रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळची कोंडाणे लेणी अती प्राचीन असून भंग झालेला त्याचा बराचसा भाग पाहून देखील एकेकाळी ही लेणी भव्य, रेखीव व कलाकुसरीने नटलेली असावीत हे ध्यानी येते. थेरवादी परंपरेच्या या लेण्या राजमाची किल्ल्याच्या उत्तर कडयाच्या खाली येतात. लेण्यांचा हा परिसर पावसाळ्यात अलौकिक सौंदर्याने नटलेला दिसतो.
हिरवीगार वृक्षवल्ली, जागोजागी वाहणारे ओहोळ व मध्येच फेसाळत वाहणारे ओढे यांचे दर्शन पावसाळ्यात नेहमी होते. कोंडाणे समूहात एक चैत्य व ७ विहार आहेत. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात ती खोदली गेली आहेत. दर्शनी भागात टिकून राहिलेली चैत्याची कलाकुसर श्रेष्ठ दर्जाची असून पिंपळ पानाच्या आकाराची आहे. या चैत्याच्या उत्तर बाजूकडील विहारांसमोर पावसाळ्यात मोठा पाण्याचा लोट कोसळत असतो. या डोंगरात ठिकठिकाणी असलेले धबधबे कोसळताना पाहून नयनरम्य दृश्य पाहिल्याचा आनंद मिळतो. त्यात कोंडाण्याच्या या आखीवरेखीव पण क्षती पोहोचलेल्या लेण्या पाहताना मन संमिश्र भावनांनी भरून जाते.
इतका सुंदर चैत्याचा दर्शनी भाग असलेले लेणे पूर्ण अवस्थेत असतेतर भारतातील उत्कृष्ट लेण्यांमध्ये त्याची गणना झाली असती. असे काय झाले असेल की या लेण्यातील चैत्याचा खालील दर्शनी भाग तुटून गेला असेल. येथे पूर्वी लढाई झाल्याची सुद्धा नोंद नाही. त्यामुळे तोफांच्या माऱ्यात लेण्यांचा खालील दर्शनी भाग तुटण्याची शक्यता कमी वाटते. ऊन-पाऊस यांच्या माऱ्याने देखील खडकांना भेगा पडतात. पण तसे कोंडाणे येथे झाले असेल असे वाटत नाही. एकेकाळी तुटून खाली गडगडत गेलेले भाग आज जमिनीत गाडले गेलेले आहेत. वेदीकापट्टीची कलाकुसर केलेले चैत्याच्या पाषाणाचे भाग आजही तेथील जमिनीत घुसलेले दृष्टीस पडतात. लेण्यांचा दर्शनी भाग कोणत्या काळात तुटून पडला याबाबत काहीच माहिती ज्ञात होत नाही.

याबाबत संशोधन केले असता आश्चर्यकारक माहिती प्राप्त झाली. आपल्या महाराष्ट्राला भूकंपाची परंपरा आहे. आजच्या पिढीला फक्त १९६७ सालचा कोयनेचा भूकंप व १९९३ सालचा लातूरचा भूकंप माहित आहे. त्या अगोदरच्या भूकंपाच्या नोंदी अठराव्या शतकापासून नियमित घेतलेल्या आढळतात. पण अठराव्या शतकापूर्वी झालेल्या भूकंपाच्या काही थोड्याच ठराविक नोंदी उपलब्ध आहेत. प्राप्त झालेल्या भूकंपाच्या डेटानुसार खालील प्रमाणे भूकंपाच्या नोंदी आढळतात.
१) इ.स.१५२४ मध्ये दाभोळला सुनामी आली होती.
२) इ.स.१५९४ मध्ये माथेरान परिसरात भूकंप झाला होता.
३) त्यानंतर २६ मे १६१८ मध्ये मुंबई इलाख्यात प्रचंड मोठा भूकंप झाल्याची नोंद आहे. मुंबई किल्ला ते पुणे पर्यंतचा भाग या भूकंपाने हादरला होता. दोन हजार माणसे दगावली होती. याचा अर्थ त्या भूकंपाची तीव्रता खूपच होती. सह्याद्री पर्वत रांगेतील अनेक भूभाग वरखाली झाले असावेत. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या. या भूकंपात कोंडाणे लेण्यांचा खालील दर्शनी भाग तुटून खाली पडला असावा अशी शक्यता वाटते.
४) इ.स.१६७८ मध्ये माथेरान-कर्जत भागात मोठा भूकंप झाला होता. त्यावेळी सुद्धा लेण्यांची, डोंगरकड्यांची पडझड झाली असावी.
५) पुढे ९ डिसेंबर १७५१ मध्ये पुन्हा वांगणी-माथेरान भागात भूकंप झाल्याची नोंद आहे. त्यावेळी देखील लेण्यांची व किल्ल्यावर बांधलेल्या अनेक बुरुजांची हानी झाली असावी.
६) पुन्हा ५ जानेवारी १७५२ मध्ये बदलापूर- नेरळ भागात भूकंपाचा हादरा बसला.
७) एक महिन्यांनी म्हणजे ५ फेब्रुवारी १७५२ मध्ये परत लोहगड-लोणावळा परिसरात मोठा भूकंप झाल्याची नोंद आहे.
त्यामुळे हे क्षेत्र भूकंपप्रवण क्षेत्र आहे असे दिसून येते. व भूमंडळ अनेकदा येथे डळमळले होते हे कळते. इ.स.१६१८ मधील भूकंपाने निर्माण झालेली चिपळूण भेग ही मुंबई बेट पासून संगमेश्वर पर्यंत आहे. पश्चिम किनारपट्टी भेग ही ठाणे खाडी ते पारसिक हिल (बेलापूर-वाशी भूभाग ) पर्यंत आहे. घोड नदी भेग ही जवाहर पासून पुणे जिल्ह्यातील भिगवण पर्यंत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा हे झोन चारमध्ये मोडतात. थोडक्यात भूकंपाने अनेक लेण्यांची आणि किल्ल्यांची हानी झालेली आहे.

यास्तव १७-१८ व्या शतकात बदलापूर कर्जत, माथेरान, लोणावळा, वांगणी येथे वारंवार झालेल्या या चार भूकंपामुळे लेण्यांची व पुरातन ऐतिहासिक वास्तूंची अपरिमित हानी झाली असावी असे स्पष्ट दिसते. तसेच कोंडाणे लेण्यांचा दर्शनी भाग याच दरम्यान तुटून खाली पडला असावा यास पुष्टी मिळते. त्याचमुळे आज आपल्याला कोंडाणे लेण्यांतील चैत्य व इतर विहारांचा कलाकुसर केलेला दर्शनी भाग आढळून येत नाही. तिथला यक्ष दिसत नाही. जेव्हा कधी तेथील जागेत उत्खनन होईल आणि जमिनीत गाडले गेलेले कलाकुसर केलेले तुटलेले भाग बाहेर काढले जातील, तसेच घरंगळत गेलेले अवशेष मिळतील तेंव्हाच कोंडाणे लेण्याचे खरे सौंदर्य जगापुढे येईल.
( डेटा प्राप्त – A सेस्मिक सेंटर, पुणे )
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)