इतिहास

पालि गाव आणि पालि भाषा यांचा संबंध आहे काय?

भगवान बुध्दांच्या काळात जो धर्मोपदेश झाला तो पालि भाषेतून केला गेला. जनसामान्यांची ही भाषा असल्याने बुद्धांची वचने, गाथा, उपदेश हे सर्व पालि भाषेत लिहिण्यात आले. यामुळे पालि आणि बौद्ध धम्म यांचा अतूट बंध तयार झाला. त्याच बरोबर असे ही दृष्टिपथात येते की ‘पालि’ नावाची असंख्य गावे भारतात आहेत. यास्तव शंका येते की पालिभाषा आणि ही ‘पालि’ गावे यांचा काही संबंध असेल काय?

त्रिपिटक, गाथा, टीकाग्रंथ हे सर्व पालि भाषेत लिहिल्यामुळे जिथे जिथे हे लिखाण करण्यात आले ते तेथील विहारात सुरक्षित ठेवण्यात आले असावे. त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बहुतेक पालि पडले असावे. किंवा धम्माचे पालन करणारे ग्राम यामुळे ‘पालि’ नाव रूढ झाले असावे. आता भारतातील प्रत्येक राज्यामध्ये जर शोध घेतला तर ‘पालि’ नावाची असंख्य गावे, ठिकाणे आढळतात. त्यांचा आणि बौद्ध धर्म याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात ‘पालि’ नावाची ठिकाणे आढळतात, तशीच राजस्थान, मध्यप्रदेश, ओरिसा, तामिळनाडू येथेही आढळतात. आता प्रत्येक राज्यातील ‘पालि’ नावाची गावे व त्यांचा तहसील बघू.

महाराष्ट्र- पालिचा खंडोबा, पालि सुधागड, पालि मिरारोड
बिहार- पालिगंज, पालि गाव(बनीपट्टी), पालि(गया)
गुजरात- पाली मेहसाना, सुरत पालि.
आंध्रप्रदेश- अत्तेली पालि 
उत्तराखंड – पाली तेहरीगढवाल, पाली अलमोरा,पाली पौरीगढवाल.
हरियाणा- पालि फरिदाबाद,
मध्यप्रदेश- पालि सागर, पालि टिकमगड, पालि गुणोर तहसिल 
उत्तरप्रदेश- पालि दारटी. 
पंजाब- पालिवाला जलालाबाद.
ओरिसा- पिपली पालि, जगन्नाथ पालि.
तामिळनाडू- वेल्लोर पाली, उलुंडूर पालि, चेरपाली
कर्नाटक- पालि खानापूर.
राजस्थान- पालि जिल्हा
प.बंगाल- पालि ग्राम, पालि दाद्री
हिमाचल प्रदेश- पालि (कोटखाई), पालि (पधार), पालि(कुलू)
मुंबई- पालि हिल, पालि(घोडबंदर).

वरील गावांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की काही गावे ही बौद्ध स्थळांशी निगडित आहेत. उदाहरणार्थ पिपली पालि, जगन्नाथ पालि, मेहसाणा पालि इ. तसेच काही गावांजवळ असलेल्या टेकड्या किंवा उंच भूभाग हा स्तुप किंवा विहार तेथे एकेकाळी असावा याची साक्ष देतात. दुसरी गोष्ट म्हणजे भारतात सर्व मुख्य विद्यापीठात पालि भाषेचे वर्ग चालतात. याचा अर्थ नुसता महाराष्ट्र नाही तर सगळीकडे पालि भाषेचे अध्ययन होत आहे. तरी ‘पालि’ भाषा आणि ‘पालि’ नावांची गावें याच्या सबंधावर कोणी प्रकाश पाडेल काय ?

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)