श्रीलंकेतील बुद्ध धम्माला २२०० वर्षे जुना इतिहास आहे. बुद्ध धम्म श्रीलंकेत येण्यापूर्वी तेथे महावंसात लिहिल्याप्रमाणे अनेक जैमुनी श्रीलंकेत गेले होते. मात्र श्रीलंकेत कोणताही धर्म नसल्याने तेथील वन्य जमातीतील लोक यक्ष यक्षिणी आणि झाडांची पूजा करत असत. श्रीलंकेत बुद्ध धम्म अनेकदा नामशेष होण्याची पाळी आली असताना मोठ्या जिद्दीने धम्म टिकवून ठेवला आहे.
श्रीलंकेत बुद्ध धम्माचा प्रवेश इसवीसन पूर्वी २५० व्या वर्षी झाला होता. तेंव्हापासून आजपर्यंत बुद्ध धम्म हा राष्ट्रीय धर्म म्हणून अस्तित्वात आहे. प्राचीन काळापासून भारताचा आणि श्रीलंकेचा जवळचा संबंध होता.
ताम्रपर्णीचे ‘सिंहल द्वीप’ ?
१९७२ साली सरकारने ‘सिलोन’ नावाचे नामांतर करून ‘श्रीलंका’ केले. मात्र श्रीलंका देशाच्या नावाबाबत मोठा इतिहास आहे. सम्राट अशोकच्या शिलालेखात आणि जुन्या पाली वांग्मयात श्रीलंकेचे नाव ‘ताम्रपर्णी’ असेच आहे. इसवीसन ६२९ ते ६४५ या काळामध्ये चिनी बौद्ध भिक्खू ह्वेन त्सांग यांनी भारत आणि श्रीलंकामध्ये केलेल्या प्रवास वर्णनात श्रीलंकेला ‘सिंहल’ देश म्हटले आहे.
दक्षिण गुजरात आणि उत्तर पश्चिम महाराष्ट्र मिळून तयार झालेल्या ‘लाट’ देशाचा राजकुमार विजयसिंह नावाच्या राजकुमाराने ‘ताम्रपर्णी’ बेट जिंकून घेतले होते. त्या राजाच्या नावातील ‘सिंह’ नावावरून ‘ताम्रपर्णी’ बेटाचे नाव ‘सिंहल द्वीप’ / ‘सिंहल’ असे म्हणण्यात येऊ लागले. त्यामुळे या बेटावरील लोकांना सिंहल लोक तसेच भाषेला सिंहल भाषा म्हणत असत. त्यानंतर सिंहलचा अपभ्रंश करून इंग्रजांनी ‘सिलोन’ असे केले.