ब्लॉग

बुद्ध धम्मा विषयी आत्मीयता असणारे विवेकानंद जगाला सांगणे गरजेचे

दिनांक 19 मार्च 1894 ला डेट्राइत येथे झालेल्या व्याख्यानमालेत “आशियातील दिपाचा धर्म अर्थात बुद्ध धम्म” या विषयावर विवेकानंद यांनी व्याख्यान दिले, आपल्या व्याख्यानात विवेकानंदानी प्राचीन धर्ममतांचे विस्तृत समालोचन केले. यज्ञवेदीवर होणाऱ्या लाखो पशूंच्या बलिदानाने त्यांनी वर्णन केले. बुद्धांच्या जन्माची आणि जीवनाची हकीकत सांगितली.

विश्वाची निर्मिती आणि अस्तित्व यांच्या कारणाविषयी बुद्धांनी स्वतःला कूट प्रश्न विचारले, सृष्टी आणि जीवन यांचे रहस्य उकलण्यासाठी बुद्धांनी तळमळीने कशी धडपड केली,आणि त्यातून शेवटी काय निष्पन्न झाले ते सर्व विवेकानंदानी सांगितले. बुद्ध इतर लोकाहून श्रेष्ठ आहेत असे ते म्हणाले. बुद्धांनी जे काही केले ते सर्व लोकांच्या हितासाठी केले. बुद्धांनी घेतलेला प्रत्येक श्वास आणि अन्नाचा घास हा सर्वांच्या हिता साठी होता हे सगळ्यांना मान्य करावे लागते,मग ते बुद्धांचे मित्र असोत कि शत्रू असोत.

विवेकानंद पुढे म्हणाले कि बुद्धांनी आत्म्याचा पूर्वजन्म कधीच प्रतिपादित केला नाही.समुद्रावर लाट उत्पन्न होते आणि नाहीशी होते.नाहीशी झालेली लाट पुढील लाटेला केवळ गतीच प्रदान करते. विलीन झालेला आत्मा हा त्यांनतर येणाऱ्या आत्मयालाही फक्त गतीचा प्रदान करतो.असा बुद्धांचा विस्वास होता,(विवेकानंद यांचे मत आहे) ईश्वर आहे किंवा नाही यावरही बुद्धांनी उपदेश केला नाही.

” त्यांच्या शिष्यांनी त्यांना एकदा विचारले, आम्ही चांगले कशाकरीता बनावे? “कारण तुम्हांला चांगुलपणाचा वारसा मिळाला आहे. असे बुद्ध त्यांना म्हणाले. तुम्ही परत आपल्या वंशजांना चांगुलपणाचा वारसा द्या. अशा रीतीने वाढत जाणारा चांगुलपणा चोहोकडे पसरेल असा आपण सर्वजण प्रयत्न करू.हा चांगुलपणा निर्हेतुक असला पाहिजे. चांगले होण्यासाठीच हा चांगुलपणा पाहिजे.’ बुद्ध हे पहिले प्रेषित होते. त्यांनी इतर कोणालाही शिव्या दिल्या नाहीत किंवा कोणीहि गोष्टीची आढयता बाळगली नाही.धार्मिक क्षेत्रात स्वयं प्रयत्नाने स्वताची मुक्ती प्राप्त करावी लागते अशी त्यांची श्रद्धा होती.

मृत्यू शय्येवर असताना भगवान बुद्ध म्हणाले ‘ मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, मीच काय पण कोणीही तुम्हाला काही एक सांगू शकणार नाही. तुम्ही कोणावरही विसंबुन राहू नका. स्वताच्या प्रयत्नाने स्वताची मुक्ती करून घ्या. मानवामानवातच काय पण मनुष्य आणि पशु यांच्यात देखील जी विषमता आढळते तिचा बुद्धांची निषेध केला.”सर्व जीव समान आहेत” असा उपदेश ते करीत,त्यांनीच सर्वप्रथम मद्यपानाचा निषेध केला.चांगले व्हा आणि चांगले करा असे ते म्हणत असत.बुद्धांनीच सर्व प्रथम धर्म प्रचारक तयार केले. भारतामधील लक्षावधी गोरगरिबांचा त्यांनी उद्धार केला. सर्वसामान्य लोक त्यांचे तत्वज्ञान समजू शकले नाहीत,पण त्यांनी त्यांचे जीवन पहिले, त्यांची शिकवण ऐकली आणि त्यांचे अनुयायी बनले.समारोप करताना विवेकानंद म्हणाले कि बुद्ध धम्म हा ख्रिस्ती धर्माचा पाया आहे,आणि कॅथोलिक पंथ हा धम्मा पासून निघालेला आहे.

धम्मा विषयी आत्मीयता असणारे विवेकानंद जगाला सांगणे गरजेचे आहे, धम्माचा त्यांच्यावर असलेल्या पगड्या मुळेच त्यांनी जागतिक धर्म परिषदेत आपल्या आपल्या भाषणाची सुरवात “बंधू आणि भगिनींनो” करून श्रोत्यांची मने जिंकली होती. बंधू भावाची शिकवण देणारा एकमेव मार्ग बुद्धांनी सांगितला इतर कोणीच सांगितला नाही.यामुळेच संपुर्ण जग धम्माकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे.

दिनकर सोनकांबळे