ब्लॉग

विपश्यना ध्यानसाधना – ज्यांना साधनेचे महत्त्व व गांभीर्य कळले नाही तेच विरोध करतात

विपश्यना ध्यानसाधने बाबत काही टीकात्मक पोस्ट फेसबुक व इतर सोशल मीडियावर बघावयास मिळाल्या. तरी नियमित साधना करणाऱ्यांनी याकडे लक्ष न देता सकाळ-संध्याकाळ आपली एक तासाची साधना नियमित चालू ठेवावी. व ज्यांना ध्यानमार्ग शिकायचा आहे त्यांनी ही मोठ्या उत्साहाने शिकून घ्यावे. कारण चांगल्या मार्गावरून जाताना अडथळे आले तरी आपले उद्दिष्ट स्पष्ट असावे. भगवान बुद्धांनी उत्तम मंगल कोणते या बाबत महामंगल सुत्तात स्पष्ट सांगितले आहे की —

फूठस्स लोक धम्मेही, चित्त यंस न कंम्पति |
असोकं विरज खेमं, एत मंगलमुत्तमं ||

अर्थ = लोकांच्या मताने, चर्चेने विचलित होऊन आपले चित्त कंपित होऊ न देता, शोक न करता निर्मल आणि निर्भीड राहावे हे उत्तम मंगल होय.

ज्यांना या साधनेचे महत्त्व व गांभीर्य कळलेले नाही तसेच आकलन झालेले नाही अशा व्यक्ती साधनेच्या विरोधात पोस्ट करीत असतात. किंवा वादविवाद करीत असतात. अशा असमंजस व्यक्ती बाबत कटुता न बाळगता त्यांचेही कल्याण होवो अशी भावना करावी आणि या समाधी मार्गाचे त्यांना आकलन होवो असे चिंतावे. अध्ययन क्षेत्रात जर मनापासून वर्षभर सकाळ-संध्याकाळ अभ्यास केला तरच वार्षिक परीक्षेत यश प्राप्त होते, तसेच ध्यान साधनेचे आहे. नुसती एक-दोन शिबीर केली पण घरी अभ्यास केलाच नाही तर साधनेचे फळ कसे प्राप्त होईल ? यासाठी सकाळ संध्याकाळ न चुकता एक तासाची साधना वर्षभर केली तर त्यांना स्वतःमधील होत असलेल्या बदलाचे आकलन होऊ शकेल. यासाठी बुद्धांप्रती श्रद्धेचा उगम मनातून झाला पाहिजे. शिलांचे पालन झाले पाहिजे. समाधी म्हणजेच आनापान साधना ( श्वासावर लक्ष ठेवणे ) करून मन एकाग्र झाले पाहिजे. आणि प्रज्ञा म्हणजेच सातत्याने जागृत व समता भावनेत राहून शरीरातील संवेदनांचे निरीक्षण करता आले पाहिजे.

सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यावर त्यांनी विचार केला की संसारातील लोकांना हा मार्ग कळेल का ? नाही कळला तर त्यांनाही ताप आणि मलाही ताप होईल. असे त्यांच्या मनातील विचार जाणून स्वतः ब्रह्मसंहपतीं अनेक देवलोकांसह बुद्धांच्या पुढे आले आणि संसारातील लोकांना दुःखमुक्तीच्या मार्गाचा उपदेश करावा अशी विनंती केली. भगवान बुद्धांनी ही पाहिले की या पृथ्वीतलावावर काही अशा व्यक्ती आहेत जो हा मार्ग समजू शकतात. व दुसऱ्यांना ही शिकवू शकतात. आणि मग बुद्धांनी मानवजातीस हा मध्यम मार्गाचा उपदेश करण्याचे ठरविले. या गोष्टीतून बोध एवढाच घ्यायचा की ही ध्यानसाधना वरवर सोपी वाटत असली तरी मनास ताब्यात ठेवणे निश्चितच कठीण आहे. साधनेला बसले की अनेक जणांचे तीन तेरा वाजतात. कारण मन ताब्यात राहत नाही. मात्र जे मनाला ताब्यात ठेवण्याचा थोडा जरी प्रयत्न करतात ते हळूहळू यशाकडे जातात. व थेंबे थेंबे तळे साचे या प्रमाणे जेवढी शुद्धता येत जाईल तेवढे जीवन निर्मळ, विकारमुक्त, आनंददायी होईल.

शेवटी भगवान बुद्धांच्या कलमा सुत्ताचा आधार घेऊन विपश्यी साधकाने आपली मार्गक्रमणा चालू ठेवावी. कारण त्यात बुद्धांनी म्हटले आहे की “मी सांगितले किंवा कोणी सांगितले म्हणून विश्वास ठेवू नका. तसेच परंपरेने चालत आहे म्हणून किंवा ग्रंथात लिहिले आहे म्हणून मानू नका. किंवा गुरूंनी, वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितले म्हणून विश्वास ठेवू नका. पण जेव्हा स्वतःच्या अभ्यासामुळे कळेल की ही गोष्ट सर्व मानवजातीस कल्याणकारी आहे, तर तिचा जरूर स्वीकार करा आणि त्याप्रमाणे आपले आयुष्य मार्गक्रमण करा”.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बुद्धिझमची थियरी शिकविली. आचार्य गोयंका यांनी प्रॅक्टिकल शिकविले. अशी ही महाफलदायिनी साधना शुद्ध स्वरूपात आहे तो पर्यंत ती सर्वांनी करावी असे मनःपूर्वक वाटते. कारण गेल्या ६० वर्षात ज्यांचा जन्म झाला ते अधिक नशीबवान आहेत. व जे प्रामाणिकपणे करतील त्यांचा स्थर निश्चितच उंचावला जाईल. हा खरा धम्म आहे. निसर्गाचा नियम आहे. पाळलात तर वाचाल, नाहीतर रहाटगाडगे चालूच राहील.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

One Reply to “विपश्यना ध्यानसाधना – ज्यांना साधनेचे महत्त्व व गांभीर्य कळले नाही तेच विरोध करतात

  1. अतिशय सुंदर अशी मांडणी.. विपश्यनेद्वारे खर्‍या अर्थाने माणुस धम्म जीवन जगतो… !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *