जगभरातील बुद्ध धम्म

अमेरिकेत व्हिएतनामी समुदायाने मुलांवरती बौद्धसंस्कार होण्यासाठी बांधले ‘बुद्ध विहार’

‘Buddha Blessed Temple’ नावाचे विहार नुकतेच अमेरिकेच्या केंटुकी राज्यात व्हिएतनामी समुदायाने बांधले. गेल्या रविवारी याच्या उदघाटनाला सहाशे लोक जमा झाले होते. यावेळी बुद्धवंदना झाल्यावर गाणी, नृत्य आणि भोजन असा सविस्तर कार्यक्रम साजरा झाला. सहा एकराच्या जागेत बांधलेल्या या विहाराची जागा तीन वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आली होती. तेथील विहाराचे प्रवक्ते व्हॅन दो म्हणाले की कामानिमित्त अनेक व्हिएतनामी ९० दशकाच्या आसपास इथे येऊन स्थायिक झाले आहेत. परंतु त्यांना आपल्या संस्कृतीची आठवण येत राहिल्याने तसेच मुलांवरती बौद्धसंस्कार होत नसल्याने लोक एकत्र आले आणि विहार बांधण्याचे ठरविण्यात आले.

आता या विहाराच्या निमित्ताने व्हिएतनामी एकत्र येतील. तिथे विहारात नियमित बुद्ध वंदना आणि ध्यानसाधना करण्यात येईल. तसेच धम्माच्या अभ्यासासाठी वाचनालयाची सुविधा चालू करण्यात येणार आहे. अर्थात इतर धार्मिक लोकसुद्धा इथे येऊन ‘एकाग्रता ध्यान साधना’ शिकू शकतात. हल्लीच्या धावपळीच्या युगात तिची खूप गरज भासते आहे. या विहाराचे शिक्षक डॉ. दिच हँग दॅट असून त्यांनी कलिफॉर्निया येथून पीएचडी प्राप्त केली आहे. तसेच अनेक विद्यापीठातून ( ह्युस्टन युनिव्हर्सिटी, टेक्सास इंडियाना युनिव्हर्सिटी, साऊथ ईस्ट युनिव्हर्सिटी ) त्यांनी बुद्धिझमवर लेक्चर्स दिली आहेत.

जगात सर्वत्र जेथे-जेथे बौद्ध समाज विखुरला आहे त्यांनी त्यांच्या देशाची संस्कृती जपण्यासाठी बुद्ध विहारे बांधली आहेत. आपला महाराष्ट्रीयन बौद्ध समाजही ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका येथे विखुरल्याचा दिसतो. पण एकत्र येऊन, छोटी जागा घेऊन बुद्ध विहार उभारल्याचे कुठेच दिसत नाही. निदान मुलाबाळांना घेऊन सुट्टीचे दिवशी, दर पोर्णिमेला छोट्या मोठ्या विहारात जाण्याचा दृढ निश्चय तरी सर्वांनी केला पाहिजे. तरच आपला महाराष्ट्रीयन बौद्ध समाज धम्माप्रती जागृत राहील.

– संजय सावंत, नवी मुंबई