इतिहास

सम्राट अशोक राजाचा महाल कुठे आहे?

दोन हजार वर्षांपूर्वीचा भारताचा चक्रवर्ती सम्राट अशोक राजा याने असंख्य ठिकाणी शिळेवर, स्तंभावर, गुहेमधून, प्रस्तारावर कोरून ठेवलेल्या लेखांच्या रुपाने एक विश्वसनीय व चिरस्थायी इतिहास लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे सम्राट अशोकाचा अफाट राज्यविस्तार, त्याची राज्यपद्धती, त्याची धर्मपरायणता, त्याचे प्रजावात्सल्य, त्याचा अपूर्व स्वार्थत्याग आणि मनाची थोरवी दिसून येते. तसेच त्याने प्रजेमध्ये धर्मज्ञान, सदाचार आणि भूतदया इत्यादींचा प्रसार करण्यासाठी केलेल्या अलौकिक कार्याची माहिती मिळते. तशी पुराणातील कुठल्याही ही राजाची माहिती मिळत नाही हे सत्य आहे.

सम्राट अशोक हा भारत खंडाचा पहिला चक्रवर्ती राजा होता. त्याच्या साम्राज्याचा विस्तार कंबोज, कंदाहार(पाकिस्तान), अफगाणिस्तान, बलुचिस्तान पर्यंत होता. तसेच भारतातील असंख्य छोटी राज्ये त्याच्या अधिपत्याखाली होती. अनेक राजे व महाराजे अशोक राजाचे मांडलिकत्व पत्करून राहिले होते. एवढा विस्तीर्ण मुलुख पूर्वीच्या इतिहासकाळात कोणत्याही राज्याच्या ताब्यात नव्हता. म्हणूनच आजही अडीच हजार वर्षांनी केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगात त्याचे नाव दुमदुमत आहे.

याचे कारण त्याचे औदार्य, त्याचे ऐश्वर्य व त्याच्या अतुलनिय बुद्धीत आहे. अशा या सम्राट अशोकाचा दरबार, राजवाडा-महाल कुठे होता हे आजतागायत ज्ञात झालेले नाही, या बद्दल खंत वाटते. त्याचे धम्म उपदेश असलेले शिलालेख, स्तंभ आजही उन्हात-पावसात उभे आहेत. मात्र भारत भूमीच्या या सम्राटाचा राजवाडा ब्रिटिशांना देखील सापडला नाही.

अशोकाची राजधानी पाटलिपुत्र (म्हणजे आताचे पाटणा शहर) होती. त्याच्याच काळात तिसरी धम्मसंगति तेथील ‘अशोकाराम’ विहारात भरली होती. याचा अर्थ त्याचे वास्तव्य तेथेच होते. सन १८९५ मध्ये पाटण्यातील बुलंदीबाग येथे ब्रिटीश अधिकारी वेंडेल यांनी उत्खनन केले. त्यानंतर दुसरी संभाव्य जागा कुम्हरार येथे अमेरिकन पुरातत्त्ववेत्ते स्पूनर यांनी १९१२-१३च्या उत्खनन केले. त्यावेळी तेथे बरेच लाकडी स्तंभ अवशेष, राख व दगड आढळून आले.

१९५१-५५ च्या दरम्यान जयस्वाल यांनीही तेथे उत्खनन केले, तेव्हा तिथे एका भव्य दरबाराचे अवशेष असल्याचे लक्षात आले. तेथे ऐंशी खांब असून ते आठ रांगेमध्ये होते.यावरून त्या जागी भली मोठी लाकडी इमारत उभी असावी व ती आगीत भस्मसात झाली असावी असे लक्षात आले. पण त्यावरून ते फक्त पुरातन अवशेष असल्याचे सिध्द झाले.

आज पाटणा शहर अवाढव्य वाढलेले आहे. मोठंमोठ्या काँक्रीट इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. जुने वाडे नष्ट झाले आहेत. विहार आणि स्तुप असलेली संस्कृती लयास गेली आहे. आणि म्हणूनच ज्या राजवाड्यातून, महालातून, दरबारातून देवांनाप्रिय प्रियदर्शी अशोक राजा गरजला, जिथून त्याच्या आदेशांचे फर्मान सुटले, जिथे धम्म उपदेशाचा पाऊस पडला त्या सर्व वास्तूंना मी नमन करतो. मौर्य सम्राटाच्या त्या पवित्र वास्तू इथेच पाटलिपुत्र भूमीत चिरनिद्रा घेत पडलेल्या आहेत, याची सर्वांना जाणीव आहे. भविष्यात त्या वास्तूंचे पुरावे नक्कीच मिळतील अशी आशा धरूया.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *