ब्लॉग

बुद्धप्रतिमा अयोग्य असल्यास काय करावे?

दररोजच्या कामकाजात, व्यवहारात असंख्य छोट्यामोठ्या वस्तू आपण हाताळत असतो. अनेक नवनवीन उत्पादने बाजारात येत असतात. यातील काही उत्पादनावर बुद्धप्रतिमा दिसून येतात. या बुद्धप्रतिमा जरी आकर्षक असल्या तरी त्या उत्पादनावर छापणे निश्चितच गैर आहे. काही वेळेला उच्च कलाकृती, सुशोभीकरण किंवा जाहिरातीच्या नावाखाली अशा बुद्ध प्रतिमांचा वापर केल्याचे दिसून येते.

भारतात बौद्ध समाज जागृत असल्यामुळे अशा बुद्धप्रतिमेचा वापर उत्पादक आपल्या प्रॉडक्टवर करीत नाही. अन्यथा हा समाज खवळून उठतो याची उत्पादकास चांगली जाणीव आहे. मात्र युरोपीयन देशात काही वेळेस बुद्धप्रतिमेचा वापर काही उत्पादनावर केल्याचे दिसून येते. तसेच कलेच्या नावाखाली बुद्धप्रतिमा घरात किंवा कार्यालयात रंगविल्या जातात. किंवा त्यांची शिल्पे तयार करून भिंतीला लावली जातात ते सुद्धा गैर आहे. बुद्ध प्रतिमा या बुद्धीचे, शांततेचे, दुःखमुक्तीचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत. तरी अयोग्य अशा बुद्धप्रतिमा दिसल्यास काय करावे याचे बौद्ध संस्थांनी नियम घालून दिले आहेत. थायलंडच्या बौद्ध संस्थेचे नियम हे सर्वमान्य झालेले आहेत व ते खालील प्रमाणे आहेत.

१) कला प्रदर्शनात कलेच्या, सुशोभीकरणाच्या, जाहिरातीच्या किंवा व्यापाराच्या नावाखाली अयोग्य अशा बुद्ध प्रतिमेचा वापर केलेला आढळल्यास संबंधित प्रदर्शन किंवा कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याकडे निषेध नोंदवून सदर प्रतिमा ताबडतोब काढून टाकण्यास सांगावे व बुद्ध प्रतिमेचे अवमुल्यन केल्याबद्दल पत्र लिहून समज द्यावी. किंवा तक्रार दाखल करावी.

२) अयोग्य बुद्धप्रतिमा असलेली उत्पादने खरेदी करू नयेत. तसेच कोणास भेटही देऊ नयेत किंवा त्याचा फोटो कुठे शेअर करू नये. ( उदा. बुद्धप्रतिमा पेन स्टँड, बुद्ध प्रतिमेची खुर्ची – फुलदाणी- फोटोफ्रेम – झाडे लावण्याच्या बुद्ध प्रतिमेच्या कुंड्या इत्यादी.)

बुद्धप्रतिमा असलेल्या अशा वस्तू खरेदी करू नयेत, बुद्ध प्रतिमेच्या असलेल्या अशा सिरॅमिक कुंड्या वापरू नयेत, बुद्ध प्रतिमा असलेली टी शर्ट वापरू नयेत.

३) अनेक शैक्षणिक वस्तू बाजारात येत असतात. बुद्धीचे प्रतीक म्हणून अनेकदा त्यात बुद्ध प्रतिमेचा वापर केलेला आढळतो. असे दिसल्यास कंपनीस पत्र लिहून तक्रार करावी व सदर वस्तूच्या विक्रीवर बंदी घालावी.

४) एखाद्या उत्पादनामध्ये सुरेख बुद्ध मूर्तीचा वापर केला असेल तर त्यातील बुद्धमूर्ती काढून वेगळी करावी व मूर्तीस वंदन करण्यासाठी ती दर्शनीय भागात ठेवावी.

५) घरात किंवा कार्यालयात भिंतीवर बुद्ध प्रतिमांचे मोठे शिल्प लावणे किंवा उभारणे हे देखील निषिद्ध आहे, हे ध्यानात ठेवावे. कारण अशा ठिकाणी बुद्ध प्रतिमेचा आदर कायमस्वरूपी राखला जात नाही. बुद्धमूर्ती ही दररोज वंदन केली जाईल अशा जागीच दर्शनीय भागात ठेवावी.

६) हल्ली नुसता बौद्ध समाज नव्हे तर इतर समाज देखील बुद्धमूर्ती आपल्या दिवाणखान्यात, घरामध्ये ठेवू लागला आहे. बुद्धमूर्ती ही घरांमध्ये आणि कार्यालयात अलौकिक शांतता प्रदान करणारी आहे. तिच्या नुसत्या अस्तित्वाने घरात आणि कार्यालयात आनंदमयी ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तिचे स्थान योग्य असावे. कोपऱ्यात किंवा अडगळीचे नसावे.

७) काही बुद्ध कलाकृतीत बुद्धांचा चेहरा हा अर्धवट चित्रीत केलेला असतो हे निश्चितच निषिद्ध आहे, हे ध्यानात ठेवावे. अशा मूर्ती किंवा कलाकृती घरात लावू नयेत. हल्ली सिरॅमिकच्या छोट्या बुद्धमूर्ती मार्केटमध्ये दिसून येतात. परंतु त्या पूर्णाकृती नसल्यास अयोग्य समजाव्यात. तसेच नुसतेच शीर किंवा हात असल्यास त्या विकत घेऊ नयेत.

८) बार आणि रेस्टॉरंटमध्ये बुद्धप्रतिमा ठेवू नयेत. तसेच त्यांचा सुशोभीकरणासाठी वापर करू नये. बुद्ध हे जगातील ५०० मिलियन बौद्धांचे श्रद्धास्थान आहे. अन्य धर्मातील श्रद्धास्थानाप्रमाणे त्यांचा ही आदर केला पाहिजे.

९) शरीर हे सतत मलिन होणारे असते व ते नाशवंत आहे. त्यामुळे बुद्धप्रतिमा टॅटू म्हणून शरीरावर गोंदवू नये. हे निषिद्धच आहे. तसेच बुद्धप्रतिमा असलेल्या वस्त्रांचा पेहेराव करू नये.

१०) बुद्धमूर्तीस क्षती पोहोचली असल्यास सदर मूर्तीचे तलावात, नदीत किंवा सागरात विसर्जन करावे. परंतु क्षतिग्रस्त मूर्ती घरात, विहारात किंवा कार्यालयात ठेवू नयेत असा अलिखित नियम आहे. त्याजागी लगेच दुसऱ्या बुद्धमूर्तीची स्थापना करावी.

थायलँड मधील ध्यान साधनेच्या आचार्या अचरावादी वोगंसकोन यांनी अयोग्य बुद्धमूर्ती प्रतिमेच्या संदर्भात आवाज उठविला असून त्याबाबतीत नियमावली घालून दिलेली आहे. सर्व बौद्धराष्ट्रांनी ती मान्य केली आहे. त्यामुळे बुद्धप्रतिमेचा आणि चिन्हांचा कोणी अवमान केल्यास तो दंडनीय अपराध तेथे समजला जातो. थोडक्यात तुम्ही कोणत्याही धर्माचे असा पण बुद्धप्रतिमेचा आदर हा राखलाच पाहिजे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *