बुद्ध तत्वज्ञान

तथागत बुद्धांचा आपल्यासाठी अखेरचा संदेश काय होता?

सर्व संस्कार अनित्य आहेत , एवढे वस्तुस्थितिनिदर्शक विधान कोरडेपणाने, रूक्षपणाने वा अलिप्तपणाने भिक्खूपुढे ठेवून त्यांनी आपले श्वास थांबविले नाहीत. त्यांनी अखेरच्या श्वासांपूर्वी आणखी एक छोटेसे वचन उच्चारले. हे छोटेसे वचन केवळ तेथे उपस्थित असलेल्या भिक्खूसाठीच होते, असे नाही. ते वचन तथागतांच्या नंतर शेकडो वर्षांनी, असंख्य पिढ्या गेल्यानंतर आलेल्या तुम्हा – आम्हांलाही एका प्रसन्न प्रकाशाने उजळवून टाकणारे, जगण्याची सुंदर वाट दाखविणारे आहे.

थांबण्यासाठी, हलगर्जीपणा करण्यासाठी, चालढकल करण्यासाठी, सबबी सांगण्यासाठी आपल्याजवळ वेळ नाही. आपल्याला तसे करण्याइतकी सवड नाही. अत्यंत जागरूकपणे आणि डोळसपणे, अत्यंत सावधपणे आणि निरलसपणे वाटचालीला प्रारंभ करणे, हेच आपल्या कल्याणाचे आहे. तथागतांचे हे अखेरचे वचन आपण आपल्या काळजातही आणि मस्तकातही कोरून ठेवले पाहिजे. आपल्या मनातही, आपल्या वाणीतही आणि आपल्या कृतीतही त्याचे प्रेरक अस्तित्व जाणवले पाहिजे.

त्यांच्या शरीरावर काही खास लक्षणे होती, असे ज्याप्रमाणे सांगितले जाते, त्याप्रमाणेच त्यांच्या वाणीचीही काही खास लक्षणे सांगितली जातात. ते एका ठिकाणी उपदेश करीत असले, तरी विश्वातील सर्व ठिकाणचे लोक त्यांची वाणी ऐकू शकतात आणि ते एका काळात बोलत असले तरी सर्व काळांतील लोक त्यांचे बोलणे ऐकू शकतात, हे त्यांच्या वाणीचे एक विशेष लक्षण म्हणून सांगितले जाते. या विधानातील काव्यात्मक अतिशयोक्ती बाजूला ठेवून त्याचा व्यंग्यार्थ ध्यानी घेतला, तर त्यांच्या सर्व उपदेशाला हे विधान लागू पडते आणि त्यांच्या अखेरच्या उपदेशातील वचनाला तर ते विशेष करून लागू पडते, असे म्हणता येते.

त्यांचे हे वचन स्थलकालातीत आहे, सर्व स्थानांतील आणि कालांतील लोकांना कल्याणाचा मार्ग दाखविणारे आहे, यात शंका नाही. जणू काही ते आत्ता आणि येथे आपल्यालाच उद्देशून म्हणत आहेत, “आळस न करता आपले उद्दिष्ट प्राप्त करा! “

संदर्भ – सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध (लेखक – आ.ह. साळुंखे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *