डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई येथे देशभरातून लाखोंचा जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी जमतो. दरवर्षी हार-फुलं-मेणबत्त्या अर्पण केल्या जात असत. ते निर्माल्य दुसऱ्या दिवशी वाया जाऊन अस्वच्छतेचे कारण बनत होते. तसेच टाकाऊ असल्याने ते कसल्याही पुनर्वापरासाठी अयोग्य आहे. मुळात ज्या महामानवाने व्यक्तीपूजा अमान्य ठरवली त्याच व्यक्तीचे दैवतीकरण होताना दिसते. म्हणूनच ‘एक वही एक पेन’ ची संकल्पना समोर आली.
‘एक वही एक पेन’ म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना हार-फुलं-मेणबत्ती-अगरबत्ती अर्पण न करता ‘एक वही आणि एक पेन’ अर्पण करायचा. ते वही-पेन तुम्ही आमच्याकडे आणून द्यायचे. जमा झालेले शैक्षणिक साहित्य आम्ही ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योति सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील दुर्गम भागातील वंचित विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये एकाच वेळी वाटप करु.
गेल्या वर्षी आपण जमा झालेल्या वही-पेन जुन्नर(पुणे), मुरबाड(ठाणे), सुरगाणा(नाशिक), चिपळूण(रत्नागिरी), गोरेगाव-कांदिवली(मुंबई), औरंगाबाद, वणी(यवतमाळ), सोलापूर, नांदेड, चंद्रपूर याठिकाणी असलेल्या वंचित विद्यार्थ्यांपर्यंत पोचवल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला पाच वही मिळतील या हिशोबाने त्याचे वाटप केले जाते. त्याचप्रमाणे प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. आपण दिलेल्या वही-पेनसाठी आपल्याला रीतसर पावती दिली जाते.
वर पाहता वही-पेन हा केवळ समाजसेवेचा किंवा श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम वाटू शकतो. परंतु, गेल्या दोन वर्षांच्या अनुभवावरुन आम्ही हे अनुभवलयं की देशात शिक्षणाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आई-वडील पाल्यांना शाळेत टाकण्याइतकेदेखील सक्षम नाहीत. मागील वर्षी पोचवलेल्या शैक्षणिक साहित्यांमुळे अनेक विद्यार्थी शाळा सोडण्यावाचून आपले शिक्षण पूर्ण करु शकले. गेल्या वर्षी गरजू विद्यार्थ्यांचा शोध घेताना अनेक शाळांनी स्वताहून आम्हाला संपर्क केला होता. परंतु, पर्याप्त साहित्य नसल्याने आम्ही मदत करु शकलो नाही. यानिमित्ताने आम्ही आवाहन करु इच्छितो की आपण यावर्षी या अभियानात स्वंयस्फूर्तपणे पुढाकार घेऊन सहभागी व्हावे आणि महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळ गतिमान करावी. हीच खरी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली असेल !
फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट (फॅम) महाराष्ट्र