ब्लॉग

आद्य महाकवी किंवा कविकुलगुरू कोण – अश्वघोष कि कालिदास?

बौद्ध आचार्य अश्वघोष यांचा जन्म इ.स. ७८ साली साकेत मध्ये झाला. एक महान बौद्ध आचार्य म्हणून लौकिक मिळवलेले अश्वघोष संस्कृत भाषेतील एक प्रतिभासंपन्न आद्य कवी व नाटककार होते.

अश्वघोषांनी सर्वात पहिल्यांदा भारतीय साहित्यात “काव्य” प्रकार आणला. “बुद्धचरितम्” हे त्यांचे सर्वोत्कृष्ट संस्कृत काव्य होय जे २८ सर्गांचे होते मात्र त्याचे फक्त १४ सर्ग अस्तित्वात आहेत. यातील १ ते १४ पर्यंत भ.बुद्धांच्या जन्मापासून ते बुद्धत्त्व प्राप्त पर्यंतचे आयुष्य अतिशय सौंदर्यपूर्ण अशा काव्यात रचले आहे. उरलेले १५ ते २८ हे बुद्धांच्या महान “करुणा” दर्शवित त्यांच्या महापरिनिर्वाणाचा प्रवास दर्शविलेला आहे. हेच सर्व सर्ग नष्ट करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वी इ.स.४थ्या शतकात बौद्ध आचार्य धर्मक्षेमा यांनी चिनी भाषेत भाषांतर केले. ७व्या शतकात बुद्धचरितम् तिबेटी भाषेत भाषांतर केले गेले.

अश्वघोषांनी लिहिलेल्या बुद्धचरितम् मध्ये निसर्गाचे आणि मानवी मनाचे अतिशय सुंदर तऱ्हेने वर्णन केले आहे. काही काही पदांमध्ये अश्वघोषांनी स्पर्श करून सोडलेल्या अनेक वर्णने आपल्याला त्यांच्या नंतर जन्माला आलेल्या कवींमध्ये दिसून येतो. यातील प्रामुख्याने नाव घ्यावे असे संस्कृत कवी म्हणजे कालिदास होय. कालिदासाचा जन्म इ.स.४थ्या शतकातला. म्हणजे अश्वघोषांनंतर जवळपास ३०० वर्षानंतर! म्हणजे निश्चितपणे कालिदासाने अश्वघोषांचे साहित्य वाचले असणार!

कालिदासाने लिहिलेल्या “रघुवंश” या काव्यात “बुद्धचरितम्” ची संपूर्ण नक्कल दिसते. कालिदासाने लिहिलेल्या “मेघदूत” या आणखीन एक काव्यत देखील अश्वघोषांच्या प्रतिभेची छाप दिसते. कालिदास ने लिहिलेल्या कोणत्याही काव्याची आणि अश्वघोषांनी लिहिलेल्या काव्याची कधीतरी इथल्या “सरस्वतांनी” चिकित्सा करावी. (ते केलीच असणार!),कालिदासाने अश्वघोषांची नक्कल केली हेच दिसेल.

एखाद्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाची किंवा त्याच्या कार्याची छाप असणे गैर नाहीच मात्र अशा प्रतिभासंपन्न व साहित्यात नवीन प्रवाह सुरु करणाऱ्या एका प्रतिभासंपन्न कवीला पूर्णपणे डावलून त्याच्या काव्यावर हात मारणाऱ्याला, “कविकुलगुरू” उपाधी देणे हे कुठल्या संस्कृतीत बसते?

इ.स. पहिल्या शतकात अश्वघोषांनी लिहिलेल्या “बुद्धचरितम्”, “सौंदरानंद”, “सुत्रालंकार”, “वज्रसूची”, “शारीपुत्रप्रकारण” अशी एकाहून एक सरस संस्कृत काव्य व नाट्य लिहिले मात्र त्यांच्या एकाही काव्याला “पंचकव्या”चा मान नाही, आणि ज्याने अश्वघोषाच्या साहित्याची नक्कल केली अशा कालिदासाच्या कुमारसंभव आणि रघुवंश या दोन्हीही कृतींना या पंचकाव्यात स्थान आहे! इथल्या सारस्वतांच्या कोत्या मानसिकतेची यापेक्षा आणखीन काय उदाहरण असू शकेल?

अतुल भोसेकर, नाशिक (लेखक – ज्येष्ठ बौद्ध लेणी आणि इतिहास अभ्यासक)