इतिहास

भगवान बुद्धांचे भिक्षापात्र कुठे आहे?

भगवान बुद्धांच्या भिक्षापात्राचा प्रथम उल्लेख बौद्ध साहित्यात केसरीया स्तूपाच्या इथे झालेला आढळतो. या बाबतची माहीती अशी की जीवनाच्या शेवटच्या कालखंडात भगवान बुद्ध वैशाली वरून कुशीनगरला जात होते, तेव्हा केसपूत्ता नगराजवळ वैशालीचे लिच्छवी रहिवासी दर्शनार्थ आले. बुद्धांबद्दल अतिव आदर असल्याने स्नेहापोटी त्यांनी त्यांना तिथे राहण्याबाबत आग्रह केला. पण बुद्धांनी पुढचा अंतिम प्रवास जाणून त्यांची विनंती मान्य केली नाही. पण त्यांच्या प्रेमास्तव त्यांनी लिच्छवींना आपले भिक्षापात्र दिले. भगवान बुद्ध कुशीनारा येथे निघून गेल्यावर लिच्छवींनी त्या भिक्षापात्रावर मातीचा स्तुप बांधला. पुढे तीनशे वर्षांनीं या पवित्र जागेवरील भिक्षापात्रावर अशोक राजाच्या काळात येथे मोठा विटांचा स्तूप बांधण्यात आला. मात्र दोन हजार वर्षांनी ब्रिटिशांच्या काळात स्तुप खणल्यावर ते भिक्षापात्र तिथून दुसरीकडे नेले की काय याबाबत काही माहिती मिळत नाही.

त्यानंतर २ ऱ्या शतकात सम्राट कनिष्क राजाने उभारलेल्या विहारात (पेशावर-पाकिस्तान) भिक्षापात्र असल्याच्या नोंदी आढळतात. मात्र पुढे स्तुप आणि विहार नष्ट झाल्यावर त्याचे काय झाले हे अज्ञात आहे. पुढे सन १८८० मध्ये नालासोपारा येथील स्तूपात भिक्षापात्र सापडल्याचे इतिहासात नमूद केले आहे. परंतु गुजराती अभ्यासक भगवानलाल इंद्रजी यांना सापडलेले ते भिक्षापात्र पूर्ण आकारात नसून त्याचे तुकडे आहेत. आणि ते भिक्षापात्राचे असावेत असे समजून सद्यस्थितीत ते मुंबईच्या एशियाटिक सोसायटीच्या ताब्यात आहेत. परंतु ते जनतेच्या दर्शनासाठी कधी खुले केल्याचे दिसून आलेले नाही. त्यानंतर भिक्षापात्र अफगाणिस्तानात असल्याचा उल्लेख आढळतो. परंतु त्याची खातरजमा करण्यासाठी ASI ची टीम तेथे २०१३ मध्ये जाऊन आली. परंतु ते भिक्षापात्र नसून पाटीच्या आकाराचे मोठे दगडी पात्र असल्याचे आढळून आले.

आणखीन एक मोठा समज आहे कि भगवान बुद्धांचे भिक्षापात्र ब्रिटिशांच्या काळात लंडनला घेऊन गेल्यामुळे ते लंडन म्युझियममध्ये आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी लंडन पिस पॅगोडा येथील जपानी बौद्ध भिक्खू रेव्ह. जी नागसे यांनी दिनांक २१ ऑक्टोबर १९९५ रोजी संचालक, ब्रिटिश म्युझियम, ग्रेट रुसेल स्ट्रीट, लंडन यांना पत्र लिहिले. त्यातील सारांश खालील प्रमाणे आहे.

The Sopara Pagoda was originally founded by King Ashoka and contained many relics and treasures, including the begging bowl. The former where left to the Asian Association in Bombay, but Buddha’s begging bowl was apparently brought back to London. I realise how many thousand of exhibits you have, but I should be very grateful if you could look into this matter for me and let me know your findings. If you do manage to locate the bowl, I should very much appreciate being able to arrange to visit to see it.

सदर पत्रास अनुसरून संचालक, ब्रिटिश म्युझियम यांनी भन्तेजी नागसे यांना आठ डिसेंबर १९९५च्या पत्राद्वारे खालील उत्तर दिले.

I have looked through various records and spoken with various members of the department, but have been unsuccessful in locating the Buddha’s begging bowl.

त्यांनी स्पष्ट सांगितले की ‘आमच्या कडे असलेल्या सर्व अफाट बौद्ध पुरातन अवशेषांमध्ये बुद्धांचे भिक्षापात्र कुठेही आढळत नाही. गांधार कला संस्कृतीचे अनेक पुरातन अवशेष येथे आहेत. कदाचित सर जोसेफ हॉटंग गॅलरीत चौकशी करावी. कारण तेथे कनिष्क स्तुपातील सापडलेले अवशेष आहेत. परंतु तुमची इच्छा असल्यास तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष स्टुडंट रूममध्ये बसून बौद्ध कालीन पुरातन अवशेषांची पाहणी करू शकता व अभ्यास करू शकता’.

सदर दोन्ही पत्रांच्या प्रती मला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ब्रिटिश म्युझियममध्ये सुद्धा भिक्षापात्र नसल्याचे सिद्ध झाले आहे. आता कुठे खाजगी संग्रहालयात जर ते भिक्षापात्र असेल तर त्याची कुणालाच माहिती नसणार. आणि मुळात ते भगवान बुद्धांचे असेल याची खात्री काय ? असो, जगात सर्वत्र पसरलेल्या भगवान बुद्धांच्या धातूंना व त्यांच्या करकमलाने स्पर्शीत झालेल्या सर्व मौल्यवान वस्तुंना मी त्रिवार नमन करतो. त्या कुठेही असोत, पण सुरक्षित राहोत. त्यांच्या मधून निघणारी ऊर्जा, कंपने अखिल जगताचे कल्याण करोत.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक- ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)