आंबेडकर Live

व्हिजाच्या प्रतीक्षेत – आंबेडकरी साहित्यातील एक महत्त्वाचा दस्तावेज

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत एकच आत्मचरित्र लिहीले. हे आत्मचरित्र वेटिंग फॉर अ व्हिजा नावाने इंग्रजीत प्रकाशित झाले होते. अवघ्या वीस पानांचे हे चरित्र आंबेडकरी साहित्यातील एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. आजवर ज्यांना कुणाला हे आत्मचरित्र वाचवयास मिळालेले नाही खास त्या सर्व वाचकांसाठी इथे प्रकाशित करत आहोत. नक्की वाचा. आपल्या वॉलवर शेअर करा. व्हॉट्सअपवर देखील शेअर करा.

व्हिजाच्या प्रतीक्षेत – अस्पृश्यतेच्या कटु आठवणी

परदेशीयांना अस्पृश्यता अस्तित्वात आहे, हे माहीत असते; परंतु ती खरे सांगायचे म्हणजे पुढच्या दाराने माहीत नसल्यामुळे (ती त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली नसल्यामुळे) ती प्रत्यक्षात किती जुलमी आहे, हे समजण्यास ते असमर्थ असतात. बहुसंख्य हिंदूंचा समावेश असलेल्या गावाच्या टोकाला थोडेसे अस्पृश्य राहतात. ते त्या गावाला आत्यंतिक घाणीपासून मुक्त करतात. सर्व प्रकारचे निरोप (सांगावे) पोचविण्यासाठी रोज गावोगाव पायपीट करतात. हिंदूंच्या दारात अन्न (तराळकी) मागतात, दूर अंतरावर उभे राहून हिंदू बनियाच्या (वाण्याच्या) दुकानांतून मसाले व तेल विकत घेतात, गावाला सर्वतोपरी आपले घर मानतात. पण तरीही त्या गावातील कोणालाही कधीच स्पर्श करीत नाहीत किंवा त्यांचा स्पर्शही होऊ देत नाहीत, हे कसे काय शक्य आहे, हे परदेशीयांना समजणे कठीण आहे. सवर्ण हिंदू अस्पृश्यांना जी वागणूक देतात, तिची ओळख करुन देण्याचा उत्तम मार्ग कोणता, हा एक प्रश्न आहे. (अस्पृश्यतेचे) सर्वसाधारण वर्णन अथवा अस्पृश्यांना देण्यात आलेल्या वागणुकीच्या प्रकरणांचा पूर्वेइतिहास, ह्या दोन्ही पध्दतींनी हा उद्देश साध्य करता येईल. मला वाटते की, पूर्वेइतिहासाची पध्दती आधीच्या पध्दतीपेक्षा अधिक प्रभावी ठरेल. ही उदाहरणे निवडताना मी थोडेसे माझ्या अनुभवाकडे व थोडेसे इतरांच्या अनुभवाकडे लक्ष वेधले आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या घटनांपासून मी सुरुवात करतो.

