इतिहास

विक्रमशिला विद्यापीठ : बिहार राज्यातील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ

बिहार राज्यातील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ. तिबेटी परंपरेनुसार ‘मगध’चा ‘पाल’ वंशीय राजा ‘धर्मपाल’ (राज्यकाल – इ.स. ७८०-८१५) याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता, आणि त्याने विक्रमशिला विहाराची स्थापना केली. या विहारास ‘विक्रम’ नावाच्या यक्षाचे नांव देण्यात आले. या विहाराचेच पुढे प्रसिद्ध अशा ‘विक्रमशिला विद्यापीठा’त रुपांतर झाले. धर्मपालाचे दुसरे नांव ‘विक्रमशिल’ असल्यामुळे या विद्यापीठाचे नांव विक्रमशिला ठेवण्यात आले. या विद्यापीठाच्या निश्चित स्थानाविषयी विद्वानांत मतभेद असले तरी ते प्राचीन मगध देशात, गंगेच्या काठी,भागलपूर जवळील ‘पाथरघाट’ टेकडीवर वसले होते, असे पुरातत्वीय पुराव्यानुसार आता निश्चित झाले आहे. फणींद्रनाथ बोस यांच्या मते ते भागलपूर परगण्यात एका टेकडीवर असावे.

नंदलाल डे आणि प्राच्यविद्यापंडित अ.स. अळतेकर ‘अंग’ राज्याची राजधानी असलेल्या ‘चंपानगर’ च्या पूर्वेला ३८ कि.मी. दूर असलेले ‘पाथरघाट’ नावाचे स्थान म्हणजेच ‘विक्रमशिला’ असावे, या मताचे आहेत. या ठिकाणाला १८९१ साली ‘बुचानन’ (Buchanan) याने प्रथम भेट दिली. सतीशचंद्र विद्याभूषण यांनी मात्र ‘सुल्तानगंज’ (भागलपूर जिल्हा) हे स्थान म्हणजेच विक्रमशिला, हे निश्चित केले आहे. पाटणा विद्यापीठाच्या ‘प्राचीन इतिहास व संस्कृती’ या विभागाने १९६० ते १९६९ या काळामध्ये बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील ‘अंतिचक’ येथे उत्खनन करून विक्रमशिला विद्यापीठाचे अवशेष शोधून काढले. तेथील भव्य मठ, पाषाणाच्या बुद्ध प्रतिमा, सोन्याच्या मोहोरा, स्तूप आणि भव्य जलाशये त्या काळाची ग्वाही देतात.

धर्मपाल राजाने महाविहार बांधून, बौद्ध धर्माच्या चार प्रमुख पंथाचे प्रत्येकी २७, असे १०८ अध्यापक चारही विभागात नेमले, आणि महाविहारास देणग्या दिल्या. नंतरच्या ‘पाल’ राजांनीही या विद्यापीठास उदारपणे आर्थिक सहाय्य केले. इतर धनिकांनीही त्यास उदारहस्ते देणग्या दिल्या. या महाविहारासभोवती उंच तटबंदी असून, चार दिशांना ‘महाद्वारे’ होती. प्रत्येक महाद्वारावर एक ‘परिक्षाद्वार’, व प्रत्येक परिक्षाद्वारालगत एक ‘ प्रवेश-परिक्षागृह’ होते. राजा ‘देवपाल’ याने (राज्यकाल इ.स.८१५ -इ.स. ८५५) याने आणखी दोन ‘प्रवेश-परिक्षागृहे’ बांधली. या प्रत्येक द्वारावर विद्वान व व्यासंगी पंडितांची नेमणूक केलेली होती. ‘रत्नाकरशांति’, ‘वागीश्वरकीर्ती’, ‘भट्टारक नरोत्पल’, ‘प्रज्ञाकरमति’, ‘रत्नव्रज’, ‘ज्ञानमित्र’ हे यांपैकी काही विद्वान पंडितजन होते. हे सहा विहारांचे प्रमुख आचार्य होते. या आचार्यांपैकी काही विख्यात ‘नैय्यायिक’ होते.

विहाराच्या मध्यभागी ‘महाबोधि’ कलाकृती असलेले बौद्ध मंदिर व अन्य १०८ बौद्ध मंदिरे होती. केंद्रस्थानी असलेल्या विहारास ‘विज्ञानगृह’ म्हणत. याशिवाय येथे एक विशाल असे ‘सभाभवन’ही होते. त्यात एकाचवेळी आठ हजार व्यक्तिंची बसण्याची सोय होती. प्रवेशद्वारात उजव्या बाजूस ‘नालंदा’ विद्यापीठाचे प्रमुख ‘आचार्य नागार्जुन’ यांचे भव्य चित्र होते, तर डाव्या बाजूला याच विद्यापीठाचे प्रमुख ‘अतीश दीपंकर’ यांचे चित्र होते. सायंकाळी सूर्यास्तानंतर विद्यापीठाचे प्रमुख प्रवेशद्वार बंद झाल्यानंतर येणाऱ्यांसाठी या प्रवेशद्वाराबाहेर एक धर्मशाळाही होती. विद्यार्थ्यांची येथे विनामूल्य निवास-भोजनाची व्यवस्था असे.

या विद्यापीठात भारतातील विविध भागातून, तसेच परदेशांतूनही विद्यार्थी अध्ययनासाठी येत असत. ‘द्वारस्थ आचार्यां’कडून घेण्यात येणाऱ्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना प्रवेश मिळत असे. तिबेटी बौद्ध भिक्खूही येथे अध्ययन करून संस्कृत ग्रंथांचा तिबेटी भाषेत अनुवाद करत. विद्यापीठीय परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांस ‘पंडित’, ‘महापंडित’, इ.पदव्या देऊन राजदरबारात त्यांना सन्मानित करण्यात येई, व अशा पंडितांना ‘राजपंडित’ हे विशेष बिरुद मिळे. अशा प्रख्यात राजपंडितांमध्ये ‘आचार्य रत्नकीर्ती’, ‘जेतारी’, ‘ज्ञानश्रीमित्र’, ‘अतीश दीपंकर’, ‘रत्नव्रज’, ‘वागीश्वरकीर्ती’ इ. चा अंतर्भाव होता. येथील ग्रंथालय हजारो ग्रंथांनी समृद्ध होते. बौद्ध धर्मातील विविध संप्रदाय, वेद, अध्यात्मविद्या, व्याकरण, न्यायशास्त्र इ. विषयांचे येथे अध्यापन होई. तंत्रमार्गाच्या अध्यापनावर- विशेषतः ‘वज्रयान’ व ‘सहजयान’ यांवर येथे विशेष भर होता. कारण, इ.स.१० व्या-११व्या शतकात ‘तंत्रमार्ग’ आणि ‘तांत्रिक साधना’ हे बौद्ध धर्माचे प्रमुख अंग बनले होते. शिवाय, ‘न्यायशास्त्रा’तही ते प्रवीण होते.

विद्यापीठाचे प्रशासन ‘महाधिपतीं’कडे असून, त्यांच्या मदतीला सहा आचार्यांचे ‘मंडल’ असे. काहीकाळ नालंदा विद्यापीठाचा कारभारही या मंडलाच्या नियंत्रणाखाली होता. तेथील प्रशासन उत्कृष्ट होते. ‘ह्यू-एन-त्सँग’ (इ.स.६०२-इ.स.६६४) व ‘इत्सिंग’ (इ.स. ६३४-इ.स.७१३) ह्या चिनी प्रवाशांच्या प्रवासवृत्तांतून या विद्यापीठाचे कार्य व प्रगती यांबाबत विस्तृतपणे माहिती मिळते.

‘खल्जी’ घराण्यातील ‘महंमद बिन बख्तियार खल्जी’ याने १२व्या शतकाच्या अखेरीस इ.स. ११९२ मध्ये बिहारवर स्वाऱ्या केल्या. पाल राजा ‘गोविंद’ याचा दारुण पराभव करुन, त्याची राजधानी ‘ओदंतपुरी’ही त्याने जिंकून घेतली. विक्रमशिला विहाराभोवतालच्या उंच भिंती बख्तियारला ‘किल्ल्याचा तट’ वाटल्याने, त्याने त्यावर हल्ला करून संपत्तीच्या आशेने संपूर्ण विद्यापीठ उध्वस्त करून, ग्रंथालयही जाळून टाकले आणि तिथल्या हजारो बौद्ध भिक्खूंचे शिरकाण करुन, त्यांच्या मुंडक्यांच्या राशी रचल्या. नंतर लगेचच त्याने प्राचीन काळापासून भरभराटीस आलेल्या, जगद्विख्यात अशा ‘नालंदा’ विद्यापीठाचाही विध्वंस करुन, तेही नष्ट केले….”

-अशोक नगरे, (ज्येष्ठ बौद्ध इतिहास, पुरातत्व अभ्यासक तथा लिपी तज्ञ)