्यवती स्त्रियां आल्या तरी त्या माझे काही वाकडे करू शकणार नाहीत. प्रत्यक्ष ज्यांना ज्ञानप्राप्ती झाली आहे अशा भगवान बुद्धांनी हा निर्वाणाचा मार्ग दाखविला आहे. तो मी अंगीकारणारच. अरे मारांनो आणि विकारांनो..! तुम्ही कितीही मजवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलात तरी मी तसूभरही ढळणार नाही.”

आळवी येथील अग्गालव विहारात ( श्रावस्ती आणि राजगृह यांच्यामधील ठिकाण ) वंगीस यांचा सुरवातीचा काळ गेला. तेव्हा अनेक काव्यपंक्ती त्यांना स्फुरल्या. बुद्धांची अनेक वचने त्यांनी काव्यात गुंफून सर्वांसमोर म्हटली. अहर्त झाल्यावर एका गाथेत त्यांनी म्हटले की “मनाची आवड-निवड सोडून दिल्यावर प्रत्येक गोष्टीकडे निर्लिप्तपणे पहावे. खरा श्रमण तोच ज्याने विकारांचे दमन केले आहे. या पृथ्वीतलावर आणि अवकाशात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व अनित्य आहेत. त्यांचा शेवटी लय होणार आहे. हे जाणून सुज्ञाने आपले जीवन मार्गक्रमण करावे”. एकदा बुद्धांनी सुभाषित वाचा म्हणजे काय ? या बद्दल उपदेश केला. त्याचे वंगीस यांनी तात्काळ काव्यात रूपांतर करून म्हणून दाखविले. तेव्हा बुद्धांनी देखील त्याची प्रशंसा केली.

वंगीस यांनी बुद्ध आणि त्यांच्या उपदेशाबद्दल अनेक गाथा रचल्या. त्याच बरोबर अग्रशिष्य सारिपुत्त आणि महामोग्गलान तसेच आनंद आणि कौंडिण्य यांच्या बद्दल सुद्धा त्यांनी गाथा रचल्या आहेत. त्यांच्या या प्रतिभाशाली गुणांमुळे भगवान बुद्धांच्या अग्रश्रावकांमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांच्या बुद्धकालीन काव्यपंक्ती संयुत्तनिकाय, अठ्ठकथामधून वाचल्यावर प्राचीन भारतखंडाचे पालि भाषेतील ते पहिले कवी असल्याचे दिसून येते. त्यावेळेस लिहिण्याची कला अवगत नव्हती. तरीही त्यांच्या काव्य गुणाबद्दल सुत्तामधून माहिती दिली आहे हे विस्मयकारक आहे. म्हणूनच इतिहासकारांनी, अभ्यासकांनी त्यांची कलाकृती वाचावी, तिचा आस्वाद घ्यावा, चिकित्सा करावी, मूल्यमापन करावे आणि प्रांजळपणे भारताच्या या आद्य आणि बौद्ध कविचे योगदान मान्य करावे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)