“डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा” या मालिकेत बाबासाहेबांचं कुटूंब मुंबईला स्थलांतरीत होत असल्याचा प्रवास सुरू आहे. दापोली, साताऱ्यात मिळालेल्या जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूकीनंतर आता सुभेदारांचं कुटूंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झालंय. पण तुम्हाला ठाऊक आहे का हे घर म्हणजे नेमकं मुंबईत कुठे होते? ते आजही आहे का? काय आहे त्या घरांचा इतिहास? सुभेदार रामजीबाबांनी पूर्ण परिवाराला राहण्यासाठी एक खोली आणि फक्त भिवाच्या अभ्यासासाठी म्हणून एक खोली घेतली होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल २२ वर्षे परळच्या ज्या बीआयटी चाळीतल्या खोलीत काढली. त्यांच्या जीवनाच्या अणि सामाजिक आंदोलनांच्या धगधगत्या आठवणी ज्या वास्तुशी निगडित आहेत. बाबासाहेबांचे पिता सुभेदार रामजी यांनी या चाळीत ५० व ५१ नंबरच्या दोन खोल्या विकत घेतल्या होत्या. त्यापूर्वी आंबेडकर कुटुंबीय एल्फिन्स्टनच्या डबक चाळीत राहायचे. बीआयटी चाळीत राहून बाबासाहेबांनी बी. ए. पूर्ण केले. बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीमुळे नंतर बाबासाहेब अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले. कोल्हापूरचे राजर्षी शाहू बाबासाहेबांना शोधत शोधत याच चाळीत भेटायला आले होते.
बाबासाहेब पुढे सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक झाले, सार्वजिनक कार्यास सुरुवात केली. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, जनता आणि बहिष्कृत भारत साप्ताहिकांची सुरुवात ते पुणे करारावरील स्वाक्षरी इतका बाबासाहेबांचा प्रदीर्घ सहवास या वास्तूस लाभला. त्यांच्या पत्नी रमाबाई यांचं पूर्ण आयुष्य या वास्तूत गेलं. या चाळीतून बाबासाहेब १९३४ ला दादरच्या नव्यानं बांधलेल्या राजगृहात राहायला गेले. त्यानंतर ५० नंबरची खोली ताडीलकर कुटुंबीयांनी तर ५१ नंबरची खोली खैरे कुटुंबीयांनी खरेदी केल्या. दुसऱ्या मजल्यावर समोरासमोर या खोल्या आहेत. सध्या ५० नंबरच्या खोलीत रोहन ताडीलकर हा युवक आई आणि बहिणीसह राहतो. ५१ नंबरच्या खोलीत भागुराम खैरे पत्नी सविता आणि मुलगा कल्पीतसह राहतात. त्यांचे काका सखाराम खैरे यांच्याकडून त्यांना ही खोली मिळाली. बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव यांचे खैरे हे जवळचे नातेवाईक.
सहा डिसेंबरला या खोल्या पाहायला लोक येतात. विशेष म्हणजे ताडीलकर आणि खैरे कुटुंबीय सर्वांना घरात घेतात, विचारपूस करतात आणि विचाराल ती माहितीपण देतात. आधीमधी बरेच परदेशी अभ्यासकही या चाळीत येतात.
भागुराम खैरे यांनी या ५१ नंबरच्या खोलीत कोणताही बदल केलेला नाही. अगदी तेच दार, तोच कडीकोयंडा, खिडकीसुद्धा बाबासाहेबांच्या काळातलीच. बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्यांनी खोलीत फरशीसुद्धा बसवली नाही. आजही या खोलीत सिमेंट कोबा आहे.
परळच्या बीआयटी चाळीनी २०१२ मध्ये शंभरी पार केली आहे. आजूबाजूच्या इमारती पाडून इथं पन्नास मजली टॉवर उभे राहत आहेत. उद्या या चाळीच्या नशिबीही हेच येणार आणि महामानवाच्या सहवासानं पुनीत झालेली ही वास्तू कायमची पडद्याआड जाणार.
घटनाशिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू कॉलनी, दादर येथील राजगृह हे निवासस्थान सर्वांना परिचित आहे. पण त्याअगोदर बाबासाहेब
परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसर्या माळ्यावर खोली क्र. 50, 51 या ठिकाणी वास्तव्यास होते. 1912 ते 1934 या कालावधीत 22 वर्षे ते येथेच राहायचे. या ऐतिहासिक स्थळाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याची खंत येथे भेट देणारे नागरिक व्यक्त करतात.
जगातील सर्वांत विद्वान व्यक्तीने जिथे काही काळ घालवला तेथे राहण्याची संधी मिळणे म्हणजे आम्ही खूपच भाग्यवान आहोत, अशा शब्दांत दोन्ही कुटुंबीयांनी भावना व्यक्त केली. खोली क्र. 50 मध्ये बाबासाहेब कंदिलाच्या प्रकाशात अहोरात्र अभ्यास करायचे. दुसरी खोली क्र.51 स्वयंपाकघर असल्याने रमाईने केलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद ते येथे घ्यायचे. याच बीआयटी चाळीत राजर्षी शाहू महाराज देखील बाबासाहेबांना प्रथम भेटण्यास आले होते. त्यावेळी रमाईंच्या हातचा चहा महाराजांनी घेतला व रमाईंना आपली छोटी बहीण देखील मानले. बाबासाहेबांच्या मूकनायक तसेच लंडन येथील शिक्षणासाठी देखील अर्थसहाय्य महाराजांनी केले.
गेल्या महिन्यातच अमेरिका, कोलंबिया येथून 20 जणांचे शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन गेले. जर्मनीहून एक वयोवृद्ध महिला या ठिकाणी भेट देण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा भागूराम खैरे यांच्या पत्नी कल्पना यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळी जर्मन महिला चक्क शुद्ध हिंदी भाषेत म्हणाल्या, “बाबासाहेबांनी नमस्कार करायला नाही तर गळाभेट घ्यायला शिकवलं आहे. आपण सर्व त्यांचे अनुयायी आहोत कोणी मोठे छोटे नाही.”
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन्ही खोल्यांमधील जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ बांधले आहे.
Very very important and price less information.
Thank you so much for this valuable information.