इतिहास

भग्ग, भगवा आणि भगवान या शब्दाची उत्पत्ती नेमकी कधी आणि केव्हा झाली?

“भगवान” हा शब्द भारतीय संस्कृतीत एक प्रचंड रुजलेला शब्द आहे. देव, सर्वशक्तिशाली, परमेश्वर, दाता, परमात्मा….ही या भगवान शब्दाची काही पर्यायवाची नावे आहेत. मात्र या अर्थाने हा शब्द खूप नंतरच्या काळात वापरलेला दिसतो. वेद किंवा उपनिषद मध्ये देखील हा शब्द येत नाही. नंतरच्या काही वैदिक साहित्यात हा शब्द आढळतो. भक्ती संप्रदायात अनेक ‘देवांना’ हा शब्द किंवा उपाधी लावण्यात आली आहे. मात्र या शब्दाची उत्पत्ती नेमकी कधी आणि केव्हा झाली?

भगवा अथवा भगवान हा शब्द सर्वात पहिल्यांदा आपल्याला पालि त्रिपिटकात वाचायला मिळतो. बुद्धांचा उल्लेख करताना त्यांना “बुद्ध” या नावाने उल्लेख करण्याऐवजी “भगवा” हा शब्द अनेक वेळा आदरार्थ्याने उच्चरलेला दिसतो. उदा. एकं समयं भगवा वाराणसीयं विहरती…भगवा हा शब्द मूळ “भग्ग” या शब्दापासून तयार झाला आहे. भग्ग या शब्दाचा संस्कृत मध्ये “भंज” हा पर्यायवाची आहे. पालि भाषेत या शब्दाची फोड अशी होते – भग + वान. भग म्हणजे नष्ट किंवा विध्वंस आणि वान म्हणजे आपल्या मनातील षड्रिपू अथवा वासना. म्हणजेच “भगवान” या शब्दाचा अर्थ “ज्याने आपल्या मनातील सर्व विकार / वासना नष्ट केले आहेत अशी व्यक्ती. याचे अनेक संदर्भ आपल्याला पालि त्रिपिटकात दिसून येतात. “भग्ग रागो, भग्ग दोसो किंवा सब्बा ते फासुका भग्गा किंवा भग्गा पाप्पका धम्मा…

भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात खऱ्या अर्थाने केवळ दोनच भगवान झाले आहेत – भगवान बुद्ध आणि भगवान महावीर. (इतर “भगवानांनी” त्यांच्या मनातील षड्रिपू नष्ट केले कि नाही हे माहीत नाही किंवा सध्यातरी तसा पुरावा उपलब्ध नाही.)

भ. बुद्धांच्या काळी भिक्खूंना केवळ लोकांनी टाकून दिलेले वस्त्र घालण्याची प्रथा होती. म्हणजे प्रेतावरील वस्त्र किंवा उपयोगात नाही म्हणून टाकून दिलेले वस्त्र. अशी वस्त्रे गोळा करून त्यांचा अनावश्यक भाग कापून टाकला जाई, नंतर ती वस्त्र स्वछ धुवून त्यांना अनेक विरक्त रंगांनी रंगविले जाई. एकदा भात शेती पाहताना व त्यातील आखीव रेखीव पीक व शेतांमधील पायवाट पाहून, भ. बुद्धांनी, भन्ते आनंदाला अशा प्रकारचे ‘चीवर’ बनवायला सांगितले. याच कापडाला एक विशिष्ट रंग देण्यात आला जो त्याग, परिश्रम व विरक्तीचे प्रतीक होता. हा रंग मनातील वासनांना नष्ट करणाऱ्या शौर्याचा प्रतीक बनला. हाच रंग “भगवा” म्हणून अस्तित्वात आला. मनातील शत्रूंना पराभव करणाऱ्याचा जसा तो रंग होता तसाच तो बाह्य जगातील शत्रूंना नेस्तनाबूत करणाऱ्यांचा देखील विजयी रंग ठरला.

आपल्या तिरंगातील रंगांबद्दल अनेक विचारवंतांनी गौरवोद्गार काढले आहेत. या बद्दल सांगताना तत्कालीन उपराष्ट्रपती सर्वेपल्ली राधाकृष्णन म्हणतात ” Saffron किंवा भगवा हा त्यागाचे प्रतीक आहे. सर्व राज्यकर्त्यांनी त्याग वृत्ती ठेवली तरच राष्ट्राची प्रगती होऊ शकेल” Ref – Constituent Assembly Debates

भग्ग, भगवा आणि भगवान हे बौद्ध संस्कृतीची देन आहे.

– अतुल भोसेकर

One Reply to “भग्ग, भगवा आणि भगवान या शब्दाची उत्पत्ती नेमकी कधी आणि केव्हा झाली?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *