ब्लॉग

खाकी वर्दीतला धम्मनायक : त्यांचे बौद्ध धम्मावर मौलिक प्रवचन एकूण पोलिससुद्धा तल्लीन होतात

शासकीय पोलिस विभागात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून धम्मसेवेला वाहून घेणारे ज्ञानवंत, गोड गळ्याचे प्रभावी प्रवचनकार, चिंतनशील धम्मनायक विदर्भाचे सुपुत्र आदरणीय विजयभाऊ येलकर यांचा आज, ११ नोव्हेंबर २०२१ रोजी जन्मदिन त्यानिमित्ताने…

शासकीय सेवेत पोलिस विभागाची प्रामाणिकपणे सेवा करून अव्याहतपणे धम्मसेवा करणारे प्रेमळ, मितभाषी, विलक्षण ज्ञानवंत, अभ्यासू, गोड गळ्याच्या प्रभावी प्रवचनकार, चिंतनशील धम्मनायक विजयभाऊ शालीग्राम येलकर यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून ते आपले कर्तव्यकर्म मोठ्या निष्ठेने पार पाडीत आहेत.

सेवानिवृत्तीनंतर बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारात त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांच्या जीवनातील आदर्श तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि १०८ महापुरुष आहेत ज्यांनी ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’साठी आपली जीवनधारा समर्पित केली. यातच त्यांचे श्रेष्ठत्व सामावले आहे. अशा या कृतीप्रवण धम्मनायकाचा जन्म घुसर, जि.अकोला येथे ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. येलकर यांनी समाजशास्त्र विषयात एम.ए. पर्यंत शिक्षण घेतले. १९७७ ला ते होमगार्ड म्हणून रुजू झाले. मुंबईत प्रशिक्षण शिबिरात भाग घेऊन संगीत (बॅण्ड कोर्स), ज्युडो कराटेचे (निःशस्त्र युद्ध ) प्रशिक्षण घेतले.

पुण्याच्या मिलिटरी कॅम्पमध्ये फ्लड रेस्क्यूचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केले. 1981 ला ‘ऑल इंडिया होमगार्ड अॅण्ड सिव्हिल डिफेन्स’ पटना बिहार येथे भाग घेतला. महाराष्ट्र पोलिस दलात १९८५ साली ते अकोला जिल्ह्यात भरती झाले. नोकरीपूर्वी १९७८ साली स्वतःच्या गावी घुसरला मुलामुलींना ज्युडो कराटेचे प्रशिक्षण देण्याकरिता ‘सम्राट अशोक व्यायामशाळे’ची स्थापना केली. इतकेच नव्हे तर राहत्या घरी श्रामणेर शिबिराचे दोनदा आयोजन करून लहान व किशोरवयीन मुलांना श्रामणेर करून बुद्ध धम्म आणि संघाचा परिचय करून दिला.

व्यायामशाळेचे अध्यक्ष व शिक्षक म्हणून त्यांनी उत्तमप्रकारे बहुमोल कार्य केले. पोलिस दलात असताना अकोला येथे ‘ बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ राज्यस्तरीय हॉकी टूर्नामेंट आयोजनामध्ये ते सहभागी झाले होते. ‘ धम्मानुसार आचरण केल्यास एक चांगला मनुष्य होतो आणि धम्माचरणाने एक चांगला पोलिस कर्मचारी होऊ शकतो’ हा अनुभव त्यांना आला. ३० जून २०१६ रोजी ते पोलिस खात्यातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर फेब्रुवारी २०२० रोजी येलकरांच्या मनात कल्पना आली की, प्राचीनकाळी वैशालीत महामारीमुळे असंख्य लोक मृत्यूला प्राप्त होत असताना तथागत बुद्धांनी ‘ रतन सुत्ता’चा जयघोष केला. भिक्खूसंघाकडून ‘ रतनसुत्त ‘ वदवून घेतले.

निसर्गातील जीवजंतूंना शांत करून अखिल मानवाप्रती प्रेम, दया, मैत्रीभावना उत्पन्न केली. तथागताच्या कारुणिक उपदेशाने प्रभावित होऊन येलकरांनी कोरोना काळात लॉकडाउनमध्ये दूरध्वनी, मोबाइल कॉन्फरन्समधून हजारो लोकांसोबत धम्मसंवाद साधला. दररोज सकाळी पाच वाजता नादमधुर सुरात बुद्धवंदना घेऊन ते एक तास बौद्ध धम्मावर मौलिक प्रवचन करतात. त्यांचे हे महान कार्य गत दोन वर्षांपासून बोधगयेच्या निरंजना नदीप्रमाणे आजतागायत अखंड प्रवाहित आहे. येलकरांच्या मुखातून स्त्रवणारी गोड, मधुर धम्मधारा तासन्तास ऐकतच राहावी इतकी प्रभावशाली आहे. संपूर्ण ‘धम्मपद’ त्यांना मुखपाठ आहे.

सोबत अनेक पाली गाथा अर्थासहित ते अख्खलित प्रवचनातून उलगडून सांगतात. बौद्ध धम्मावर त्यांची नितांत गाढ श्रद्धा असल्यामुळे उपासक त्यांचे प्रवचन तन-मन-धन अर्पण करून कंटाळा न करता ऐकतात. बुद्ध जीवनातील अनेक प्रसंग, घटना अतिशय सरळ, सोप्या भाषेत ते समजावून सांगतात. पोलिससुद्धा त्यांचे प्रवचन ऐकताना तल्लीन होतात. त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे चरणस्पर्श करतात. आयु. वामनराव सरकटे, प्रवीण गोपनारायण, श्रीकृष्ण वानखडे, डॉ. एस.एस. तायडे, वीरेंद्र सिरसाट आणि भाऊराव डोंगरे या निष्ठावान कार्यकर्त्यांची त्यांना मोलाची साथ आहे.

धम्माच्या प्रचार – प्रसाराकरिता आयु. अजाबराव सरदार यांच्या सूचनेवरून येलकरांनी ‘श्रोतापत्ती श्रावक सब्ब संघ’ स्थापन केला. हा संघ सतत अखंड संघातील लोकांना बुद्धवचनाचा परिचय करून देत आहे. प्रवचनानंतर परिचर्या घडवून आणली जाते. कर्णमधुर श्रवणीय गीते साप्ताहिकी म्हणून बुद्ध भीमगीते सादर केली जातात. विजयभाऊंच्या धम्मसेवेचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनी नुकतेच स्वतःच्या शेतात एक भव्य प्रज्ञामंच उभारला असून तेथून ते महाकारुणिक बुद्धाचा संदेश जगभर पोहोचवण्याचे त्यांचे महान स्वप्न आहे. विजयभाऊ येलकर आज , ११ नोव्हेंबर २०२१ रोजी वयाच्या ६२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. जन्मदिनी धम्म शिबिर, धम्मप्रवचन आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ मूर्ती छोटी पण कीर्ती महान’ अशा आदर्श व्यक्तिमत्त्वाला जन्मदिनाच्या आभाळभर शुभेच्छा ….

मिलिंद मानकर, नागपूर