डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धधम्म स्वीकारण्याचा आपला विचार पक्का केला होता. त्यासाठी त्यांनी १९५६ या वर्षाची १४ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली. तारीख निश्चित झाल्यानंतर स्थळ निश्चितीही करणे आवश्यक होते. डॉ. आंबेडकरांनी स्थळ निश्चिती करतानाही सखोल विचार करूनच निर्णय घेतला. नागपूर येथे धम्म दीक्षा घ्यायचे निश्चित केले. धम्म दीक्षेच्या कार्यक्रमासाठी नागपूरची निवड करताना त्यांनी नागपूरचे ऐतिहासिक महत्व काय हे प्रथम लक्षात घेतले.
नागपूर व आसपासच्या परिसरात नागवंशाचे लोक फार मोठ्या प्रमाणात राहत असत. अस्पृश्य हे नागवंशाचे आहेत. म्हणूनच आपल्या समाजाची आंतरिक मूळे या शहरात रूजलेली आहेत, असा डॉ. आंबेडकरांचा विश्वास होता व त्यांनी या नागांच्या माध्यमातूनच आपला बौद्ध पम्माशी संबंध जोडलेला होता. कारण नागवंशीय लोक बौद्ध धम्माचे अनुयायी होते.
श्री. कोसारे यांनीही आपल्या “प्राचीन भारतातील नाग” या ग्रंथात असेच मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, विदर्भातील महार नागांचे केंद्र नागपूर होते. म्हणून या नागांनी आपल्या केंद्रीय वसतिस्थानाला नागांचे शहर अथवा पूर म्हणजे नागपूर असे नाव दिले. नागांचे पुनरूत्थान होवून त्यांनी हस्तिनापुरचे नाव हस्तिनागपूर असे ठेवले होते. त्यामुळेच बुद्ध पूर्वकाळपासून तर मौर्यकालाच्या सुरुवातीपर्यंतच्या कालखंडात नागपूर प्रदेशाचा, विदर्भाचा हा भाग नागभूमी म्हणून ओळखला जात होता. बौद्ध ग्रंथात या नागभूमीचा उल्लेख मिळतो. नागभूमीचे नाग हे बुद्धांच्या जीवनकालातच बुद्धाचे अनुयायी झाले होते. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर नागांना मिळालेला बुद्धदन्त धातू त्यांनी नागभूमीत नेला होता. नागपूर प्रदेशाचा भाग हाच प्राचीन नागभूमी असल्याचा पुरातत्वीय पुरावा पवनी येथील बौद्धस्तूपाच्या उत्खननातून समोर आला आहे. पवनीचे महास्तूप मौर्यकालीन असल्याचे सिद्ध झाले आहे.
खरे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाविधीचा कार्यक्रम मुंबईला घेण्याचे निश्चित केले होते. पण नंतर त्यांनी आपला विचार बदलून हा कार्यक्रम नागपूर मुक्कामी करण्याचे ठरविले. यासाठी भारतीय बौद्धजन समितीच्या नागपूर शाखेने महत्वाची भूमिका पार पाडली. श्री. वामनराव गोडबोले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी याबाबतीत पुढाकार घेवून हा कार्यक्रम नागपूरला घेण्यासाठी बाबासाहेबांचे मन वळविले आणि या कार्यक्रमाच्या व्यवस्थेची व कार्यक्रम यशस्वी करण्याची सर्व हमी घेवून बाबासाहेबांना आश्वस्त केले. यामुळे त्यांनी नागपूरच्या बौद्धजन समितीला हा कार्यक्रम दिला.
नागपूरचे ऐतिहासिक महत्व आणि मध्यवर्ती ठिकाण लक्षात घेवून बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षविधीचा कार्यक्रम घेण्याचा विचार पक्का केला. शिवाय नागपूर आणि परिसरात अस्पृश्य समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून राहत होता. या ठिकाणी दीक्षाविधीसाठी असंख्य लोकांना एकत्र करता येईल, ही बाबही लक्षात घेण्यात आली. नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा दिवस ठरल्यानंतर डॉ. बाबासाहेब प्रबुद्धभारत २९ सप्टें. १९५६ ) आंबेडकरांनी ते जाहीर केले. त्यांचा हा संदेश खालील प्रमाणे होता. (सा.प्रबुद्ध भारत २९ सप्टेंबर१९५६)
२६, अलीपूर रोड, दिल्ली. ता. २३ सप्टेंबर, १९५६. बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे. येत्या दसऱ्यास तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजता माझा धर्म – दीक्षा विधी समारंभ होईल. व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी जाहीर व्याख्यात होईल.
-बी. आर. आंबेडकर.