ब्लॉग

“पांडव बौद्ध होते का?”

माझ्यासारख्या अनेक इतिहास आणि लेणींमध्ये रुची असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. जगभरातल्या संशोधकांनी मान्य केले आहे कि पांडवांचे कुठलेही पुरातत्त्वीय अथवा ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही आणि जे काही साहित्यात उपलब्ध आहे ते “मिथक” या प्रकारात मोडते. मात्र तरीही समजा थोड्यावेळ आपण पांडव होऊन गेले असे गृहीत धरले, तर पांडव त्यांच्या वनवास काळात कुठे कुठे हिंडले हे तेथील प्राचीन वास्तूंच्या नामकरणातून कळते. या वास्तूंना पांडवकालीन किंवा पांडव निर्मित म्हणतात. मुळात त्या वास्तू आहेत तरी कोणत्या याचा एक आढावा…

भारतामध्ये अंदाजे १२०० लेणीं कोरल्या आहेत, त्यापैकी अंदाजे ११०० लेणीं बौद्ध भिक्खूंसाठी दान देण्यात आल्या आहेत म्हणजेच या सर्व ११०० बुद्ध लेणीं आहेत. हे देखील या लेणींतील शिल्पकला, स्थापत्य आणि शिलालेखांवरून सिद्ध झाले आहे. भारतामध्ये सर्वात पहिली लेणीं कोरली ती सम्राट अशोकाने – बाराबर आणि नागार्जुनी डोंगरांमध्ये इ.स. पूर्व २७० साली. लेणीं कोरण्याची ही परंपरा सतत सुरु होती ते अंदाजे इ.स. ७व्या शतकापर्यंत. ११व्या शतकाच्या दरम्यान आणि त्यानंतर (जेव्हा बौद्ध धम्म लयाला गेला) अनेक लेणींमध्ये अतिक्रमण केले गेले ते आजतागायत!

अनेक स्तूपांची मोडतोड करून त्याला पिंडीचा आकार देण्यात आला, अनेक शिलालेख नष्ट करण्यात आली, अनेक लेणींवर कबजा करून तेथील विहारात अथवा भिक्खू निवासगृहात अन्य पंथाच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या…अनेक लेणींची नामकरण करण्यात आले. यातील बहुतांश लेणीं या “पांडव लेणीं” म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील काही उदाहरणे –

१. श्री पांडव लेणीं, पचमढी, मध्य प्रदेश. हा ६ लेणींचा समूह दोन कालखंडात कोरला गेला आहे. इ.स. पहिल्या शतकात आणि ६व्या ते ७व्या शतकात. इथल्या कथेनुसार पांडव येथे १२ ते १३ वर्ष राहिले आणि प्रत्येक भावासाठी आणि द्रौपदीसाठी एक लेणीं कोरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांच्या माहितीनुसार हा बुद्ध लेणींचा समूह आहे. तेथील भाजक्या विटांच्या स्तूपाचे अवशेष आजही दिसतात.

२. पांडव लेणीं किंवा आरवलेम लेणीं, बिचोलिम, गोवा. हा पाच लेणींचा समूह असून ४थ्या शतकात या लेणीं कोरलेल्या आहेत. येथे सांगण्यात येणाऱ्या कथेनुसार पांडव येथे १२ वर्षे राहिले होते. आज येथील एका लेणीत पिंड ठेवण्यात आली आहे. येथील प्रांगणात एक मोठी बुद्धमूर्ती कोरण्यात आली होती. सध्या ती गोवा संग्रहालयामध्ये आहे.

३. पांडव लेणीं, मंगळुरु, कर्नाटक. या लेणीं ६व्या शतकात कोरल्या आहेत. इथल्या कथेनुसार वनवासाच्या काळात पांडव येथे राहत होते. पूर्वी येथे “कंदरीक विहार” अस्तित्वात होते व बौद्ध धम्माच्या महायान पंथाचे एक प्रमुख केंद्र होते. येथे असलेल्या बोधिसत्त्वाची मूर्तीचे रूपांतर शंकराच्या मूर्तीत करण्यात आले व या विहाराचे रूपांतर ‘काद्री मंजुनाथ मंदिर’ असे झाले आहे.

४. पांडव लेणीं, पळसंबे, गगनबावडा, महाराष्ट्र. येथील आख्यायिकेनुसार पांडवांनी येथे तप केले होते. अंदाजे सातव्या शतकातील या लेणीं असून आजही तेथे स्तूपाचे अवशेष दिसतात. प्रशस्त विहार, नक्षीदार खिडक्या, स्तंभ आकर्षक आहेत व सर्व बौद्ध स्थापत्याच्या खुणा दर्शवितात.

५. पांडव लेणीं, नाशिक. येथे २५ लेणीं व २७ शिलालेख आहेत. आख्यायिकेनुसार वनवासात पांडव येथे येऊन राहिले व एका रात्रीत या सर्व लेणीं कोरल्या गेल्या. येथील शिलालेखात लिहिल्या प्रमाणे या सर्व लेणीं त्रिरश्मी डोंगरात येथील सातवाहन आणि क्षत्रप राजांनी बौद्ध भिक्खूंना दान दिल्या आहेत. भारतातील सर्वात मोठ्या लांबीचा (४० फूट) शिलालेख येथे आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण या लेणींना ‘पंडु लेणीं’ असे म्हणते.

वरील काही उदाहरणांवरून स्पष्ट आहे कि सर्व बुद्ध लेणींना “पांडव” असे नामकरण करून, त्यावर अतिक्रमण करून या लेणीं बौद्ध संस्कृतीच्या नाहीत हे दाखविण्याचा प्रयत्न गेली १००-२०० वर्षात करण्यात आला आहे. या भागातील सर्व इतिहास अभ्यासक, पुरातत्त्वशास्त्रज्ञ, लेणीं अभ्यासक, लेणीं संशोधक किंवा त्यावर PhD करणारे, वारसा सहल काढणारे या सर्व मंडळींना या लेणींचे मूळ स्वरूप माहीत असताना देखील या लेणींना आजही “पांडव लेणीं” जेव्हा म्हणतात तेव्हा आश्चर्य वाटते. खरं तर त्यांच्या ज्ञानाची कीव करावीशी वाटते. इतिहासकाराने किंवा अभ्यासकाने इतिहासाचा धांडोळा घेऊन जे सत्य आहे ते मांडावे असा संकेत आहे. मग ते लोकांना पटो अथवा न पटो, त्याने ते वारंवार सांगितले पाहिजे तरच तो इतिहासाची प्रामाणिक आहे असे म्हणता येईल.

आणि समजा पांडवांचे अस्तित्व मान्य केलं आणि या सर्व लेणीं पांडवांनी कोरल्या असे मानले तर मग पांडवांनी त्यांना श्रद्धास्थानी असलेल्या गुरुची अथवा त्यांच्या आदर्शाची मूर्ती न कोरता, भ. बुद्धांच्या, बोधिसत्वांच्या किंवा बौद्ध संस्कृतीत आढळणारे स्तूप आणि इतर शिल्प का बरे कोरले? म्हणजेच पांडव बौद्ध होते का?

– अतुल भोसेकर, नाशिक (लेखक – ज्येष्ठ बौद्ध लेणी संशोधक आणि अभ्यासक)