आमचे कुटुंब मुळात मुंबई इलाख्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून आले. जेव्हापासून ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य सुरु झाले अगदी तेव्हापासून कंपनीच्या सैन्यात नोकरी करावी लागल्याने माझ्या वाड-वडिलांनी त्यांचा वारसाने येणारा व्यवसाय सोडून दिला. माझ्या वडिलांनी देखील कुटुंबाची परंपरा पाळली व त्यांनी सैन्यात नोकरी मिळवली. ते अधिकाऱ्याच्या दर्जापर्यंत पोहोचले. ते सेवानिवृत्त झाले तेव्हा ते सुभेदार होते. सेवानिवृत्त झाल्यावर माझ्या वडिलांनी कायमची वस्ती करण्याच्या हेतूने दापोलीला कुटुंब हलविले. परंतु काही कारणास्तव माझ्या वडिलांनी आपला विचार बदलला. कुटुंब दापोली सोडून सातारा येथे गेले. तेथे आम्ही १९०४ पर्यंत राहिलो. मी लिहीत आहे ती, त्याचप्रमाणे मी जी आठवू शकतो ती पहिली घटना सुमारे १९०१ साली घडली. तेव्हा आम्ही सातारा येथे राहत होतो. माझी आई तेव्हा मरण पावली होती. आमचे वडील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गोरेगाव येथे कॅशियरच्या कामावर बाहेर होते. तेथे हजारोंच्या संख्येने मरत असलेल्या दुष्काळग्रस्त पीडीत लोकांना रोजगार देण्यासाठी मुंबई सरकारने तलाव खोदण्याचे काम सुरू केले होते. जेव्हा माझे वडील गोरेगावला गेले तेव्हा त्यांनी मला, माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या माझ्या भावाला आणि मरण पावलेल्या माझ्या सर्वात लहान बहिणीच्या दोन मुलांना माझ्या आत्याच्या व काही दयाळू शेजाऱ्यांच्या हवाली केले. माझी आत्या अत्यंत मायाळू होती. परंतु तिचा आम्हांला काही उपयोग झाला नाही. ती काहीशी बुटकी होती आणि तिला पायांचा त्रास होता. त्यामुळे तिला कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय हालचाल करणे अत्यंत कठीण जाई. बऱ्याचदा तिला उचलून न्यावे लागे. मला बहिणी होत्या. त्यांची लग्ने झालेली होती व त्या त्यांच्या कुटुंबासह दूर राहत होत्या. आमची आत्या तिच्या असहाय्यतेमुळे जेवण तयार करण्याचे काम करु शकत नव्हती. त्यामुळे जेवण तयार करणे, ही आमची विशेष समस्या बनली होती. आम्ही भाकरी तयार करु शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही पुलावावर राहिलो. तो तयार करण्याचे सर्वात सोपे असल्याचे आम्हांला आढळून आले. त्यासाठी तांदूळ आणि मटण मिसळणे, यापेक्षा आणखी काही करण्याची आवश्यकता नसे.

कॅशियर असल्यामुळे माझे वडील आपले ठाणे सोडून आम्हाला पाहण्यासाठी साताऱ्याला येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी, आम्हांला गोरेगावला यावे व आमची उन्हाळ्याची सुट्टी त्यांच्याबरोबर घालवावी, असे आम्हाला लिहिले. आम्ही मुले त्या सूचनेने अत्यंत उत्तेजित झालो. कारण, विशेष म्हणजे तोपर्यंत आम्हांपैकी कोणीच आगगाडी पाहिलेली नव्हती. मोठी तयारी करण्यात आली. इंग्लिश बनावटीचे नवीन शर्ट, चकाकणाऱ्या भिंगाच्या टोप्या, नवीन बूट, नवीन रेशीम किनारीची धोतरे प्रवासासाठी मागवण्यात आली. माझ्या वडिलांनी आमच्या प्रवासाबाबतचा सर्व तपशील दिला आणि कोणत्या दिवशी आम्ही निघणार हे त्यांना कळवावे असे सांगितले. उद्देश असा की, ते त्यांचा शिपाई रेल्वे स्टेशनवर आम्हाला भेटून आम्हाला गोरेगावला आणण्यासाठी पाठवू शकले असते. ह्या व्यवस्थेनुसार मी स्वतः, माझा भाऊ व माझ्या बहिणीच्या मुलांपैकी एक जण यांनी सातारा सोडले. आमच्या आत्याला शेजाऱ्यांकडे सोपविले. त्यांनी तिची काळजी घेण्याचे वचन दिले. रेल्वे स्टेशन आमच्या जागेपासून १० मैल दूर होते आणि टांग्याची (दोन घोड्यांच्या गाडीची) आम्हाला स्टेशनला नेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. आम्ही विशेष प्रसंगासाठी करतात तसा पेहराव केला होता. आम्ही आमचे घर अत्यानंदाने परंतु आमच्या आत्याच्या रडण्या-ओरडण्यात सोडले. ती आमच्या जाण्याच्या दुःखाने बहुतेक कोलमडली होती…

आम्ही जेव्हा स्टेशनवर पोहोचलो, तेव्हा माझ्या भावाने तिकिटे आणली आणि मला व माझ्या बहिणीच्या मुलाला आमच्या मर्जीनुसार खर्च करण्यासाठी प्रत्येकाला पाॅकेटमनी म्हणून दोन दोन आणे दिले. लगेच आम्ही चैनीचे जीवन सुरू केले. प्रत्येकाने लगेच लेमोनेडच्या बाटलीची आॅर्डर दिली. थोड्या वेळाने आगगाडीने शिटी दिली. ती सुटेल या भीतीने मोठ्या चपळाईने आम्ही तिच्यात चढलो. आम्हाला गोरेगावच्या रेल्वे स्टेशनपासून अत्यंत जवळ असलेल्या मसूर रेल्वे स्टेशनवर उतरायला सांगण्यात आले होते.

संध्याकाळी पाचच्या सुमारास आगगाडी मसूरला पोहोचली. आम्ही आमचे सामानसुमान घेऊन खाली उतरलो. काही मिनिटांतच आगगाडीमधून उतरलेले सर्व प्रवासी आपापल्या ठिकाणी निघून गेले. प्लॅटफॉर्मवर आम्ही चारच मुले उरलो. आम्ही आमच्या वडिलांची व त्यांनी पाठवतो म्हणून सांगितलेल्या नोकराची वाट पाहत होतो. आम्ही बराच वेळ थांबलो परंतु कोणीही फिरकले नाही. एक तास गेला. स्टेशन मास्टर चौकशीसाठी आला. त्याने आमच्या तिकिटांविषयी विचारले. ती आम्ही त्याला दाखवली. आम्ही का खोळंबून राहिलोय, असे त्याने विचारले. आम्ही त्याला सांगितले की, आम्हाला गोरेगावला जायचे आहे आणि आम्ही आमचे वडील किंवा त्यांचा नोकर येण्याची वाट पाहत आहोत, परंतु त्यांच्यापैकी कोणीच फिरकलेले नाहीत व आम्हाला गोरेगावला कसे जायचे, हेही माहीत नाही. आम्ही चांगले कपडे घातलेली मुले होतो. आमच्या कपड्यावरुन किंवा बोलण्यावरून आम्ही अस्पृश्यांची मुले होतो, हे कोणीच समजू शकले नसते. खरोखर, स्टेशन मास्टरला, आम्ही ब्राह्मणाची मुले आहोत अशी पूर्ण खात्री झाली होती आणि आम्हाला अशा दु:स्थितीत पाहून त्याला अतीव दुःख झाले होते. हिंदुंच्या नेहमीच्या पद्धतीने स्टेशन मास्टरने तुम्ही कोण आहात, असे विचारले. क्षणाचाही विचार न करता, ‘आम्ही महार आहोत,’ असे मी तात्काळ उत्तर दिले (मुंबई इलाख्यात महार ही अस्पृश्य समजली जाणारी एक जमात आहे.) त्याला धक्का बसला. त्याचा चेहरा क्षणार्धात पालटला. तिटकाऱ्याच्या विचित्र भावनेने त्याचा कब्जा घेतला असल्याचे आम्ही पाहू शकत होतो. माझे उत्तर ऐकल्याबरोबर तो त्याच्या खोलीत परत गेला आणि आम्ही होतो तिथेच उभे राहिलो. पंधरा ते वीस मिनिटे गेली; सूर्य जवळ जवळ बुडायला आला. वडीलही आले नव्हते किंवा त्यांनी नोकरही पाठवला नव्हता. आणि आता स्टेशन मास्टरही सोडून गेला होता. आम्ही अगदी भांबावून गेलो होतो आणि प्रवासाच्या सुरूवातीला आम्हाला जी मौजमजा व आनंद वाटला होता त्याची जागा आता अत्यंत उदासीनतेच्या भावनेने घेतली होती.

अर्ध्या तासानंतर स्टेशन मास्टर परत आला. आम्ही काय करायचे ठरवले आहे, असे त्याने विचारले. आम्ही सांगितले की, आम्हाला जर बैलगाडी भाड्याने मिळू शकली तर आम्ही गोरेगावला जावू आणि ते जर फार दूर नसेल तर आम्ही थेट निघू. तेथे अनेक बैलगाड्या भाड्याने मिळत होत्या. परंतु आम्ही महार आहोत हे मी स्टेशन मास्टरला दिलेले उत्तर गाडीवानांमध्ये देखील पोहोचले होते व त्यांच्यापैकी कोणाचीही विटाळ करुन घेण्याची आणि अस्पृश्य वर्गाच्या प्रवाशांना वाहून स्वतःला नीच ठरविण्याची तयारी नव्हती. आम्ही दुप्पट भाडे द्यायला तयार होतो. परंतु पैशाने काम होऊ शकले नाही, असे आम्हाला दिसून आले. आमच्या वतीने वाटाघाटी करणारा स्टेशन मास्टर, काय करावे, हे न समजल्याने शांत उभा राहिला. अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकून गेल्याचे दिसून आले. त्याने आम्हाला विचारले, “तुम्ही गाडी चालवू शकाल काय?” आमच्या अडचणीचे उत्तर तो उत्तर शोधत आहे असे वाटून आम्ही ओरडलो. “होय, आम्ही चालवू शकतो.” ते उत्तर ऐकल्यावर तो गेला आणि त्याने आमच्या वतीने असे ठरवून दिले की, आम्ही गाडीवानाला दुप्पट भाडे द्यायचे आणि गाडी चालवायची आणि त्याने आमच्या प्रवासात गाडी बरोबर पायी चालायचे. दुप्पट भाडे मिळवण्याची संधी मिळाल्याने आणि विटाळापासून देखील वाचणार असल्याने, एक गाडीवान तयार झाला.

६.३० च्या सुमारास आमची निघायची तयारी झाली. परंतु अंधार पडण्याच्या आधी आम्ही गोरेगावला पोहचू शकू, याची खात्री देईपर्यंत स्टेशन सोडायचे नाही, असा आमचा निर्धार होता. त्यामुळे आम्ही गाडीवानाला तो गोरेगावला केव्हा पोहोचेल ती वेळ व अंतर, याची विचारणा केली. तीन तासांपेक्षा अधिक वेळ लागणार नाही, असे त्याने आम्हाला आश्वासन दिले. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही आमचे सामान गाडीत ठेवले, स्टेशन मास्टरचे आभार मानले आणि गाडीत चढलो. आमच्यापैकी एकाने लगाम घेतले आणि गाडी सुरु झाली.

गाडीवान आमच्या बाजूबाजूने चालत होता. स्टेशनपासून फार दूर नाही अशा अंतरावर नदी वाहत होती. ती अगदी कोरडी होती. तिच्यात काही ठिकाणी लहान लहान पाण्याची तळी होती. गाडीच्या मालकाने (गाडीवानाने) तुम्ही इथेच उतरून भाकरी खाऊन घ्या, पुढे तुम्हाला पाणी प्यायला मिळणार नाही असे सुचवले. ते आम्ही मान्य केले. त्याने त्याला त्याचे जेवण करण्यासाठी गावात जाता यावे म्हणून त्याच्या भाड्यातील भाग देण्यास सांगितले. माझ्या भावाने त्याला काही पैसे दिले. लवकरच परत येतो, असे आश्वासन देऊन तो गेला. आम्ही फारच भुकेजलो होतो आणि जेवणाची संधी मिळाल्यामुळे आम्हाला आनंद वाटत होता. माझ्या आत्याने शेजारच्या बायांना कामाला लावून आम्हाला वाटेत खाण्यासाठी काही गोडधोड पदार्थ बनवले होते. आम्ही जेवणाचे डबे उघडले आणि खायाला सुरूवात केली. आम्हाला भांडी धुण्यासाठी पाणी हवे होते. आमच्यापैकी एक जण जवळच्या नदीच्या पात्रातील पाण्याच्या (साचलेल्या) तळ्याकडे गेला. परंतु ते पाणी खरोखर पाणी नव्हते. तो, त्या तळ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या गायींच्या, म्हशींच्या व इतर गुरांच्या शेणाचा व मूत्राचा दाट चिखल होता. वस्तुतः ते पाणी मानवी वापरासाठी नव्हते. काहीही असो, त्या पाण्याचा दर्प इतका उग्र होता की, आम्ही ते पाणी पिऊ शकलो नाही. त्यामुळे आम्हाला जेवण्याचे समाधान मिळण्याच्या आतच जेवण आटोपते घ्यावे लागले व आम्ही गाडीवान येण्याची वाट पाहत बसलो. बराच वेळ झाला तरी तो आला नाही. आम्ही त्याचा सर्व दिशांनी शोध घेणे एवढेच करु शकत होतो. अखेर तो आला आणि आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही सुमारे चार ते पाच मैल गाडी हाकली व तो पायी चालला. नंतर त्याने अचानक गाडीत उडी मारली आणि आमच्या हातातून दोऱ्या घेतल्या. त्या माणसाची ती कृती आम्हाला चमत्कारिक वाटली. कारण त्याने विटाळाच्या भीतीने आम्हाला गाडी भाड्याने द्यायला नकार दिला होता. त्यानेच त्याच्या धर्माचे सर्व निर्बंध बाजूला ठेवले आणि आम्हाला त्याच गाडीत त्याच्याबरोबर बसू दिले. परंतु आम्हाला त्याबाबतीत कसलाही प्रश्न विचारण्याचे धाडस नव्हते.

गोरेगाव या इच्छित स्थळी शक्य होईल तितक्या लवकर पोहोचण्यास आम्ही आतुर होतो. काही काळ आम्ही गाडीच्या हालचालीतच गुंग होतो. परंतु लवकरच आमच्या सभोवती अंधार पसरला. अंधारात दिलासा देण्यासाठी रस्त्यावरील दिवे नव्हते. आम्ही माणसांत आहोत असे वाटावे, असा कोणीही पुरुष किंवा स्त्री किंवा गुरेदेखील जवळून जात नव्हती. आम्हाला वेढलेल्या एकाकीपणाची आम्हाला भीती वाटू लागली. आमची आतुरता वाढत होती. आमचे सर्व धैर्य आम्ही एकवटले. आम्ही मसूरपासून फार दूरवर आलो होतो. तीन तासांहून अधिक काळ गेला होता. परंतु गोरेगाव येण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. आमच्या मनात एक विचित्र विचार आला. आम्हाला असा संशय आला की, घात करण्याचा गाडीवानाचा उद्देश असावा व आम्हाला ठार करण्यासाठी तो आम्हाला एखाद्या निर्जन ठिकाणी घेऊन चालला असावा. आमच्या अंगावर पुष्कळ सोन्याचे दागिने होते व त्यामुळे आमचा संशय बळावला. गोरेगाव (अजून) किती दूर आहे, तिथं पोहाचायला आपल्याला इतका उशीर का होतोय, असे विचारायला आम्ही सुरुवात केली. तो सांगत राहिला, “ते फार दूर नाही, आपण लवकरच तिथं पोहचू.” रात्रीचे १० वाजले तरी गोरेगावचा पत्ता नाही, हे पाहिल्यावर आम्ही मुलांनी रडायला व गाडीवानाला शिव्या द्यायला सुरुवात केली. आमची रडारड व आक्रोश बराच काळ चालला. गाडीवानाने काहीच उत्तर दिले नाही. अचानक आम्हाला काही अंतरावर एक दिवा जळताना दिसला. गाडीवान म्हणाला, “तुम्हाला तो दिवा दिसतोय ना? तो दिवा जकात गोळा करणाऱ्याचा (टोलनाक्यावरचा) आहे. आपण तिथं रात्रीपुरता मुक्काम करु.” आम्हाला थोडं बरं वाटलं आणि आम्ही रडायचं थांबवलं. दिवा दूर अंतरावर होता, परंतु आम्ही तिथं पोहचू असं कधीच वाटलं नाही. जकात वसूलकर्त्याच्या झोपडीपर्यंत पोहोचण्यासाठी दोन तास लागले. मध्यंतरीच्या काळात आमची उत्कंठा वाढल्याने आम्ही गाडीवानाला सर्व प्रकारचे प्रश्न विचारणे चालू ठेवले. उदाहरणार्थ, त्या ठिकाणी पोहोचायला का उशीर होतोय? आपण त्याच रस्त्याने चाललो आहोत ना, इत्यादी.

