ब्लॉग

लोककलेतील प्रबोधनाचा पाईक : विठ्ठल उमप

लोककलाकार विठ्ठल उमप यांनी लोककलेतील नृत्य आणि सादरीकरणासह गायकीचे विविध प्रकार अतिशय उच्च दर्जाचे सादर करुन मराठी माणसांच्या मनावर राज्य केलं. उमपांनी अनेक कोळी गीतं आणि भीम गीतं रचली आणि ती अतिशय उत्तमपणे गायलीही. त्यांनी लिहिलेल्या “जांभूळ आख्यान” या लोकनाटयानं अनेकांना भूरळं घातली होती. त्याचे प्रयोग देशभर अन् विदेशातही झाले. सुमारे 500 च्या वर या लोकनाटयाचे प्रयोग झाले.

शाहीर, लोकगायक आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल उमप यांना निसर्गानं भिन्न शैलीचा गळा दिला होता. विविध गायन प्रकारात ते लिलया वावरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांचं असिम प्रेम तर होतचं त्याचबरोबर वैचारिक बांधिलकीही होती. नागपूर येथील सुप्रसिध्द दीक्षाभूमीवर कार्यक्रम सुरु असतानाच स्टेजवरच त्यांना ह्दय विकाराचा तीव्र धक्का आला. तथागत बुध्द आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केल्यानंतर उपस्थितांना “जयभीम” ची घोषणा देत अभिवादन करतानाच ते कोसळले. उपचारा दरम्यान म्हणजे शनिवार 26 नोव्हेंबर 2010 रोजी म्हणजे 27 नोव्हेंबर 2010 रोजी पहाटे एक वाजून 40 मिनिंटांनी त्यांचं निधन झालं.

लोककलाकार विठ्ठल उमप यांनी लोककलेतील नृत्य आणि सादरीकरणासह गायकीचे विविध प्रकार अतिशय उच्च दर्जाचे सादर करुन मराठी माणसांच्या मनावर राज्य केलं. उमपांनी अनेक कोळी गीतं आणि भीम गीतं रचली आणि ती अतिशय उत्तमपणे गायलीही. त्यांनी लिहिलेल्या “जांभूळ आख्यान” या लोकनाटयानं अनेकांना भूरळं घातली होती. त्याचे प्रयोग देशभर अन् विदेशातही झाले. सुमारे 500 च्या वर या लोकनाटयाचे प्रयोग झाले.

विठ्ठल उमपांचा 15 जुलै, 1931 रोजी मुंबईतील नायगाव येथे जन्म झाला. ते मराठीतील अग्रगण्य शाहिर झाले. त्यांनी आपला वैचारिक वारसा कायम ठेवत एक हजारांपेक्षा अधिक गीत लिहिली आज ती गायलीही. लोककला या मनोरंजनातून लोकाशिक्षण आणि प्रबोधन करतात, असं म्हटलं जातं पण सगळेच लोककलावंत अशा भूमिकेतून काम करतातच असे नाही. पण विठ्ठल उमप यांच्यावर मुंबईतील नायगाव परिसरातील विविध चळवळींचे संस्कार झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींचं तर नायगाव हे केंद्रच होतं, मुंबईतील त्यावेळच्या गायक-कलावतांनी आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यातून “आंबेडकरी जलसा” आणि “भीम गीत” ची मोठी सांस्कृतिक चळवळ सुरु झाली. ती जशी मुंबईत सुरु झाली तशीच ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही पसरली. गावागावातून तत्कालीन अस्पृश्य कलावंतानी आपली पारंपरिक लोककलेची कामं सोडून “आंबेडकरी जलसा” आणि “भीम गीत” गायनाचे काम सुरु केलं. बाबासाहेबांच्या विचारांवर नितांत श्रध्दा असणाऱ्या कवींनी लाखोंनी गीतं लिहिली आणि ही गीतं हजारोच्या संख्येतील गायकांनी, गायन संचांनी गायली. याच पार्श्वभूमीवर विठ्ठल उमपांचीही जडणघडण झाली. उमप बालपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीकडे आकर्षित झाले अन् त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच भीम गीत गायनालाही सुरुवात केली.

