इतिहास

वास्तुशास्त्राचा उगम बौद्ध संस्कृतीतून

अडीज हजार वर्षांपूर्वी वास्तूशास्त्र ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे लोकांनाही त्याची काहीही माहिती नव्हती. वास्तुच्या कुठल्याच सिद्धांताबद्दल पालि साहित्यात सुद्धा काहीही माहिती नाही. सिद्धार्थ यांनी घरदार सोडल्या नंतर त्यांचे सर्व आयुष्य हे खुल्या वातावरणात, निसर्ग सानिध्यात गेले. दुःखमुक्तीच्या मार्गाची ओळख सर्वसामान्यांना व्हावी हेच त्यांचे उद्दिष्ट होते. त्यामुळे वास्तुच्या सिद्धांताबाबत त्यांनी कुठेच काही म्हटललेले नाही. मात्र भिक्खुंचे निवासस्थान कुठे असावे याबाबत विशुद्धीमग्ग ग्रंथात मोठा उल्लेख सापडतो. तरीही वास्तूशास्त्राच्या उदयाला बौद्ध संस्कृती कारणीभूत कशी ठरली त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

सिध्दार्थ यांचा जन्म लुंबिनी ( म्हणजे आजच्या नेपाळमध्ये ) येथे झाला. हे सर्वश्रुतच आहे. भारतीय खंडापुरता विचार करायचा झाला तर या लुम्बिनीचे स्थान ईशान्य दिशेला येते. म्हणजेच उत्तर आणि पूर्व दिशा यांच्या मध्ये येते. सम्राट अशोक यांच्या काळात बुद्धांचा धम्म जेव्हा सर्व भारतभर बहरला होता, तेव्हा भगवान बुद्धांच्या श्रद्धेपोटी ईशान्य दिशेस पाय पसरून झोपणे देखील अयोग्य समजले जात होते. आजही इतर बौद्ध देशांत लुम्बिनिची दिशा वंदनीय मानतात. बुद्धांचा सर्व कालखंड हा पूर्व आणि उत्तर या दिशामधील भूभागावर व्यतीत झाला. त्यामुळे उत्तर, ईशान्य आणि पूर्व भुभाग भारतवर्षासाठी अत्यंत पूजनीय होता. त्या दिशांना वंदन केले जात होते. त्या दिशेला तोंड करून ध्यानसाधना केली जात होती. मात्र हळूहळू राजाश्रय संपुष्टात आल्यावर ९-१० व्या शतकामध्ये राज दरबारातील धर्ममार्तंडांनी अनेक बौद्ध संकल्पना, परंपराना यांना काल्पनिक कथांचा मुलामा दिला. तसेच त्याबाबत संस्कृत मधून मोठे ग्रंथ लिहुन ते प्राचीन असल्याचे भासविले. त्यामुळे आजही सर्वसामान्य माणूस आणि सुशिक्षितवर्ग बुद्धी गहाण ठेवून त्याच गोष्टींना सत्य मानून चालला आहे.

बौद्ध संस्कृतीचा प्रभाव एवढा होता की उत्तर दिशेस, ईशान्य दिशेस आणि पूर्वेकडे वास्तूचे मुख्यद्वार ठेवले जात होते. त्यामुळे तीकडील मंगल कंपने वास्तूमध्ये येऊन शांतता नांदेल, भरभराट होईल, भरपूर धनधान्य मिळेल, असा लोकांना विश्वास वाटत असे. आणि आश्चर्य म्हणजे तो विश्वास सार्थकी होत होता. त्याकाळी पृथ्वीची चुंबकीय रचना आणि तिचा कललेला अक्ष याबद्दल लोकांना काहीच माहिती नव्हते. तरीही सर्वसामान्य जनता वास्तू बांधताना उत्तर-ईशान्य-पूर्व दिशेस मुख्यद्वार ठेवत होते. या दिशांचे महत्व लक्षात आल्यावर धर्म पंडितानी या प्रथेला आपलेसे केले. याबाबत खात्री करावयाची असल्यास वास्तूपुरुष म्हणून समभुज चौकोनात रेखाटन केलेल्या पुरुषाचे चित्र पहावे. त्यातील पुरुष हा ईशान्य दिशेस बुद्धांना नमन करताना दिसतो. हे नमन लुम्बीनीच्या दिशेस सिध्दार्थच्या जन्मस्थळाला होते. मग त्यांनी या बौद्ध प्रथेला कुबेराच्या कथेचा मुलामा दिला आणि कुबेराचे स्थान दक्षिणेकडून उत्तरेकडे स्थानांतर झाले असे सांगितले.

सर्व इतिहास तज्ञ ‘वास्तुशास्त्र’ हा मूळ वेदांचा भाग आहे असे ठोकून सांगतात आणि वास्तुशास्त्राचे प्रणेते विश्वकर्मा यांना मानतात. त्यांचा “विश्वकर्मा वास्तुशास्त्र” नावाचा ग्रंथ आहे, परंतु तो अकराव्या शतकात अस्तित्वात आला. काही इतिहासकार “समरांगण सूत्रधार” या ग्रंथाचा हवाला देतात. तसेच वास्तुशास्त्राचे अनेक सिद्धांत मत्स्यपुराण, नारदपुराण, स्कंदपुराणामध्ये आहेत असे सांगतात. पण वास्तुशास्त्राच्या सिद्धांतांचा उगम बौद्ध संस्कृती, परंपरा यातून आल्याच्या माहितीकडे दुर्लक्ष करतात. वास्तुशास्त्राच्या सर्व संस्कृत ग्रंथांचा विकास हा इसवीसन पाचव्या शतकानंतर नालंदा विद्यापीठाच्या संशोधनातून झालेला आहे, हे लक्षात घ्या. ‘बृहत्ससंहिता’ ही रचना वराहमिहिरने सहाव्या शतकात लिहीली. ‘समरांगण सूत्रधार’ ही रचना राजा भोज यांनी इ. स. १००० मध्ये लिहिली. ‘मयमतम’ ही रचना अकराव्या शतकात मायाने लिहिली. नंतर बरेच असे छोटेमोठे ग्रंथ लिहिण्यात आले. पण या सर्व ग्रंथांचा मूळ पाया हा बौद्ध परंपरेतून घेतलेला होता. ( जसे बुद्धांनी श्वासावर आधारित ‘आनापान’ ध्यानसाधना शिकविली त्याची धर्म पंडितांनी ‘शिवस्वरोदय’ साधना केली व त्यावर संस्कृतमधून मोठा ग्रंथ लिहिला.) नालंदा विद्यापीठ नष्ट झाले नसते तर आज चित्र निश्चितच वेगळे दिसले असते. व सर्वांचे पितळ उघडे पडले असते.

थोडक्यात बौद्ध संस्कृतीची ईशान्य दिशा, उत्तर दिशा ही आजही भरभराटीची दिशा मानली जाते. मी स्वतः स्थापत्य अभियंता असल्याने १९९४ पासून वास्तुसंबंधी शास्त्राचा चांगला अभ्यास केला. त्यामुळे कुठेही गेलो तरी एका नजरेत घराचा आराखडा स्कॅन करू लागलो. त्यामुळे तेथे असलेली ऊर्जा व समस्यांची जाणीव होऊ लागली. तसेच माझे दिशांचे ज्ञान उत्तम असल्याने भौगोलिक परिस्थितीनुसार वास्तुशास्त्राचे काही सिद्धांत देखील पडताळून पाहता आले. उदा. आग्नेय दिशेला असलेले टॉयलेट-बाथरूम दोष निर्माण करते इत्यादी. असो, शेवटी मुख्य प्रवेशद्वाराची दिशा कोणतीही असलीतरी वास्तूत राहणारे कुशलमार्गाने मार्गक्रमण करत असतील आणि वास्तूची अंतर्गत रचना सुनियोजित असेलतर ती देखील भरभराटीची असते असे आढळते. सहा दिशांबाबत ‘सिगलोवाद’ सुत्तात बुद्धांनी हेच सांगितले आहे.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *