इतिहास

“शाल्भञ्जिका शिल्प” नेमके कोणाचे?

भारतीय शिल्पकलेमध्ये अनेक उत्तमोत्तम शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. या शिल्पांचा अभ्यास जसा उत्साहपूर्ण असतो तसाच या शिल्पांचा इतिहासही रोचक असतो. भारतात शिल्पकलेचा जन्म हा बौद्ध संस्कृतीतून झाला हे निर्विवाद सत्य होय. बुद्ध लेणीं आणि त्यानंतरच्या अनेक स्थापत्यात भ. बुद्धांचा इतिहास किंवा त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो.

“शालभंजिका” हे असेच एक शिल्प होय. हे शिल्प सर्वात पहिल्यांदा “वाड्डेल” या ब्रिटिश पुरातत्त्वशास्त्रज्ञाला १८९० साली कुमराहार, पाटणा येथील उत्खननात सापडले. कुमराहार (पूर्वीचे पाटलीपुत्र) ही मौर्य साम्राज्याची राजधानी होय. तेथील उत्खननात एका तोरण पट्टीवर हे शिल्प आढळले. हे शिल्प भारहूत आणि सांची येथील स्तूपाच्या तोरणावर पाहायला मिळते. या शिल्पात सुंदर वस्त्रांनी आणि दागिन्यांनी नटलेली स्त्रीने एका हातात साल (शाल) वृक्षाची फांदी धरली असून दुसरा हात कटीवर ठेवला आहे तर काही ठिकाणी दुसऱ्या हाताने तिने झाडाला धरले आहे.

मथुरा, कौशाम्बी, अमरावती आणि नागार्जुनकोंडा येथे आपल्याला ही शिल्पे पाहायला मिळते. कोलकाता, खंदाहार, कराची, बर्लिन आणि अलाहाबाद येथील संग्रहालयात देखील हे शिल्प ठेवलेली आहेत. हेच शिल्प भारतीय शिल्पकलेत इ.स.पूर्व २५० ते इ.स. ९व्या शतकापर्यंत आपल्याला अनेक बुद्ध लेणीं अथवा स्तूपाच्या तोरणावर पाहायला मिळतात. १२व्या शतकात तर या शिल्पाचे ताम्रशिल्प आपल्याला पाहायला मिळते.

इ.स.पहिल्या शतकात होऊन गेलेला व ज्याने भारतीय साहित्यात सर्वात पहिल्यांदा काव्य प्रकार रुजवला तो बौद्ध आचार्य अश्वघोषाने “बुद्धचरितम्” या काव्यात हा शब्द वापरला. ५व्या सर्गात हे पद राजपुत्र सिद्धार्थ गृहत्याग वेळी कवी त्याच्या महालातील एका सेविकेचे वर्णन करताना म्हणतो –

अवलम्ब्य गवाक्षपार्श्वमन्या शायिता चापविभुग्न गात्रयष्टिः I
लम्बिचारुहारा रचिता तोरणशाल्भञ्जिकेव II

वरील पदात अश्वघोष लिहितो कि “….आणखीन एक स्त्री एवढी बेसावध होऊन महालाच्या खिडकीवर पहुडली आहे कि जसे एखादी शाल वृक्षाची फांदी फुले तोडण्यासाठी वाकवली जाते”. अश्वघोषांनी लिहिलेला “तोरण शालभंजिका” हा शब्द वोगेल ने १९२९ साली अशा प्रकारच्या शिल्पाचे वर्णन करताना वापरले आहे. मात्र मूळ शिल्प कोणाचे आणि त्याचा अर्थ काय?

बुद्धांच्या काळी “सालवन क्रीडा” (शालवन क्रीडा) नावाचा एक खेळ वसंत ऋतूत खेळला जायचा ज्यात स्त्रिया, साल वृक्षाच्या फुले एकमेकांच्या अंगावर फेकायचा व त्याचा आनंद लुटायचा. याचे वर्णन आपल्याला “अवदानशतक” या ग्रंथात देखील वाचायला मिळेल. प्रसूतीसाठी जेव्हा महाराणी महामाया कपिलवस्तू वरून देवदाहला निघाली असता, वाटेत लुम्बिनी मधील साल वृक्षांच्या जंगलात तिला शालवृक्षांच्या भोवती खेळायची इच्छा झाली (पालि: सालवनाकिलम किलितुकामता) आणि आपल्या सखींबरोबर खेळताना ती शाल वृक्षाची फांदी धरायला जाते आणि तिला प्रसववेदना सुरु झाल्याने तेथेच सिद्धार्थाचा जन्म होतो. शालवृक्षाच्या फांदीवर जोर पडल्याने ती वाकली जाते किंवा तुटते.

सम्राट अशोक आणि त्यानंतरच्या अनेक राजांनी बुद्ध इतिहास शिल्पात कोरताना ज्या अनेक घटनानांना शिल्पात उतरविले ते हेच दृश्य ज्याला पुढे वाड्डेलने “शालभंजिका” शब्द वापरला. अश्वघोषाने केलेल्या “शालभंजिका” शब्दाचा आणि प्रसंगाचा वापर नंतरच्या अनेक कवींनी व साहित्यकारांनी केला आहे. नाट्यशास्त्रात देखील शिल्पातील या प्रसंगाला एक महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. पुढे अनेक ठिकाणी अशा प्रकारची शिल्प कोरली गेली. काहींनी या शिल्पातील स्त्रीला यक्षी किंवा यक्षिणी असेही संबोधले आहे.

भारतीय शिल्पकलेत आणि साहित्यात वर्णन करण्यात आलेले “शालभंजिका” हे शिल्प मात्र महाराणी महामायाच्या शालक्रिडेतील प्रसंग आहे एवढे मात्र नक्की.

– अतुल भोसेकर, नाशिक (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास आणि लेणी अभ्यासक) ९५४५२७७४१०