अखेरीस मध्यरात्री, गाडी जकात वसुलीकारांच्या झोपडीजवळ पोहोचली. ती डोंगराच्या पायथ्याशी परंतु डोंगराच्या दुसऱ्या बाजूला होती. आम्ही आलो तेव्हा पुष्कळ बैलगाड्या रात्रीसाठी विसावा घेत असल्याचे आम्ही पाहिले. आम्ही पराकोटीचे भुकेजलो होतो व आम्हाला पुष्कळ खायचे होते. परंतु पुन्हा तेथे पाण्याचा प्रश्न होता. त्यामुळे आम्ही आमच्या गाडीवानाला, पाणी मिळू शकेल का, असे विचारले. जकात वसूल करणारा हिंदू आहे व आम्ही जर महार आहोत असे सत्य सांगितले तर आम्हाला पाणी मिळण्याची शक्यता नाही, असा त्याने आम्हाला इशारा दिला. तो म्हणाला, “तुम्ही मुसलमान आहात, असे सांगा व नशीब अजमवा.” त्याच्या सल्ल्यानुसार मी जकात वसुलीकाराच्या झोपडीकडे गेलो आणि तो आम्हाला थोडे पाणी देऊ शकेल काय, असे विचारले. “तुम्ही कोण आहात?” त्याने चौकशी केली. आम्ही मुसलमान आहोत, असे मी उत्तर दिले. मी त्याच्याशी उर्दूतून संभाषण केले. त्यामुळे मी खरा मुसलमान आहे, याविषयी त्याच्या मनात काही शंका राहणार नाही, हे मला अगदी बरोबर माहीत होते. परंतु ती चलाखी उपयोगी पडली नाही. त्याचे उत्तर अगदी तुसडे होते, “तुझ्यासाठी कुणी पाणी ठेवलंय? डोंगरावर पाणी आहे, तुला पाहिजे असेल तर जा आणि घे, इथे काही नाही.” असे म्हणून त्याने मला निकालात काढले. मी गाडीकडे परत आलो. व त्याचे उत्तर माझ्या भावाला सांगितले. माझ्या भावाला काय वाटले कुणास ठाऊक. त्याने आम्हाला तिथेच पहुडायला सांगितले.

बैलाचे जू काढण्यात आले व गाडी जमिनीवर उतार करुन ठेवण्यात आली. आम्ही गाडीच्या आतील तळाच्या फळ्यांवर आमचे बिछाने पसरले आणि विश्रांतीसाठी अंग टाकले. आता आम्ही सुरक्षित ठिकाणी आलो त्यामुळे काय घडेल, याची आम्हाला धास्ती नव्हती. परंतु आमची मने शेवटच्या घटनेचा सतत येणारा विचार टाळू शकत नव्हती. आमच्याकडे पुष्कळ अन्न होते. आमच्या पोटात भुकेचा जाळ पेटला होता; असे असताना आम्हाला न जेवता झोपावे लागणार होते, त्याचे कारण आम्हाला पाणी मिळू शकत नव्हते, कारण आम्ही अस्पृश्य होतो. अशा प्रकारचा अंतिम विचार आमच्या मनात आला. आपण सुरक्षित जागी आलो आहोत, असे मी म्हणालो. माझ्या थोरल्या भावाने स्पष्टपणे त्याच्या कुशंका काढल्या आपण सर्वच्या सर्व चारही जणांनी झोपणे, हे शहाणपणाचे ठरणार नाही. काहीही घडेल. त्याने असे सुचवले की, एका वेळी दोघांनीच झोपावे आणि दोघांनी लक्ष ठेवावे. अशा प्रकारे आम्ही त्या डोंगराच्या पायथ्याशी रात्र घालवली.
भल्या पहाटे ५ वाजता गाडीवान आला व आम्ही गोरेगावला निघावे, असे त्याने सुचवले. आम्ही सरळसरळ नकार दिला. आम्ही ८ वाजेपर्यंत हलणार नाही, असे आम्ही त्याला सांगितले. आम्हाला आणखी कसलीही जोखीम घ्यायची नव्हती. तो काहीही बोलला नाही. अशा प्रकारे आम्ही ८ वाजता निघालो व ११ वाजता गोरेगावला पोहोचलो. आम्हाला पाहून माझ्या वडिलांना आश्चर्य वाटले. आम्ही येत असल्याचे आम्ही त्यांना काहीच कळवले नव्हते, असे त्यांनी सांगितले. आम्ही कळवले होते, असे आम्ही त्यांना आवर्जून सांगितले. त्यांनी वस्तुस्थिती नाकारली. अखेर असे उघड झाले की, चूक माझ्या वडिलांच्या नोकराची होती. त्याला आमचे पत्र मिळाले होते परंतु ते पत्र माझ्या वडिलांना द्यायचे त्याच्याकडून राहून गेले होते.