उमपांच्या लहानपणी अस्पृशांनी सुरु केलेल्या “आंबेडकरी जलसा” आणि “भीम गीता”ची चळवळ काही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरुन सुरु झाली नव्हती. ती अस्पृश्यांनी स्वयंस्फूर्तपणे सुरु केली होती. महाराष्ट्रात त्या काळी एक म्हण प्रसिध्द होती. “महारा घरी नाच-गाणं आणि बामणा घरी लिवण” (लिवण- म्हणजे शिक्षण ) महाराष्ट्रातील अस्पृश्यांपैकी प्रामुख्यानं महार समुदयानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे, विचारांचे प्रसारण- प्रचार करण्याचं काम जोरकसपणे केलं. म्हणून डॉ. आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, “माझी शेकडो भाषणे आणि जलसाकारांचा एक कार्यक्रम समान आहेत”. एवढी ताकत आंबेडकरी जलसाकार आणि भीम गीत गायकांच्या गायनात होती आणि आजही आहे. उमप यांच्याकडे उत्तम “गळा” म्हणजे गायनास लागणारा “स्वर ” होता म्हणून त्यांनी हा वसा निवडला आणि जगण्याच्या अंतापर्यंत हा “वसा ”सोडला नाही. गातानांचं किंवा गाण्याच्या समारंभातच त्यांना मृत्यूनं जवळ करावं हाही एक निर्वाण प्राप्तीचा उत्तम मार्ग असावा.

विठ्ठल उमप यांनी सुमारे दहा चित्रपटांतून कामं केलं. ज्यामध्ये डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ.बाबासाहेब आंबेडकर, टिंग्य, गल गले निघाले, नटरंग, पायगुण, सुंबरान आणि विहिर या काही चित्रपटांचा समावेश आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चित्रपटातील एका गीतातील त्यांचा आर्त स्वर त्या प्रसंगाला जिवंत करतो.

त्यांचा आवाज जणू काही लोकगीत , लोककला यासाठीच असावा इतका त्या लोककलांना साजेसा होता. म्हणूनच ते लोककलांच्या सर्व प्रकारांमध्ये लिलया संचार करु शकले. त्यात पोवाडा, बहुरुपी, भारुड, भजन, गण-गवळण, लावणी ,कवणं, तुबडी, बोबडी, धनगरी गीतं, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी असे मराठी संस्कृतीतील सर्व अस्सल कला प्रकारात ते सहजपणे वावरत असतं. कधीही त्यांनी आपल्या कलांना कोणत्याही एका साच्यात बंदिस्त करुन ठेवले नाही किंवा स्वत:ला एखाद्याच कला प्रकारात रममान होऊ दिलं नाही. लोककला प्रकाराबरोबरच विठ्ठल उमपांनी “कव्वाली ” आणि गझल गायन प्रांतातही बेजोड कामगिरी केली. “ उमाळा ” हा त्यांचा गझल संग्रह प्रसिध्द आहे.

नाटकांच्या प्रांतात आणि त्यातही लोकनाटयाच्या प्रांतातील त्यांची कामगिरी आणि सेवा कायम स्मरणात राहणारी आहे. अबक दुबक तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, दार उघड बये दार उघड, विठ्ठल रखुमाई आणि जांभूळ आख्यान ही त्यांची काही अविस्मरणीय लोकनाटय किंवा नाटकं म्हणता येतील. त्यांनी “ फु बाई फुगडी फू” या नावानं आत्मचरित्रही लिहिलं आहे. याबरोबरच त्यांनी “माझी वाणी भीमा चरणी,” “रंग शाहिरीचे” अशा स्वरुपात साहित्य निर्मितीही केली आहे. 1996 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनानं राज्य सांस्कृतिक पुरस्कारानं तर 2001 मध्ये दलित मित्र पुरस्कारानं गौरविलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शाहिरी शिबिरांचे ते चार वर्षे संचालक होते. या बरोबरच मुंबई विद्यापीठातील लोककला आकादमीचे ते सल्लागार होते.

आकाशवाणीचे परिक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानशीही त्यांचा संबंध होता. आपल्या कलागुणांच्या, गितांच्या, साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न राहिला. लोककलेल्या माध्यमातून प्रबोधनाची पताका अखेरपर्यंत खांद्यावर घेऊन आयुष्यभर मराठी भाषा ; संस्कृती आणि आंबेडकरी विचारांचा जागर करणाऱ्या या लोककलावंतास महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.

आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधीत्व करुन देशाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिकही मिळवून दिलं होतं. 1983 मध्ये आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव त्यांनी गाजवला होता. त्यांचा मुलगा नंदेश उमप यांची परंपरा नव्या उमेदिनं आणि जोमानं चालवतो आहे.

यशवंत भंडारे, औरंगाबाद