लेणी

लेण्या खोदताना निघालेला दगडांचा ढीग गेला कुठे?

महाराष्ट्र हा दगडधोंड्याचा देश आहे. अशा या दगडधोंड्यांच्या देशात असंख्य लेण्या आहेत. सह्याद्रीच्या कुशीत आणि अनेक डोंगर कपारीत अनेक लेणी खोदण्यात आलेली आहेत. या लेण्याचे खोदकाम जेव्हा दीड-दोन हजार वर्षांपूर्वी झाले असेल त्यावेळी खोदकाम करताना निघालेल्या दगडांच्या चीपा किंवा तुकडे यांचा ढीग काढून लेण्यांच्या जवळपास कुठेतरी टाकला गेला असेल. परंतु सद्यस्थितीत लेण्यांच्या परिसरात फिरावयास गेले गेले असता हा दगडांचा ढीग कुठे असल्याचे दिसत नाही. कदाचित गेल्या दीड-दोन हजार वर्षात त्यावर माती वगैरे साठून त्याच्यावर झाडी झुडुपांची वाढ होऊन त्याची टेकडी होऊन गेली असेल.

लेण्या जेव्हा खोदल्या गेल्या असतील तेंव्हा त्याच्या आसपास कारागिरांची सुद्धा वस्ती असेल. याचाही कुठे पुरावा सापडत नाही. सर्व लेण्यांबाबत हीच परिस्थिती आहे. विशेषतः कान्हेरी लेण्यांच्या आसपास खोदताना निघालेल्या दगडांच्या तुकड्यांचा ढिग नक्कीच तिथे कुठेतरी असेल. खाली दरीमध्ये तो टाकला असेल तर पावसाच्या पाण्याने तो वाहून गेला असेल काय? वाहून गेला असेल तर खाली दरीतील गाळात नाहीसा झाला असेल काय? बहुतेक ठिकाणी तो खाली दरीत फेकल्याने विखुरला गेला असेल. तो ढिग जर शोधला गेला तर त्या काळाची हत्यारे, भांडी, शिल्पं इत्यादी असंख्य गोष्टी उजेडात येतील असे वाटते.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)