इतिहास

हे बोलके व अप्रतिम शिल्प आहे तरी कुठे? बोधिवृक्षास वंदन करणारा हा ‘नागराज’ कोण?

“पताकांनी सुशोभित केलेला बोधिवृक्ष , त्याखाली असलेले वज्रासन. त्यावर सर्वत्र सुगंधी फुले पसरलेली. तिकडे वर आकाशात पाच फण्यांच्या नागावर आरुढ होऊन, उजवा हात पोटाशी बांधून, डाव्या हातात बोधिवृक्षास वाहण्यासाठी ताज्या फुलांचा गुच्छ घेतलेला, व चेहऱ्यावर लीनतेचा भाव आणून मोठ्या नम्रतेने बोधिवृक्षाच्या दर्शनासाठी थांबलेला नागराजा. उजव्या बाजूला त्यास अभय देत असलेले तथागत. तर, खाली डोईस पंचफणाधारी ‘नागशिरोभूषण’ (फेटा) धारण करून, बोधिवृक्षाच्या समोर वज्रासनास नम्रतेने पंचांग प्रणिपात करणारा, नागराजा व पाठीमागे त्याचे बोधिवृक्ष व वज्रासनास वंदन करत असलेले राजकुटुंब….

बोधिवृक्षास व वज्रासनास भक्तीभावाने वंदन करणारा हा ‘ नागराज ‘ आहे तरी कोण….? आणि हे बोलके व अप्रतिम शिल्प आहे तरी कुठे…? असा प्रश्न आपणांस न पडला, तर ते नवलच….! हा नागराजा आहे ‘एरपत’. आणि, हे शिल्प आहे मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील ‘ भरहूत’ येथील इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील अप्रतिम शिल्पकलेने नटलेल्या मौर्यकालीन स्तुपावरील. चकीत झालात ना….?

या शिल्पामध्ये पंचफणाधारी नागाच्या खाली , एका मोकळ्या जागेत मौर्यकालीन धम्मलिपीतील एक पंधरा अक्षरांचा, शिलालेख आहे. दोन ओळींच्या या शिलालेखात वरच्या ओळीत आठ अक्षरे आहेत, तर खालच्या ओळीत सात अक्षरे आहेत. आणि, या शिलालेखात लिहिलेले आहे . ”एरपतो नागराजा भगवतो वंदते” अर्थात् “नागराजा एरापत भगवंतास वंदन करत आहे….”

‘खग्ध परितं सुत्तं’ या सुत्तामधील उपदेशात प्रत्यक्ष तथागतांच्या तोंडूनच या नागराजाचा उल्लेख आलेला आपणांस आढळतो. त्याचा थोडक्यात आढावा असा…

‘एकदा, श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या ‘जेतवन’ विहारामध्ये वास्तव्य करीत होते. त्यावेळी श्रावस्तीमधीलच कोणा एका भिक्खूला विषारी सर्पदंश होऊन तो भिक्खू मृत झाला. तथागतांना काही भिक्खूंनी ही वार्ता सांगितल्यानंतर तथागत त्यांना म्हटले, ” हे भिक्खूंहो, त्या भिक्खूने निश्चितच चार सर्पकुळांविषयी मैत्री भावनेने स्पर्श केला नसावा. जर त्याने मैत्री भावनेने स्पर्श केला असता, तर तो भिक्खू सर्पदंशामुळे मृत्यू पावला नसता. तेव्हा, उपस्थित भिक्खूंनी ”ती चार सर्पकुळे कोणती…?” असे विचारल्याने, तथागतांनी त्यांस पुढील उपदेश केला –

“अनुजानामि भिक्खवे इमानि चत्तारी अहिराजकुलानि ।
मेत्तेन चित्तेन फरितुं अत्तगुत्तिया, अत्तरक्खाय, अत्तरवरित्तायाति।।”

अर्थात्- ” हे भिक्खूंनो, मी आपणांस अनुज्ञा देतो की, आपण आपल्या संरक्षणासाठी, स्वहितासाठी गुप्त रक्षण करण्याकरिता या परित्राणपाठाचे पठण करा,या चार सर्पकुळांना नेहमी मैत्री चित्ताने स्पर्श केल्याने प्रेमभाव वाढतो… ”

“विरुपक्खेहि मे मेत्तं, मेत्तं एरापथेही मे।
छब्यापुत्तेहि मे मेत्तं, मेत्तं कण्हागोतमकेहिच।।”

अर्थात् -” विरुपाक्ष सर्पवंशासोबत माझी मित्रता आहे, एरापथ सर्पवंशासोबतही माझी मैत्री आहे. तसेच, छब्यापुत्र सर्पवंश व कृष्णागौतम सर्पवंशासोबत देखील माझी मैत्री आहे…”

‘भरहूत’ येथील या अप्रतिम व बोलक्या शिल्पात भगवंताला वंदन करणारा हा नागराजा निश्चितच ‘एरापत’ आहे, हे यातील शिलालेखातून स्पष्ट होते. भरहूत स्तुपावरील हे व इतरही अनेक सुंदर व अप्रतिम शिल्पं सध्या कोलकाता येथील ‘राष्ट्रीय संग्रहालय’ येथे सुरक्षितरित्या जतन करून ठेवलेली आहेत….

-अशोक नगरे, पारनेर, अहमदनगर (लेखक – ज्येष्ट मोडी लिपी तज्ज्ञ, बौद्ध स्थापत्य, शिल्पकला आणि इतिहास अभ्यासक)