बुद्ध तत्वज्ञान

जिथे बुद्धत्व असते तिथे मी पणा नसतो

या दिव्यत्वाच्या साक्षात्कारी मार्गावरून तुम्ही प्रवास करीत आहात.हा प्रवास विलक्षण अलौकिक व खडतर आहे. मुख्य म्हणजे या प्रवासात लौकिक जीवनाला, आपल्या इच्छा-आकांक्षा, लालसा-वासना यांना दूर ठेवावे लागते. तेही समजून उमजून.

बद्धावस्थेपासून जीवनमुक्तावस्थेकडे आपल्याला जायचे आहे, अर्थात या प्रवासात बुद्ध तुमच्या सोबत सदैव सावलीसारखा आहेच, तो तुमचा सांगाती आहे, सखा आहे. प्रथम पार्थिव अस्मितेला, बद्धावस्थेला समग्र समजून घेत, साधकाची आत्मजागृती त्याला अधिकाधिक विकसित करीत नेते. सर्व ज्ञानेंद्रिये एकत्रपणे उमलावीत आणि ती तशी उमलताना बुद्धतत्त्वांची, विश्वरुपाची जाणीव आपल्याला व्हावी, अशी ओढ प्रत्येकालाच वाटत असते. एकूणच जीवन जगणे ही एक मोठी कला आहे. जगणे म्हणजेच कृती असते आणि कृती ही नेहमीच वर्तमानात घडते. जेव्हा आपली कृती ही दु:ख निर्माण करते, तेव्हा ती कृती कुशल असत नाही. मग प्रश्न असा आहे की आपण दुःखाशिवाय, संघर्षाशिवाय, युद्ध-भेद-हिंसा-तुलना या शिवाय जगू शकतो का?

खरे बुद्धत्व – सौंदर्य म्हणजेच कृती-उक्तीतील कुशलता होय. खरे तर ही कुशलता आपल्या प्रत्येक कृती-उक्तीत, संपूर्ण जीवनात प्रत्येक क्षणी जगताना प्रत्यक्षता आली पाहिजे.हेच सौंदर्य आहे आणि चांगुलपणातले जगणेही. जीवनाच्या कुठल्याही एका अंगाला अवास्तव महत्त्व न देता, संपूर्ण क्षेत्रामध्ये कौशल्याने आपल्याला जगता आले पाहिजे, जिथे बुद्धत्व असते तिथे मी पणा नसतो तेथेच सत्य दर्शन असते, तीच कृती असते. जीवनाचे सौंदर्य व महात्म्य त्यातच आहे. अर्थात या आध्यात्मिक प्रवासात सुजाणपणा वा सुज्ञपणा यांची मोठी गरज आहे. सुजाणपणा व सूज्ञता ही नेहमीच एकाकी वाटचाल करतात. एकाकीपणे तुम्ही सत्याच्या शोधात पावले टाकीत आहात.

एकाकीपणा पाहिजे परंतु तो बंदिस्त मनाचा नव्हे, मुक्तीचा हवा. जे पूर्ण असते ते एकाकी असते, आणि जे अपूर्ण असते, ते अलगपणाचा मार्ग शोधीत असते. तुम्हाला रोजच्या जीवनात तरल सावधानतेने जगायचे आहे. तेही संपूर्ण वर्तमानकाळातील चैतन्यात. संपूर्ण जीवनासह आत्मिक प्रवासाला बळ मिळायला हवे एकटेपणा-तुटलेपणा यांना घाबरू नका. नैराश्य-वैफल्य यांना थारा देऊ नका. बुद्ध तुमच्या सोबत आहेच.

तुम्ही एकाकी आहात पण एकटे नाही .तुमचा मेंदू जितका शांत असेल तितकी अंतर्दृष्टी सखोल होईल. कोणत्याही संघर्षाशिवाय व्यवस्थित सुसंवाद साधण्यासाठी मेंदूला सुरक्षिततेची आणि सुव्यवस्थेची आवश्यकता असते. आपली भीती, आपल्या इच्छा-आकांक्षा, तसेच आपला मोठेपणाचा हव्यास, सत्ता-संपत्ती, यश-वैभवाची तृष्णा व लौकिकतेची आसक्ती, यांना शांतपणे दूर सारत दिव्यत्त्वाचा हा प्रवास करीत राहणे, यातच बौद्धत्व सामावलेले आहे.

तुटलेपण म्हणजे भीती व दु:ख यांच्यामुळे व्याकुळ झालेले असे एकटेपण असते, अहंच्या सर्व व्यापाराची परिणती अशा या तुटलेपणातच होत असते. तुटलेपणा हा नेहमी जीवनात गोंधळ, दु:ख व संघर्ष यांची निर्मिती करीत असतो. एकटेपण हे नेहमीच भेदावर आधारलेले असते.

One Reply to “जिथे बुद्धत्व असते तिथे मी पणा नसतो

  1. बुद्ध समजु लागलाय तुमच्या या लेखांमुळे .

    खुप छान ऊपक्रम

Comments are closed.