ह्या घटनेला माझ्या जीवनात अत्यंत महत्व आहे. मी नऊ वर्षाचा असताना ती घडली. परंतु तिने माझ्या मनावर अमीट असा #ठसा उमटवला. हा प्रसंग घडण्यापूर्वी मी एक अस्पृश्य आहे व अस्पृश्यांना काही अवहेलनांच्या व भेदभावांच्या अधीन राहावे लागते, हे मला माहीत होते. उदाहरणार्थ, शाळेत माझ्या रँकप्रमाणे मी वर्गातील मुलांमध्ये बसू शकत नव्हतो तर मला स्वतःहून एका कोपऱ्यात बसावे लागत होते, हे मला माहीत होते. शाळेच्या वर्गात अंथरण्यासाठी माझ्याकरिता एक स्वतंत्र पोत्याचा तुकडा (गोणपाट) होता व मी वापरलेल्या त्या पोत्याच्या तुकड्याला शाळा स्वच्छ करणारा नोकर शिवू शकत नव्हता, हे मला माहीत होते. मला तो पोत्याचा तुडका संध्याकाळी घरी घेऊन जावा लागे व दुसऱ्या दिवशी तो परत आणावा लागे. शाळेत असताना स्पृश्य वर्गातील मुले तहान लागल्यावर पाण्याच्या नळाकडे जाऊन व तो नळ उघडून आपली तहान भागवू शकत होती, हे मला माहीत होते. त्यासाठी फक्त शिक्षकाची परवानगी आवश्यक असे. परंतु माझी स्थिती वेगळी होती. मी नळाला स्पर्श करू शकत नव्हतो आणि तो नळ एखाद्या स्पृश्य व्यक्तीने उघडल्याशिवाय माझी तहान भागवणे मला शक्य नव्हते. माझ्या बाबतीत शिक्षकांची परवानगी पुरेशी नव्हती. त्यासाठी शाळेचा शिपाई उपस्थित असणे आवश्यक असे, कारण वर्गशिक्षक अशा प्रयोजनांसाठी ज्याला कामाला लावू शकेल, असा तोच एक माणूस असे. जर शिपाई उपलब्ध नसेल तर मला पाण्याशिवाय राहावे लागे. ही परिस्थिती सारांश रूपाने, शिपाई नाही तर पाणी नाही, या एका सूत्रात सांगता येईल.

घरी कपडे धुण्याचे काम माझ्या बहिणी करीत, हे मला माहीत होते. आम्ही धोब्याला पैसे देऊ शकत नव्हतो, असे नाही. माझ्या बहिणी कपडे धूत, कारण आम्ही अस्पृश्य होतो व कोणाही धोब्याने अस्पृश्याचे कपडे धुतले नसते. माझ्यासकट मुलांचे केस कापायचे किंवा हजामत (मुंडन) करायचे काम आमची थोरली बहिण करायची. आमच्यावर ह्या कलेचा सराव केल्याने ती तरबेज न्हावी बनली होती. साताऱ्यात न्हावी नव्हते, असे काही नाही, आम्ही न्हाव्याला पैसे देऊ शकत नव्हतो, असेही नाही. हजामत करण्याचे व केस कापण्याचे काम माझ्या बहिणीने केले, त्याचे कारण आम्ही अस्पृश्य होतो व कोणताही न्हावी अस्पृश्याची हजामत करण्यास तयार झाला नसता. हे सर्व मला माहीत होते. परंतु ह्या घटनेने मला ही घटना घडण्याच्या आधी कधीही बसला नाही असा धक्का बसला व या घटनेने अस्पृश्यतेविषयी विचार करायला लावले. ही घटना घडण्यापूर्वी अनेक स्पृश्य तसेच अस्पृश्य यांच्यात जशी असते तशीच ती एक सर्वसामान्य नित्याची बाब होती.

लेखक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संकलक – Er Suraj Talvatkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *