लेणी

कान्हेरी लेण्यांत सापडलेले ताम्रपट गेले कुठे?

डॉ. जेम्स बर्ड हे ब्रिटीश जमान्यात बॉम्बे एशियाटिक सोसायटीचे सन १८४७ पर्यंत उपाध्यक्ष व सचिव होते. व्यवसायाने ते डॉक्टर होते व १८१६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीत असिस्टंट सर्जन म्हणून लागले. डॉक्टर असून त्यांना भारताच्या पुरातन बौद्ध संस्कृतीत खूप रस होता. त्यावेळी भारतात असंख्य बौद्धस्थळे उजेडात येत होती. यात लेण्या होत्या, स्तुप होते, अशोक स्तंभ होते, विहारांचे अवशेष होते, मंदिरे होती, शिलालेख होते. भारताची ही प्राचीन बौद्ध संस्कृती पाहून ब्रिटिश अवाक झाले होते.

सिलोन, थायलंड, चीन पासून तिबेट, कोरिया जपान पर्यंत पसरलेला बुद्धिझम पाहून त्यावेळच्या मुंबई प्रांतातील न्यायालयाने रॉयल एशियाटिक सोसायटीस आदेश दिले की, भारतातील या प्राचीन बौद्ध संस्कृतीची पुरातन स्थळे, कलाकुसर, शिलालेख यांचे जतन करणेबाबत तात्काळ कार्यवाही करावी. डॉ. जेम्स बर्ड यांना त्यात रस असल्याने त्यांनी तात्काळ पावले उचलली आणि अजिंठा लेण्यांना सन १८२८ मध्ये भेट देऊन काही चित्रांच्या लिथोग्राफिक प्लेट तयार केल्या. तसेच कान्हेरी, औरंगाबाद, कार्ला, महाड, जुन्नर, बदामी व नासिक येथील लेण्यांना भेट देऊन तेथील शिल्पे, शिलालेख यांच्याही शिलामुद्रण प्लेट तयार केल्या. यामध्ये कान्हेरी आणि नासिक लेण्यांच्या ५३ शिलामुद्रण प्लेट्स होत्या. तसेच तेथील शिलालेखांचा अनुवाद सन १८४४ मध्ये प्रसिद्ध केला.

जेंव्हा मुंबई जवळील कान्हेरी लेण्यांना सन १८३९च्या मे महिन्यात भेट देण्याचे ठरविले, तेव्हा ते आवश्यक साहित्य व मजूर घेऊन निघाले. वाटेत जोगेश्वरी, विहार व तुळशी या खेड्यांना भेटी देऊन, मुक्काम करीत प्रवास केला. मग बोरिवलीच्या घनदाट जंगलातून घोड्यावरून वाट काढीत कान्हेरी लेण्यांच्या दक्षिण दिशेस पोहोचले. पाहणी करण्यासाठी त्यांनी एका मोठ्या स्तुपाची निवड केली. कारण इतर बऱ्याच लेण्यात माती, दगड यांचे ढीग साचले होते. वटवाघळे फिरत होती. श्वापदे होती. तो स्तुप खणल्यावर एक वर्तुळाकार पोकळ दगड सापडला. तो जिप्समच्या तुकड्यांनी झाकला होता. आतमध्ये दोन लहान कलश मिळाले. एकात रक्षा, लाल रुबी, एक मोती, सोन्याचे तुकडे आणि लहान सोन्याची पेटी मिळाली. व दुसऱ्या कलशात चांदीची पेटी आणि रक्षा मिळाली. तसेच तेथे ब्राम्ही लिपीतील दोन ताम्रपट मिळाले. त्याच्यावर बौद्ध तत्त्वज्ञानाच्या काही ओळी होत्या.नंतर तेथील मुक्कामात लेण्यांची पाहणी केली. शिलालेखांची रेखाटने काढली. नंतर निर्वाणभूमी बघून डॉ. जेम्स बर्ड परत फिरले.

त्यानंतर जेम्स बर्ड यांनी अभ्यास करून ‘Historical Researches on the origin and principles of the Buddha and Jaina Religions’ नावाचे पुस्तक सन १८४७ मध्ये प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी कान्हेरी लेण्यांमधील केलेल्या उत्खननाची सुंदर कहाणी दिली आहे. डॉ. जेम्स बर्ड यांचे देहावसान सन १८६९ साली लंडनमध्ये झाले. पण कान्हेरी लेण्यांत सापडलेले दोन कलश, त्यातील वस्तू व रक्षा आणि ते ताम्रपट यांचे काय झाले हे आजतागायत कुणालाही माहिती नाही. डॉ. जेम्स बर्ड यांचे पुस्तक वाचून कुणाला काही दुवा मिळाल्यास जरूर शेयर करावा.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)