लेणी

लेण्याद्रीचे मूळ नाव काय?

महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. ही नावे डोंगरांची किंवा शहराची, या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणींत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुंच्या संघाची होती. जसे कि कण्हगिरी बुद्ध लेणी म्हणजे आत्ताची कान्हेरी बुद्ध लेणी (कान्हेरी डोंगर), तिरणहू म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी (त्रिरश्मी डोंगर)किंवा जाखीणवाडी बुद्ध लेणी (जाखीणवाडी हे कऱ्हाड येथील गावाचे नाव आहे). नंतरच्या काळात म्हणजे १७व्या शतकानंतर महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले व काही लेणींचे रूपांतर मंदिरात झाले तर काही अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकले आहेत आणि त्यांना तशी “नवीन नावे” देण्यात आली आहेत.

जुन्नरमधे भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणीं समूह असून तिथे झालेले कोरीव कामाची संख्या ३२५ आहे! यात चैत्यगृह, विहार, पोढी व लेणीं आहेत. यातील प्रमुख बुद्ध लेणीं समूह म्हणजे “लेण्याद्री बुद्ध लेणीं”. येथील सर्वात मोठ्या विहारात १७व्या शतकात भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देण्यात आला (हे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी व अभ्यासकांनी लिहून ठेवले आहे व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण देखील हे मान्य करते) व या लेणींचे नामांतर “लेण्याद्री” करण्यात आले. मात्र प्राचीन काळी जेव्हा येथे बुद्ध लेणीं कोरण्यात आली तेव्हा याचे काय नाव होते?

या लेणींचे मूळ नाव “कपिचित बुद्ध लेणीं” असे होते. त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय! पालि भाषेत कपि म्हणजे वानर किंवा माकड. चित किंवा चिता म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो. म्हणजेच “जेथे वानर एकत्रित राहतात” किंवा “वानरांना आवडणारी जागा” म्हणजे कपिचित! आजही या डोंगरावर माकडांचा जथा राहत असतो. प्राचीन काळापासून येथे वानरांचा वावर असावा म्हणूनच त्याकाळी इथे लेणीं कोरणाऱ्यांनी किंवा येथे राहत असलेल्या भिक्खू संघाने या लेणीं समूहाला “कपिचित बुद्ध लेणीं” असे संबोधले होते. येथील शिलालेखात असा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर मग या लेणींना “कपिचित बुद्ध लेणीं” म्हणायला काय हरकत आहे…शेवटी लिखित इतिहास महत्त्वाचा, नाही का?

– अतुल भोसेकर, नाशिक (लेखक – ज्येष्ठ बौद्ध लेणी संशोधक आणि अभ्यासक)